प्रेम – एक बहुरुपी अनुभव

Published by Gangadhar Gadgil on   February 12, 2018 in   1988मराठी लेखणी

‘प्रेम ‘

एक साधा शब्द. फक्त दोन अक्षरी. त्याचा अर्थ सांगावा लागत नाही. सगळ्यांना कळतो. आणि लहान-मोठी, गरीब-श्रीमंत, अडाणी-शहाणी, सगळीच माणसं कोणावर तरी, केव्हातरी प्रेम करतात. अहो, अगदी कुरूप, अपंग, अर्धवट माणसालादेखील त्याच्या आईचं प्रेम लागतंच. काही काही वेळा तर एखादी आई त्या प्रेमापोटी आपलं सगळं आयुष्य अशा मुलाला सांभाळण्यात घालवते. शब्द साधा, सगळ्यांना समजणारा, असं म्हटलं खरं. पण तसं खरोखर आहे का हो ? ‘ अ ‘ चं ‘ ब ‘ वर प्रेम आहे म्हणजे काय आहे ते तुम्हाला सांगता येईल? विचार करा. प्रेमाच्या इतक्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात. ते इतकी विचित्र रूपं धारण करतं की त्यांच्या दर्शनानं अगदी गांगरून जायला होतं.

नलिनीबाई व मुले


नलिनीबाईंच्या मुलांचं त्यांच्यावर फार प्रेम आहे. मुलं मोठी झाली, त्यांची लग्न होऊन त्यांना मुलंबाळं झाली, तरी त्यांचं नलिनीबाईंशिवाय पानदेखील हलत नाही. जरा काही अडलं, अडचण आली की आईकडे धाव घेतात. त्या दिवशी सकाळी सकाळीच मुलाचा फोन आला.

” ए आई, मेघाला एकदम ताप आलाय १०३ डिग्री! आता काय करायचं ?”

नलिनीबाई म्हणाल्या, ” अरे, असं कर, आधी कपाळावर बर्फाची पिशवी अ- है ठेव… ”

मुलगा म्हणाला, ” नाही, नाही. मला भीती वाटते. तू आधी इथे ये बरं ताबडतोब. मग तू काय सांगशील ते करीन. ”

नलिनीबाई म्हणाल्या, ” अरे, पण सकाळची वेळ आहे. घरातलं सगळं व्हायचं आहे… ”

मुलगा म्हणाला, ” ते मला काही माहीत नाही. तू आत्ताच्या आत्ता ये !”

” बरं बाबा, येते हो ” असं म्हणत सुस्कारा सोडून नलिनीबाई घरातलं आवरून जायची तयारी करायला लागल्या. तेवढ्यात मुलीचा फोन आला. ती अगदी घायकुतीला आली होती.

म्हणाली, ” अगं आई, ही नंदिनी बघ कशी करत्येय! म्हणते मी परीक्षेला जाणारच नाही. म्हणे तयारी झाली नाही. भीती वाटतेय. हात इतके थरथरताहेत की लिहिताच यायचं नाही !”

” अगं, तिला जरा धीर दे. पित्ताची मात्रा दे उगाळून. कॉफी दे चांगली कडकशी…”

” नको बाई ! मला अगदी भीती वाटते. माझेच हातपाय थरथरायला लागले आहेत. तू आधी इथे ये. तशीच्या तशी नीघ. ”

नलिनीबाईंनी कपाळावरचा घाम निपटला आणि आता काय करावं या विचारात त्या पडल्या. तेवढ्यात त्यांच्या धाकट्या बहिणीचा फोन आला, ” अगं ताई…” जाऊ दे. ती काय बोलली ते मी सांगत नाही. एवढंच सांगतो की त्यानंतर नलिनीबाई मटकन् खाली बसल्या आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांचं वय झालं होतं. हातपाय थकत चालले होते. पण मुलांची कामं काही संपत नव्हती. या प्रेमाबद्दल काय वाटतं तुम्हाला? असलं प्रेम तुम्हाला आवडेल ? आणि या प्रेमाला असं रूप का आलं? मुलांमुळे, नलिनी बाईंमुळे की आणखी कशामुळे ?

