मुंबईतील एका मित्राच्या घरी मी बसलो होतो. वेळ सकाळची होती. ” गुड मॉर्निंग अंकल ‘(इंग्रजी) -शाळेत जाण्याच्या तयारीत असलेली मित्राची दोन अपत्यं एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर आली आणि थोडा वेळ असल्यानं कोचावर बसली. मी नमस्काराचा स्वीकार केला आणि त्यांना सहज विचारलं, ” कोणत्या शाळेत जाता तुम्ही?” मुलं उत्तरण्याच्या आतच माझा मित्र हसत म्हणाला, ” डोंट से शाळा! दॅट इज अ गावठी वर्ड. ती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये (इंग्रजी शाळेत)जातात. यू नो माय व्ह्यूज ” –
खरं तर मित्राचे विचार मला माहीत नव्हते. बऱ्याच वर्षांनी मुंबईत आमच्या त गाठीभेटी होत होत्या. पण विचार नाही तरी त्याचं चरित्र मला माहीत होतं. कवडीपासून कोटीपर्यंत, अथवा झोपडीपासून प्रासादापर्यंत अशा छापाच्या ज्या कथा असतात त्यात त्याची चरित्रकथा सहज सामावणारी होती. शिक्षण वा भांडवल यांचा पुरेसा आधार नसताही आपल्या कर्तबगारीनं तो आता एका कारखान्याचा मालक झालेला होता आणि सुखवस्तू म्हणता येईल असं जीवन जगत होता.
मी काही उत्तरण्याच्या आतच मित्रपत्नीनं चहाचं साहित्य आणलं आणि चौपाईवर ठेवलं. आम्ही चहाचा आणि सोबतच्या खाद्यपदार्थांचा मंद गतीनं आस्वाद घेऊ लागलो. तेवढ्यात बाहेरचं दार थोडं किलकिलं झालं आणि बाहेरच्या माणसानं ‘ पेपर ‘ अशी आरोळी ठोकीत एक मराठी दैनिक आत टाकलं. मुलानं पेपर उचलला आणि पुन्हा कोचावर बसून तो चाळू लागला.
मी सकाळची वृत्तपत्रं बघितली नव्हती म्हणून मी मुलाला- मुकुलला कुतूहलानं विचारलं, ” मुकुल, काय बातमी आहे? मथळे वाच नुसते. ”
मुलानं वाचण्याचा प्रयत्न केला. चारपाच स्तंभांवर आडवा पडलेला तो मोठ्या अक्षरातील मथळा, पण त्याला तो धड वाचता येईना. प्रत्येक अक्षरावर तो अडखळू लागला.
त्याची ती त्रेधा पाहून मित्रानं त्याच्या हातातील वृत्तपत्र ओढलं आणि ते चौपाईच्या दिशेनं फेकून देत तो उद्गारला,
” अरे, तू त्याची परीक्षा पाहू नकोस. त्याला मराठी धड वाचता येत नाही. हा पेपर त्याच्या आईसाठी घेतो आम्ही. ”
” मराठी वाचता येत नाही?”
” नाही, नो मराठी रीडिंग, ओली इंग्लिश कम्स टु हिम. ”
” पपा, ” मुलगी उद्गारली, ” माइंड युवर इंग्लिश. ”
पपा पुन्हा हसले, ” इंग्रज लोकसुद्धा ढीगभर चुका करतात बोलताना. ”
इतका वेळ स्तब्ध बसलेली मित्रपत्नी मान वरती उचलून म्हणाली, ” पण मी म्हणते, घरात सारखं इंग्रजीत कशाला बोलायला हवं?”
