मी रोज सकाळी झोपेतून उठल्या उठल्या काय करत असेन तर मोबाईल सुरू करून फेसबुक आणि व्हॉट्सअॅप चेक करतो. आपण झोपलेलो असताना जगात काय काय घडले याचा एकदा आढावा घेऊन झाला की मगच मी टूथब्रश दाती धरतो. सकाळी सकाळी कोणाकडून तरी दवबिंदूने भिजलेली फुले, फुलपाखरे, वाफाळलेला चहाचा कप, असे काहीतरी गुड मॉर्निंगसोबत येतेच. त्यातले जे आवडेल ते किंवा मनाला येईल ते, शेवटाला आपले नाव जोडून पाचपन्नास लोकांना फॉरवर्ड करून टाकायचे. बघत बसा लेको!
अशा प्रकारे इकडून आलेले तिकडे फॉरवर्ड करताना नेहमीच माझ्या डोळ्यांपुढे, साड्यांचे कपाट उघडून, विचार करत उभी असलेली पाठमोरी बायको उभी राहते. ‘कुसुमताईंकडून आलेली साडी शांताताईंना द्यायची, शांताताईंकडून आलेली साडी विमलताईंना द्यायची आणि विमलताईंकडून आलेली साडी कुठली आहे ते बरोब्बर लक्षात ठेवून कुसुमताईंना द्यायची.’ यात जरा जरी चूक झाली आणि ज्या ताईंकडून साडी आली त्याच ताईंना किंवा वहिनींना जर ती परत गेली, तर एक नातेवाईक नेहमीसाठी गमावून बसण्याची भीती असते. तसे, एखाद्याकडून आलेले फॉरवर्ड त्याच व्यक्तीला परत गेले तर अख्ख्या व्हॉट्सअॅपच्या जगतात आपली बदनामी होऊ शकते, म्हणून सांभाळून राहावे लागते.
सकाळी उठल्यावर कुणालाही आपण ‘गुड मॉर्निंग’ किंवा ‘शुभ प्रभात’ पाठवले नाही, कुणाचे आपल्याला आले नाही, तर या जगात आपले कुणीही नाही, अशी भावना होऊन सकाळी सकाळी कंठ दाटून येतो, डोळ्यांत पाणी येते. ‘जगी ज्यांस कोणी नाही, त्यांस देव आहे’ वगैरेंसारखी गाणी आठवू लागतात. एखाद्याला जर असे वाटत असेल की व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठविणे खूप सुखाचे आहे, तर त्याला व्हॉट्सअॅपमुळे जीव किती खाली-वर होतो याची काहीच कल्पना नाही, असे म्हणावे लागेल.
आपण एखाद्याला सकाळी सकाळी गुड मॉर्निंगचे चित्र पाठवले आणि त्या चित्राखाली बरोबरची फक्त एकच खूण उमटली तर दुसरी खूण उमटत नाही तोवर चहाचा घोट घशाखाली उतरत नाही. ‘मेसेज का पोहोचत नाही?’ ‘ठीक तर असेल ना सगळे?’ ‘काल रात्री गुड नाईटचा मेसेज तर नीट पोहोचला होता याला, मग आता गुड मॉर्निंगचा का नाही पोहोचत?’ शिवाजी महाराज सिंहगडावर पोहोचल्याचा मेसेज मिळाल्यावर बाजीप्रभूला किती आनंद झाला असेल याची खरी कल्पना मला व्हॉट्सअॅपशी ओळख झाल्यावरच आली. बरोबरची फक्त एक खूण म्हणजे आपल्याकडून मेसेज गेला, एका खाली एक बरोबरच्या दोन खुणा म्हणजे पोहोचला आणि या खुणांचा रंग निळा झाला, याचा अर्थ मेसेज त्या व्यक्तीने पाहिला. पाहिला म्हणतोय मी, वाचला असे म्हणत नाही. कदाचित काही दिवसांनी वाचल्याची वेगळ्या रंगाची खूणही जन्माला येईल. एखाद्याने पाठविलेला मेसेज आवडला नाही तर बरोबरच्या खुणा उलट होण्याची तांत्रिक व्यवस्था जन्माला आली तर फारच बरे. ‘नाथा घरची उलटी खूण’ म्हणजे नेमके काय याचा उलगडा तरी होईल. जगात अनेक भाषा मृत्युपंथाला लागलेल्या असताना व्हॉट्सअॅपने जगाला एक नवी भाषा दिली.
एका नंबरवरून मला रोज व्हॉट्सअॅपवर गुड मॉर्निंगचे मेसेजेस् न चुकता येत होते. मीही त्या नंबरला रोज उत्तर देत होतो. नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेला नव्हता म्हणून त्या नंबरसोबतचा फोटो पाहण्याचा प्रयत्न मी केला, तर डीपी म्हणून त्या व्यक्तीने ‘चणे खात असलेल्या माकडाचा’ फोटो ठेवलेला होता. माकडाने व्हॉट्सअॅप वापरावे एवढे तंत्रज्ञान अद्याप नक्कीच पुढे गेलेले नाही. मग एकच शक्यता होती की ही व्यक्ती बहुधा अलीकडेच महाबळेश्वरला जाऊन आली असावी. मग आपल्या ओळखीतील अलीकडे महाबळेश्वरला कोण गेले होते हे आठवण्याचा प्रयत्न मी सुरू केला. पण काही लिंक लागत नव्हती.