कमलताई व नातवंडे 


कमलताईंची गोष्ट वेगळी आहे. त्यांचा आपल्या नातवंडांवर अतोनात जीव आहे. त्यामुळे त्या सारख्या त्यांना जपत असतात. त्यांची काळजी घेत असतात. मुलं खाली वाडीतल्या मुलांबरोबर खेळायला गेली की या गॅलरीत उभ्या राहून त्यांच्यावर लक्ष ठेवतात.

नातू जोरात धावायला लागला की ओरडतात. ” अरे, इतक्या जोरात धावू नको. पडशील. नाहीतर पाय मुरगळेल. ”

नात उंचावरून उडी मारायला लागली की किंचाळतात, ” अगं, किती उंचावरून उडी मारतेस ? पाय मोडून घेशील!”

कोणा मुलाशी नातवाची मारामारी झाली, की या त्या दुसऱ्या मुलावर ओरडू लागतात. त्याच्या अंगावर धावून जातात. याचा परिणाम असा होतो, की दुसरी मुलं कमलताईंच्या नातवंडांबरोबर खेळायलाच तयार होत नाहीत. त्यामुळे नातवंडे वैतागतात. ती सांगतात, ” आजी, तू गॅलरीत उभी राहू नकोस!” कमलताई अर्थातच ते ऐकत नाहीत. मग ती खेळायला दूर कमलताईंना दिसणार नाही अशा ठिकाणी जातात. त्यांचा एक नातू चांगला बारा वर्षाचा झाला आहे. तो चिडतो, कमलाताईंच्या अंगावर खेकसतो. त्यांना वाटेल तसं बोलतो. पण तरी कमलताईंना काही राहवत नाही.

वसुंधरा व तिटकारा


वसुंधरेची गोष्ट आणखीनच वेगळी आहे. तिला वाटतं की आपल्या मुलानं मोठ्ठं कोणीतरी व्हावं. त्यानं परीक्षेत नेहमी पहिला नंबर मिळवावा, इंजिनीअर व्हावं, परदेशात जावं, म्हणून ती सारखी त्याच्यामागे अभ्यासाचा लकडा लावीत असते. परीक्षेत पहिला नंबर आला नाही की भयंकर चिडते. त्यामुळे त्या मुलाला अभ्यासाचा अगदी तिटकारा वाटायला लागला आहे. अलीकडे परीक्षा जवळ आली की त्याला दम्याची भयंकर धाप लागते. त्यामुळे वसुंधरा फार दुःखी कष्टी झाली आहे. आपल्याच मुलाच्या मागे ही दम्याची ब्याद का लागावी, असं ती वैतागून सगळ्यांना विचारत असते. या प्रश्नाचं खरं उत्तर तिला कोणीतरी सांगायला हवं. पण कशाला आपण त्या भानगडीत पडा, असं म्हणून तिला कोणी सांगतच नाही.

वडील भाऊ नारायण


नारायणचे आईवडील तो कॉलेजात असतानाच वारले. धाकट्या पाच भावंडांचा भार त्याच्यावरच पडला. घरात पैसा नव्हता. कोणी करणारं नव्हतं, तेव्हा नारायणने कॉलेज सोडलं आणि तो नोकरी शोधू लागला. स्वयंपाक करणं, इतकंच नव्हे, तर पहिल्या पहिल्यानं धाकट्या बहिणीच्या वेण्या घालणं, हे सगळं तोच करायचा. आईचं आणि वडिलांचं असं दोघाचंही प्रेम त्यानं आपल्या भावंडांना दिलं. त्यांना कॉलेजचं शिक्षण दिलं. धाकटा भाऊ एसएससी झाल्यावर त्याच्या एकदा मनात आलं की, आता त्याला नोकरी करायला सांगावं आणि आपण आपलं शिक्षण पुरं करावं. पण असं वाटलं म्हणून तो स्वतःवरच रागावला आणि भावालाच त्यानं कॉलेजात पाठवलं.

