घराचे व्यवस्थापन करण्याची आणि महिन्याच्या बजेटमध्ये घर खर्च चालवून संसार नीटनेटका करण्याची कला आणि योग्य दृष्टी प्रत्येक महिलेमध्ये उपजतच असते. पण ज्यावेळेला मुद्दा आर्थिक व्यवहार आणि पैशाच्या गुंतवणुकीबद्दल उपस्थित होतो त्यावेळेला कधी कधी वेगळे चित्र समोर येते.
प्रसंग १. ‘या फॉर्मवर फुली केलेल्या जागी सही कर गं. तुला काही समजतं का त्यातलं? तू फक्त मी सांगतोय तिथे सही कर.’
प्रसंग २. ‘योजना काय आहे, कशी आहे, ते सर्व आमचे ‘हे’च बघतात. सही कुठे करायची आहे तेवढंच सांगा.
प्रसंग ३. रुपाली, एम.कॉम., सीएआयआयबी, वय वर्षे ५४, अविवाहित. बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यावेळी मिळालेल्या एकूण रकमेपैकी ९० टक्के रक्कम बँक मुदत ठेवीमध्येच गुंतवली जाते, कारण इतर गुंतवणुकीचे मार्ग उदा. शेअर्स, म्युचुअल फंड म्हणजे केवळ जुगार अशी (गैर)समजूत करून घेतलेली.
प्रसंग ४. मंगला, शिक्षण पाचवी नापास, व्यवसाय भाजीविक्री! दरमहा मिळकत साधारण १५ ते २० हजार. महिन्याचा खर्च वजा जाता जी काही बचत होते ती तांदळाच्या डब्यामध्ये लपवून ठेवावी लागते. भविष्यासाठी कोणतीही गुंतवणूक नाही, कारण तीन / चार हजार रुपयांची बचत गुंतवण्यासाठीसुद्धा योजना असतात याची माहितीच नाही. बचत गटामार्फत दोन / तीन संस्थांकडून कर्जे घेतलेली. एक कर्ज फेडायला दुसरे, दुसरे कर्ज फेडायला तिसरे….. अशा रीतीने कर्जाच्या विळख्यात सापडलेली!
महिलांच्या आयुष्यात घडणारे आर्थिक व्यवहारांशी निगडित हे वेगवेगळे प्रातिनिधिक प्रसंग…. पती आपल्या पत्नीला गुंतवणूक योजनेविषयी जी आवश्यक माहिती द्यायला पाहिजे ती देत नाही; शेअर्स / म्युचुअल फंडामधील गुंतवणुकीबद्दल नकारात्मक पूर्वग्रह असतात. आज महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. गुंतवणूक नियोजन, शेअर मार्केट, म्युचुअल फंड, प्राप्तिकर नियोजन या आर्थिक विषयांमध्ये महिला माहिती घेतानाही दिसतात आणि त्यानुसार गुंतवणूक करतानाही दिसतात. पण ही टक्केवारी खूप कमी आहे हे अधोरेखित करावे लागेल.
अगदी नोकरी करणाऱ्या महिलांमध्येसुद्धा हे प्रमाण खूप कमी आहे. स्त्री, मग ती नोकरी करणारी असो, व्यवसाय करणारी असो किंवा अगदी गृहिणी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, तिने या विषयांमध्ये रुची घ्यायलाच पाहिजे. गुंतवणूक, म्युचुअल फंड, विमा, कर्ज, प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी या विषयांवर जास्तीत जास्त महिलांनी अर्थसाक्षर होणे ही काळाची गरज आहे. गुंतवणूक नियोजनासारख्या विषयाकडे किती महिला स्वतःहून लक्ष देतात? किती महिला त्यांच्या स्वतःच्या आयुष्यचक्रातील आर्थिक उद्दिष्टांबद्दल जागरूक आहेत?
