ग्लोबल जगात वागावं कसं?

Published by अविनाश धर्माधिकारी on   October 25, 2017 in   मराठी लेखणी

ग्लोबल जगात जगणं,वागणं ही आपणा भारतीय(त्यात आपण मराठी आलोच) माणसांसाठी अगदी उस्फूर्त, सहजसाध्य अशी गोष्ट आहे.

‘ग्लोबल’ या शब्दामध्ये एकत्र आलेलं, एकमेकांशी जुळलेलं जग(Interconnected), एकमेकांवर अवलंबून असून (Interdependent), अंतिमत: ते एकरुप, एकात्म असं विश्व तयार होतं.

तर आपल्याला संस्कृतीच्या उष:कालापासूनच कळलेलं आहे की, सारं विश्वमूळ एकाच चैतन्यापासून बनलेलं आहे. भोवतालचं विश्व म्हणजे त्या ‘एका’नं धारण केलेली ‘अनेक’ रुपं आहेत. म्हणून जे वेगवेगळं आहे (वाटतं), वैविध्यपूर्ण आहे, ते परस्परविरुद्ध नाही, उलट परस्परपूरक आहे, परस्परावलंबी आहे हे भारतीय(मराठी) मनाला, बुद्धीला समजलेलं आहे.

‘एकं सद विप्रा: बहुधा वदन्ति’ – सत्य एक आहे, जाणकार त्याला विविध नावांनी ओळखतात – या एका विधानात भारतीय मनाची ‘ग्लोबल’ जाणीव व्यक्त होते. म्हणूनच वेगळेपणा किंवा विविधतेला आपण विरोधी समजत नाही, उलट विविधतेचं आपण स्वागत करतो, आदर करतो. वरवर वाटणाऱ्या विविधतेमध्ये मुळातली एकात्मता लपलेली आहे हे समजल्यामुळेच आपण सहिष्णु आणि सर्वसमावेशक समाज आहोत. ‘अद्वैता’च्या जाणिवेतून आकाराला येणारी ही सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता हेच ‘ग्लोबल’ जगात जगण्या-वागण्याचं सर्वात महत्त्वाचं सूत्र आहे.

‘वसुधैव कुटुम्बकम्’

सारं विश्वच – ही पृथ्वी एक कुटुंब आहे – (केवळ बाजारपेठ नाही) अशी आपली धारणा आहे.

‘आ. नो. भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः’

साऱ्या विश्वातून चांगले विचार आमच्याकडे येऊ देत, अशी आपली वेदकाळापासून प्रार्थना आहे.

‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम्’ –

आम्ही सारं विश्व सुसंस्कृत करु अशी आपली जगण्याची, वागण्याची दिशा आहे.

‘ग्लोबल’ जगात जगण्यावागण्याच्या सूत्राचा उच्चार आद्य शंकराचार्यांच्या ‘स्वदेशो भुवनो त्रयः’

तिन्ही लोक – म्हणजे सारे जग – हा माझा स्वदेश आहे, या विधानात होतो.

ज्ञानोबा माऊलींनी या सूत्राचं ‘देशीकार लेणे’ घडवलं ‘अवघे विश्वचि माझे घर’ या ‘ग्लोबल’ ओवीमध्ये.

म्हणून ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ आणि ‘भवतु सब्ब मंगलम्’

सर्वांचंच कल्याण होवो – सर्वांचं – केवळ माझ्या विशिष्ट कुटुंब – जात – देश – धर्म पंथाचं नाही.

सर्वांचं कल्याण ही आपली ग्लोबल जगातलीसुद्धा जगण्या-वागण्याची संस्कृत – प्राकृत प्रार्थना आहे; अस्सल भारतीय श्रद्धा आहे. जीवनात जे करायचं ते आधी विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करून, मग आपापल्या जीवनातली छोटी-मोठी कृत्यं करायची. राष्ट्रीय एकात्मता आणि विश्र्वबंधुत्व या गोष्टी आपल्यासाठी परस्परविरुद्ध नाहीत. म्हणून ‘ग्लोबल’ जगात जगणं, वागणं आपल्यासाठी सहज, उत्स्फूर्त आहे.