तो काम करीत असे तेथेच एक मुलगी नोकरीस होती. साधीसुधीच होती, पण चांगली होती. हसरी होती. नारायणच आणि तिचं छान जमायचं. हळूहळू ओळख वाढली. मैनी दाट झाली. मैत्रीच्या कोषातून प्रेमाचं फुलपाखरू बाहेर पडलं. पण नारायणला आपली भावंडं लहान असताना लग्नं करणं हा गुन्हा आहे असं वाटायचं. त्यामुळे तो लग्न पुढे पुढे ढकलू लागला. त्या मुलीनं दोन वर्षं वाट पाहिली. मग घराच्या मंडळींनी तिच्यामागे तगादा लावला. ती देखील नाराज झाली आणि अखेर घरच्या मंडळींनी निवडलेल्या एका चांगल्या तरुणाशी लग्न करून संसाराला लागली. नारायण तसाच राहिला. आता नारायणची भावंडं मोठी झाली आहेत. शिक्षण पुरं करून नोकऱ्या करताहेत. बहिणींची लग्नंही झाली आहेत.

नारायणला वाटलं, की आपण इतका त्याग केला त्याबद्दल भावंडांनी कृतज्ञता दाखवावी. नारायणला सुख लाभावं म्हणून करता येईल तितकं करावं. आपण त्यांच्यावर जितकं प्रेम केलं, त्यांच्यासाठी जितका त्याग केला, तितका त्यांनीही करावा. प्रेमाची परतफेड प्रेमानं करावी. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. नारायणची भावंडं तरुण आहेत. साहजिकच आपल्या जीवनात आणि भवितव्यात ती रमलेली असतात. नारायणने आपल्यासाठी पुष्कळ केलं असं त्यांना वाटतच नाही. त्यांना वाटले की मोठ्या भावानं असं करायचंच असतं. भावंडं असं वागतात म्हणून नारायण नाराज असतो. अलीकडे तो आपली नाराजी बोलूनही दाखवतो. त्यामुळे भावंडं त्याला टाळतात. एक-दोनदा एक भाऊ त्याला उलटदेखील बोलला. असा हा तिढा निर्माण झाला आहे. या तिढ्याला जबाबदार कोण? नारायणचं वागणं बरोबर की चूक ? त्याच्या अपेक्षा रास्त की अयोग्य ? प्रेमाची परतफेड प्रेमानं व्हावी अशी प्रेम करणाऱ्यांची नैसर्गिक अपेक्षा असते आणि तिच्यातून असे तिढे निर्माण होत असतात. ते सोडवायचे कसे? कोणी ?

असे अनेक तिढे प्रेमातून निर्माण होतच असतात आणि त्यामुळे माणसं दुःखी होत असतात.

तिच्या प्रेमाची गोष्ट 


निर्मलाचीच गोष्ट घ्या ना! तिचा आणि अरुणचा प्रेमविवाह झाला होता. दोघांचं एकमेकांवर अतोनात प्रेम. राजाराणींच्या संसारात दिवस कसे पाखरासारखे भराभर चालले होते आणि मग एकाएकी स्कृटरचा तो अपघात झाला…अरुणच्या आयुष्याची रेषा पुसली गेली. मस्तकावर तुळई कोसळावी तसं निर्मलाला झालं. आतून बाहेरून ती पार गोठली. अहिल्येची शिळा झाली, तसं काहीसं झालं. आईवडील, भावंडं, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळी धावली. त्यांनी निर्मलाला आधार दिला. तिला सावरायचा प्रयत्न केला. पण तिचं दुःख इतकं अनिवार होतं की त्याला बांधच घालता येईना, नव्हे, तो घालणं म्हणजे अरुणशी-आपल्या प्रेमाशी-प्रतारणा करण्यासारखं आहे तिला वाटायचं. त्यामुळे ती तशीच गोठून राहिली. जीवनाकडे तिनं पाठ फिरवली ती कायमची. त्यामुळे हळूहळू माणसं निर्मलाकडे यायची थांबली. तिला टाळू लागली. तिच्या आईनं तिला सांगून पाहिलं की आता कशात तरी मन घाल., नुसती कुढत राहू नको. तेव्हा निर्मला चवताळून नाही नाही ते बोलली. तेव्हा आई गप्प बसली. अरुण जाऊन दोन वर्षं झाली तरी निर्मला अजून तशीच गोठल्यासारखी जगते आहे. अरुणशिवाय दुसऱ्या कशाचा विचार करायला ती तयार नाही. आणि जग अरुणला विसरलं, इतर गोष्टींत रमलं म्हणून जगावर तिचा विलक्षण राग आहे.