स्त्रीचा आर्थिक व्यवहारांबाबत सहभाग हा केवळ बँकेतून पैसे काढणे, चेक भरणे, वीज / फोनचे बिल भरणे एवढ्यापुरताच मर्यादित असता कामा नये. विविध गुंतवणूक योजना, त्यांचे फायदे-तोटे, आरोग्यविमा योजना, आयुर्विमा योजना, पेन्शन योजना, प्राप्तिकर बचत योजना, कर्ज इ. विषयांबद्दल स्त्रियांनी माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. एकदा का गुंतवणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालो की आपल्यावर अतिरिक्त आर्थिक जबाबदारी येणार असे अनेक महिलांना वाटते. या (चुकीच्या) विचारसरणीतून दिसून येते ती एक प्रकारची उदासीनता! या उदासीनतेपोटी महिलांना गुंतवणूक विषयांचे महत्त्व वाटत नाही.
गुंतवणूक नियोजन हे फक्त घरातल्या पुरुषाचेच काम ही मानसिकता सोडून दिली पाहिजे. आपले वय, कौटुंबिक पाश्र्वभूमी, आपल्या कामाचे स्वरूप, आपले उत्पन्न आणि जोखीम घेण्याची क्षमता हे लक्षात घेऊन गुंतवणूक नियोजन केले पाहिजे. सुदैवाने आजच्या काळात आयुष्यचक्रातील आर्थिक उद्दिष्टे साध्य करायला विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. आपल्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता होण्यासाठी विविध गुंतवणूक योजनांची माहिती घेऊन प्रत्यक्षात गुंतवणूक झाली तर आर्थिक समस्या निर्माण होणार नाही.
तुमची आर्थिक उद्दिष्टे
एक सोपी सुलभ पद्धत म्हणजे सर्वप्रथम आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा. उदाहरणार्थ, मुलांच्या शिक्षणासाठी / लग्नासाठी तरतूद, घरखरेदी, वाहनखरेदी, उतारवयासाठी नियमित उत्पन्नाची तरतूद इ. आर्थिक उद्दिष्टे तीन प्रकारात विभागता येतील – अल्पकालीन म्हणजे एक ते तीन वर्षांसाठी, मध्यमकालीन म्हणजे तीन ते पाच वर्षांसाठी आणि दीर्घकालीन म्हणजे पाच ते वीस वर्षांसाठी. आजच्या काळात या प्रत्येक उद्दिष्टासाठी गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. दीर्घकाळात संपत्ती निर्माण करायची असेल तर उत्तम गुणवत्ता असलेल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवावेत. प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची मानसिकता नसल्यास म्युचुअल फंडाद्वारे तुमच्यासाठी निष्णात फंड व्यवस्थापक पैसे गुंतवतात. मुलांच्या शिक्षणासाठी / लग्नासाठी तरतूद करण्यास हा एक चांगला पर्याय आहे. उतारवयासाठी तरतूद करायची असेल तर राष्ट्रीय पेन्शन योजना आहे. महिलांच्या वयोमानानुसार विविध गुंतवणूक योजनांचे ढोबळ विचार या लेखात मांडले आहेत.
महिन्याला मिळणाऱ्या पैशातून जर स्त्री घर चालवू शकते तर तेच नैपुण्य ती गुंतवणूक नियोजनामध्येसुद्धा दाखवू शकते. त्यासाठी गरज आहे ती थोड्या अभ्यासाची, माहिती घेण्याची आणि ‘हे सुद्धा मी करू शकते’ या आत्मविश्वासाची! आणि त्या दृष्टीने तिने पाऊल उचलले तर तिच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण न होता आर्थिक समृद्धीचा झोका कायम उंचच राहील हे निश्चित!
आयुर्विमा आणि आरोग्य विमा
अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे आयुर्विमा आणि आरोग्य विमा. या दोन विषयांबाबतसुद्धा महिलांना पुरेशी माहिती नसते. खरं तर आजकालचे धकाधकीचे जीवन पाहता या दोन विषयांबाबत महिलांनी जागरूक होणे महत्त्वाचे आहे. आयुर्विम्याचा विचार करताना आर्थिक जोखीम भरून निघेल अशी योजना घेणे आवश्यक आहे. इथे मला बोनस किती मिळेल किंवा मुदत संपल्यावर किती रक्कम मिळेल हा विचार योग्य नाही. आणि म्हणून आयुर्विमा घेताना टर्म इन्शुरन्स घ्यावा, ज्याचा उद्देश त्या व्यक्तीला तुलनेने कमी प्रीमियममध्ये जास्तीत जास्त काळासाठी मोठ्या रकमेचा आयुर्विमा मिळू शकतो. या मूळ पॉलिसीला गंभीर आजार किंवा अपघाती विमा असे जोड रायडर्स घ्यावेत. म्हणजे दुर्दैवाने तसे काही घडल्यास तोही खर्च आयुर्विमा कंपनीतर्फे केला जातो. आयुर्विम्याकडे निव्वळ गुंतवणूक म्हणून पाहू नये.