” कशाला म्हणजे?” मित्र उत्तरला, ” तुला माहीत नाही? स्कूलची तशी ऑर्डर आहे मुलांच्या समोर तुम्ही त्यांच्याशी आणि इतरांशी फक्त इंग्रजी मध्ये बोला. ”
मुलं बाय बाय करीत निघून गेली. मित्रपत्नी चहाचा ट्रे घेऊन आत जाता जाता मला उद्देशून म्हणाली, ” तुम्हीच सांगा त्यांना काही, मी तर विटले आहे अगदी. ही तिघेजण घरात सारखं इंग्रजीमध्ये बोलतात. मी बावळटासारखं फक्त ऐकत असते. घराचं घरपणच नाहीसं झालंय. चार महिन्यांपूर्वी मुक्या तापानं आजारी होता, फणफणत होता. त्या तापात त्यानं एकदा ‘ आई ‘ म्हणून मला हाक मारली. मी सांगते काळजावर अमृताची धार पडल्यासारखं वाटलं मला. दोन-तीन वर्ष फक्त ‘ममी’ ऐकत होते. ”
ती बोलत बोलत आत निघून गेली. मित्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणाला, ” दॅट इज ऑल नॉनसेन्स. भाषा बदलली म्हणून रिलेशन्स डोंट चेंज. देवाला गॉड म्हटलं काय, अल्ला म्हटलं काय, तो देवच असतो. आय होप यू अॅग्री. ”
” मुळीच नाही, ” मी उत्तरलो, ” शब्द म्हणजे केवळ कोशातील एक निर्जीव नोंद नसते. शब्द माणसांच्या जीवनपद्धतीतून, म्हणजेच त्यांच्या संस्कृतीतून निर्माण झालेले असतात. त्यांना एक सांस्कृतिक आशय असतो. कोशातील अर्थापेक्षा हा अधिक असतो. ज्योतीच्या भोवती एक प्रकाशाचं वलय असतं त्याप्रमाणे हा अधिक आशय त्या शब्दांभोवती असतो. म्हणून भाषांतरित शब्दानं त्याचा विशिष्ट कोरडा अर्थ मनात निपजेल, पण त्याच्या या वलयाचा, भावनेचा ओलावा मनात उतरणार नाही. तू पंढरपूरला जातोस ना?”
” येस. नॉट आषाढी एकादशी, बट इन एव्हरी आषाढ मंथ आय गो देअर वन्स, सहकुटुंब. ”
” विठोबाचं दर्शन घेतोस?”
” ऑफ कोर्स. फॉर दॅट वुई गो. ‘ ‘
” मग तू आता जाशील तेव्हा, विठोबापुढे उभा राहून, ओ गॉड विठोबा, ओ माय मदर अँड फादर विठ्ठला, ओ हसबंड ऑफ रुक्मिणी, असं काहीतरी हात जोडून म्हण. ”
” छे, नॉनसेन्स! ”
” का? विठोबा कॉन्व्हेंट शाळेत गेला नसेल, पण तो सर्वव्यापी असल्यानं त्याला इंग्रजी नक्कीच कळत असेल. तुझी हाक, तुझी प्रार्थना त्याला समजणार नाही?”
” तसं नाही – पण… ‘ ‘
” तू काय म्हणशील? नेहमी काय म्हणतोस?”
” विठोबा, विठाई, माऊली, परमात्मा – असं काही हजारो लोकांसारखं, ” मित्र उद्गारला.
” याचाच अर्थ असा की, मी मघाशी म्हटल्याप्रमाणे शब्दांना आणि पर्यायानं भाषेला कोशार्थापेक्षा अधिक असा एक सांस्कृतिक आशय असतो. तू म्हणालास त्याप्रमाणे हजारो, लाखो लोक तो शब्द त्या अधिकार्थानं वापरत असतात आणि म्हणून त्या शब्दाच्या वा भाषेच्या दुव्यानं आपण त्यांच्याशी, म्हणजेच भोवतालच्या समाजाशी जोडले जातो. विठाई, माऊली, भक्तवत्सला असं म्हटल्याशिवाय तुला समाधान मिळणार नाही, आपण देवाशी जवळीक साधली असं वाटणार नाही. म्हणून तुझ्या पत्नीची तक्रार खरी आहे. मदर, मम्मी, डॅडी इत्यादी शब्दांनी फक्त नाती व्यक्त होतील, पण त्या नात्यातील ओलावा, जिव्हाळा, आर्तता व्यक्त होणार नाही. ती व्यक्त होतील, परस्परांच्या काळजापर्यंत पोचतील, ती आई, बाबा इत्यादी शब्दांनीच. ”
” देअर इज सम सेन्स इन युअर सेईंग. ”
‘ ‘ बॅड इंग्लिश अगेन, ‘ ‘ मी म्हणालो, ” पण त्यात काहीच बिघडत नाही. युरोपातून येणारे मिशनरी किंवा इतर राज्यांतील माणसे मराठी बोलताना हजार चुका करतात. परकी भाषा बोलताना महत्त्व व्याकरणाचं नसतं, तर मतलब समजण्याचं असतं. इथेही पुन्हा आपला न्यूनगंड आहेच. हिंदी राष्ट्र भाषा आहे, हिंदीत बोलताना मात्र चुका झाल्या तर आपल्याला त्याची दिक्कत वाटत नाही. पण इंग्रजीत बोलताना चुका केल्या तर अब्रह्य़ण्यम् असं ऐकणारे आणि बोलणारेही मानतात. ते असो, तू तुझ्या मुलांच्या आयुष्याचा असा नासाडा का करतोस?”