किती विचित्र नाही ? एकपरीनं निर्मला ही पतिव्रताच आहे. पण तिनं असं असावं हे तुम्हाला बरं वाटतं का ? एका वेगळ्या प्रकारे अरुणची आठवण जितीजागती ठेवणं शक्य नव्हतं का ? त्यामुळे तिचं आणि जगाचं जीवन समृद्ध, सुखपूर्ण झालं नसतं का ? अरुणची आठवण अधिक अर्थपूर्ण झाली नसती का ?

बेटा प्रेमापायी मेला !


नरेंद्र काहीसा निर्मलासारखाच आहे. म्हणजे त्याचं मंदाकिनीवर विलक्षण प्रेम आहे. इतकं की आपल्यावर प्रेम करण्यापलीकडे तिनं दुसरं काहीही केलेलं त्याला आवडत नाही. तिनं नाटकांत काम करायला नरेंद्रनं बंदी घातली आहे. दुसऱ्याही कुठल्या कार्यक्रमात तिनं भाग घेतला की त्याला राग येतो. फार काय, तिच्या मैत्रिणी घरी आल्या आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात ती रमली तरी तो चिडतो. पुष्कळ दिवस मंदाकिनीनं हे सहन केलं. पण आता तिला अगदी गुदमरल्यासारखं व्हायला लागलं आहे. त्यामुळे त्या दोघांची भांडणं व्हायला लागली आहेत. परवा तर मोठं कडाक्याचं भांडण झालं. पुढे काय होणार आहे कोण जाणे !

आणि परवा वृत्तपत्रांत एक बातमी आली ती वाचलीत ना ? एका मुलीचं एका मुलावर प्रेम होतं. पुढे तिला कळलं की तो दुसऱ्याच मुलीच्या नादी लागली आहे आणि तिच्याबरोबर लग्न करणार आहे. हे कळल्यावर त्या मुलीनं काय केलं माहीत आहे ? तिनं चार गुंडांना पैसे दिले आणि त्यांच्याकडून आपल्या प्रियकराचा खून केला. मेला बेटा! प्रेमापायी मेला !

तुम्ही म्हणाल की सगळी उदाहरणं अतिरेकी प्रेमाची आहेत. आमच्या आयुष्यात तसलं काही घडत नाही. पण खरंच का हो तसं आहे ? ही माणसे जशी वागली तसे तुम्ही अगर तुमच्या आसपासची माणसं कमी-अधिक प्रमाणात नाही वागत ? प्रेम ही काही एकंदर साधीसुधी गोष्ट नाही. ती मोठी गुंतागुंतीची आणि विचित्र गोष्ट आहे. पण म्हणून प्रेम करायचं नाही असं काही तुम्हाला-आम्हाला ठरवता येणार नाही. माणूस म्हटला म्हणजे प्रेम करणारच, नव्हे त्यानं ते करायलाच हवं. पण हे जरा डोळसपणानं, शहाणपणानं, समंजसपणे नाही का करता येणार ? की प्रेम आणि समंजसपणा यांचं कायमचंच वाकडं आहे ? पाहा बुवा ! विचार करा.


 – गंगाधर गाडगीळ | कालनिर्णय फेब्रुवारी १९८८