या जगाच्या ‘ग्लोबल’ असण्याला आता अत्याधुनिक अर्थ प्राप्त झालेला आहे. इंटरनेट, अणुविज्ञान, अवकाशविज्ञान यांनी जग जोडलं – जोडलेल्या जगाला तंत्रज्ञानाचा आधार आला. आता जेनेटिक्स, नॅनोबायोटेकसहित रोज प्रचंड वेगानं होणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीनं जग पूर्वी कधी नव्हतं एवढं जोडलंय, ‘ग्लोबल’ झालंय.

दोन भाषांवर प्रभुत्व

या ग्लोबल जगात, आपले प्रत्येकाचं किमान दोन भाषांवर प्रभुत्व हवे. इंग्लिश – ही जगाची संपर्क, दळणवळण, व्यापारउदीम, विज्ञान-तंत्रज्ञानाची भाषा म्हणून आणि आपली मूळ आई, आपली माती, आपली संस्कृती म्हणजे आपल्यापुरतं बोलायचं तर ‘मराठी’ – दोन्ही भाषांवर प्रभुत्व हवं. इंग्लिश न शिकता आपण मराठीचा आग्रह धरला तरी आपण मर्यादून जाऊ. उलट ग्लोबल होण्याच्या नावाखाली इंग्लिश शिकण्याच्या नादात मराठी विसरलो तर आपली स्थिती दोर तुटलेल्या पतंगासारखी होईल. म्हणून दोन्ही भाषांवर प्रभुत्व हवं.

‘भाषा मरता देशही मरतो । संस्कृतिचाही दिवा विझे’ हा कुसुमाग्रजांनी दिलेला ‘फटका’ लक्षात ठेवूया, आपल्या जीवनात आणूया. माणूस एक भाषा शिकतो म्हणजे केवळ शब्द किंवा व्याकरण शिकत नाही, तर एक संपूर्ण संस्कृती-विचारपद्धती-जीवनपद्धती शिकतो. भाषा शिकणं म्हणजे माहितीचे पृथक्करण करणारं, अर्थ लावणारं असे मेंदूचं ‘न्यूरल नेटवर्क’ तयार करणं. माणूस जेव्हा दोन भाषा शिकतो. तेव्हा मेंदूच्या ‘न्यूरल नेटवर्क’ च्या शक्तीचा ‘वर्ग’ होतो असे आता विज्ञानानं सिद्ध केलंय. म्हणून आपलं ‘ग्लोबल’ असणं अर्थपूर्ण आणि आनंदी होण्यासाठी किमान दोन भाषांवर प्रभुत्व मिळविण्याचं भान आणि कर्म करुया – मराठी आणि इंग्लिश !

योग आणि स्वाध्यायासोबतच विदेशी तंत्रज्ञान आणि वित्त यांचा मेळ बसला तर आपण ग्लोबल जगात, आपापल्या क्षेत्रात ‘ग्लोबल’ – जागतिक दर्जा गाठू शकू. जागतिक स्पर्धा हे तर आजचं एक वास्तव आहे. आपल्याला त्याचं भान आणि कर्तृत्व मिळवायला हवं. इथे मुख्य मुद्दा कीर्ती, प्रसिद्धी, पद, पैसा यांचा नाही, ही सर्व माणसाला जीवनाच्या प्रवासात मध्ये भेटणारी स्टेशनं आहेत, ती कधी भेटतील – दुर्दैवानं कधी नाही. पण उत्तमता आणि प्रतिभेकडचा प्रवास सतत चालू ठेवूया.

असं झालं, तर जगणं हा उत्सव बनेल आणि जीवन आनंदी होईल. सृजनशील आनंदानं जगणारा, वागणारा प्रत्येक जण ग्लोबल जगाच्या आनंदात भर घालेल. ग्लोबल जगात वागताना ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ या प्रार्थनेला आपल्या जगण्यातून असा आधुनिक अर्थ व्यक्त होईल.


 – अविनाश धर्माधिकारी | कालनिर्णय जुलै २०१७