” नासाडा! माय गॉड!” मित्र उद्गारला, ” अरे, मी त्यांच्या शिक्षणावर दरसाल पंधरावीस हजार रुपये खर्च करतो. ”
” तुला आपला शाळकरी मित्र हरिहर आठवतो?”
” हो, त्याचं काय?”
” तो एका मोठ्या कंपनीचा डायरेक्टर आहे, तो दरसाल पंधरावीस हजार रुपये व्हिस्कीवर आणि जिनवर खर्च करतो. त्याहून जास्त मुद्दा हा की पैसे किती खर्च होतात यापेक्षा ते कशासाठी खर्च होतात याचा आपण विचार करायला हवा.
” यू मीन- हे व्यसन आहे?” मित्र उसळून उद्गारला.
” इष्टानिष्टाचा विचार करता. केवळ शेजारपाजाऱ्यांच्या संसर्गानं किंवा लाट आली म्हणून मुलांना टायपासून भाषेपर्यंत साहेब बनविण्याचा प्रकार करणं, आणि तोही न झेपणारा खर्च करून, हे एक व्यसनच म्हणायला हवं. ”
” पण मराठी भाषा फार बॅकवर्ड आहे. ”
” तुला ज्ञानेश्वर माहीत आहेत?”
” म्हणजे काय? माझ्या देवघरात ज्ञानेश्वरी आहे, तुकारामाची गाथा आहे. ”
” देवघरातील ते ग्रंथ इथे शेल्फमध्ये ठेव आणि ते अधूनमधून वाचायचा प्रयत्न कर. ज्ञानेश्वरांनी मराठीसंबंधी काय म्हटलं माहीत आहे?”
”काय? ”
” माझ्या म-हाटीची बोलू कौतुके । अमृतातेही पैजा जिंके ।! आणि ज्ञानेश्वर-तुकारामाच्या काव्यातच तिनं अमृतावर मात केली आहे. तिला आजच्या राजकीय, विज्ञानात्मक आणि आर्थिक व्यवहारापासून दूर ठेवून आम्ही-तिची मुलंच-तिला मागे रेटण्याचा, तिचा तेजोभंग करण्याचा, तिला मारण्याचा प्रयत्न करीत आहोत. ” पण नेहरू म्हणाले होते, इंग्रजी भाषा जगाच्या ज्ञानाकडे उघडणारी खिडकी आहे. ”
” आहे, पण खिडक्या हवेत बांधता येत नाहीत. त्यासाठी आधी घर बांधायला हवं. मित्रा, तू मुलांना इंग्रजी जरूर शिकव, शिकवायला हवं. पण त्यांचा मराठीशी, मायभाषेशी असलेला संबंध तोडू नकोस. तो सुरक्षित ठेव. हा संबंध सुटला तर ती देशात राहूनही परदेशी होतील. भाषेच्या द्वाराच माणसाच्या अस्तित्वाची सांस्कृतिक पाळंमुळं समाजात पसरलेली असतात. ती खणून काढणं म्हणजे सुसंस्कृत, समृद्ध जीवन त्यांना नाकारण्यासारखं आहे. ”
” लॉट ऑफ सेन्स इन युअर… ”
” सेइंग नव्हे-इन व्हॉट यू से. ”
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.