आजकाल आजारपण आल्यास हॉस्पिटलमध्ये प्रवेश घ्यावा लागला तर खर्च खूप येतो. याचा विचार करता प्रत्येक महिलेने आयुर्विम्याबरोबरच आरोग्य विमा योजना घेणे आवश्यक आहे. आरोग्य विमा तुम्ही जेवढा लवकर घ्याल तेवढा प्रीमियमचा हप्ता कमी बसेल.
MWP ACT : Married Woman Property Act
जेव्हा एखादा विवाहित पुरुष आयुर्विमा पॉलिसी घेतो, तेव्हा सर्वसाधारणपणे आपल्या पत्नीला नॉमिनी नेमतो. आपल्या पश्चात आयुर्विम्याचे पैसे उर्वरित आयुष्यासाठी आपल्या पत्नीला मिळावेत हा त्यामागचा उद्देश! पण बऱ्याचदा कुटुंबातील इतर व्यक्तींकडून या पैशांवर हक्क सांगितला जातो. किंवा कधी कधी पती पत्नीला अंधारात ठेवून नॉमिनेशन बदलून दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे नॉमिनेशन करतो. किंवा ती आयुर्विमा योजना तारण ठेवून कर्ज घेतो. अशा वेळी आयुर्विम्याचे पैसे त्या महिलेला मिळण्यात अडचणी येतात. हे टाळण्यासाठी एक उपाययोजना महिलांसाठी उपलब्ध आहे. ती म्हणजे एमडब्ल्यूपी अॅक्टखाली आयुर्विमा पॉलिसी! एमडब्ल्यूपी (कायदा) म्हणजे मॅरिड वूमन प्रॉपर्टी अॅक्ट. हा कायदा १८७४ पासून म्हणजे गेली १४३ वर्षे आपल्या देशात अस्तित्वात आहे… पण त्याविषयी अनेक महिलांना माहिती नाही. त्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः
- पॉलिसीचे मिळणारे सर्व पैसे हे एका ट्रस्टला जातात. हे पैसे परित्यक्ता, विधवा, अविवाहित महिला तसेच अपंग व विशेष मुलांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठीच वापरले जातील, याची काळजी घेण्याची जबाबदारी ही त्या ट्रस्टची असते. हा ट्रस्ट म्हणजे एखादी व्यक्ती, संस्था, बँक असू शकते.
- या प्रकारच्या पॉलिसीवर पॉलिसी घेणाऱ्या पतीचा कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क असत नाही. पती या पॉलिसी तारण ठेवून किंवा हस्तांतरित करून कर्ज काढू शकत नाही, तसेच काही ठोस कारण असल्याशिवाय (जसे की पत्नीचा मृत्यू किंवा घटस्फोट) नॉमिनी म्हणून असलेले पत्नीचे नाव बदलू शकत नाही.
- (या पॉलिसी कोणत्याही कोर्ट केसेसला ‘अॅटॅच’ करता येत नाहीत. फक्त प्राप्तिकर विभागालाच प्राप्तिकर वसुलीसाठी या पॉलिसीला हात लावता येतो.
त्यामुळे महिलांनी एक तरी पॉलिसी मॅरिड वूमन प्रॉपर्टी अॅक्ट खाली घ्यावीच.
आयुर्विमा असो अथवा आरोग्य विमा एक गोष्ट महिलांनी लक्षात ठेवावी. ती म्हणजे ‘आयुर्विमा आणि आरोग्य विमा हे पॅराशूटसारखे आहेत. अपघात घडला आणि गरज लागली तर त्याचा हमखास उपयोग होतो.’