बरे, रोज आपण ज्या व्यक्तीच्या गुड मॉर्निंगला उत्तर देतो, तिलाच, तुम्ही कोण असे विचारणेही बरे दिसत नव्हते. डीपी म्हणून साधा सरळ स्वतःचा फोटो न ठेवता फुले, पाने, हत्ती, घोडे, माकड असे काहीबाही ठेवणाऱ्यांचा मला भयंकर राग आहे. अनेक जण तर स्वतःच्या फोटोऐवजी दीपिका, प्रियांका चोप्रा यांचेही फोटो ठेवतात. एखाद्याला शाहरूख खान आवडतो म्हणून ती व्यक्ती काही स्वतःच्या दारावर शाहरूख खानच्या नावाची पाटी लावत नाही. मग स्वतःच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटचा डीपी म्हणून स्वतःचा फोटो लावायला काय जाते यांचे? अर्थात फोटो लावणारेही अनेकदा आपल्याला फसवतातच. माणूस, म्हणजे त्यात बायकाही आल्याच. कधी कधी एखाद्या फोटोत, एखाद्या अँगलने चुकून सुंदर दिसतो. तर बायका, असे सुंदर फोटो निवडून डीपी म्हणून ठेवतात, आपण ते लक्षात ठेवतो आणि त्या प्रत्यक्ष भेटल्या की घोर निराशा होऊन अख्खा दिवस उदास जातो.
तर, मला ज्या नंबरवरून रोज गुड मॉर्निंगचा मेसेज यायचा, त्याच्या नावाबाबतची माझी शोधमोहीम सुरू होती. अखेर शेजारच्या मनोहरपंतांशी बोलताना एकदा ट्रुकॉलर नावाचे अॅप असल्याचे कळले. ते मी डाऊनलोड करून घेतले आणि तो नंबर तिथे टाकला तेव्हा लक्षात आले की ज्याच्याकडून आपण महिन्याचे सामान नेहमी उधारीवर आणतो, त्या वाण्याचा हा नंबर आहे. त्यानंतर मी त्याच्या दुकानात गेलो तेव्हा ‘‘महाबलेश्वर जाके आया लगता है’’ असे आपले हिंदीत विचारून टाकले. तर तो म्हणाला, ‘‘इधर जो चना मैं पांच रुपये में बेचता है ना, उधर उतना मेरे को पच्चीस रुपये में लेना पड़ा, वो भी बंदर को खिलाने के लिये.’’ ‘‘उसकोच तो महाबलेश्वर बोलते है’’ असे काहीतरी मी त्यावर बोललो. ‘पण डीपी म्हणून माकडाचे चित्र टाकणाऱ्या भैयाला असा फटका बसला ते बरेच झाले,’ असे मी मनातल्या मनात म्हणालोच.
आपल्या समाजातला एक मोठा वर्ग आहे ज्याला निवृत्तीनंतर काय करावे असा प्रश्न पडतो. त्यांना पुस्तके वाचण्यात, गाण्यांच्या कार्यक्रमात रस नसतो, कारण त्यात फुकट वेळ जातो, असे त्यांचे म्हणणे असते. त्यांना टीव्ही पाहता येत नाही, कारण मुलगा, सून, नातवंडे यांच्या तावडीतून टीव्ही सुटत नाही. ज्या लोकांना वेळ कसा घालवावा असा प्रश्न पडतो, त्यांना व्हॉट्सअॅपने चांगलाच हात दिला आहे.
एका आजोबांना मी आपले सहज म्हणून विचारले, ‘‘हल्ली काय चाललेय?’’ तर ते म्हणाले, ‘‘व्हॉट्सअॅप वर आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून आणि डिलीट करून कसातरी दिवस ढकलतो आहे.’’ अनेक जण दिवसाला पाचपंचवीस फोटो टाकतात. कधी कधी तर एकाच कार्यक्रमाचे बदाबदा पन्नासेक फोटोही टाकतात. यावर सरकारने बंधने आणली पाहिजेत, असे मला वाटायचे. परंतु केवळ व्हॉट्सअॅपवरचे फोटो डिलीट करून कुणीतरी दिवस ढकलू शकतो, हे कळल्यावर मी शेकड्याने फोटो टाकणाऱ्यांचा राग करणे सोडून दिले.
एखादा फोटो किंवा व्हिडिओ डाऊनलोड होताना वर्तुळाकार फिरणारी आणि हळूहळू भरत जाणारी हिरवी रेषा ही मला आता हिरव्या मनाचे प्रतीक वाटते. डीपी बघणे, व्हॉट्सअॅपवर उत्तरे देणे, फॉरवर्ड्स वाचणे, वाचून फॉरवर्ड करणे, फोटो-व्हिडिओ पाहणे यात लाखो-करोडो लोकांचा वेळ जातो. म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या मी आधी मोबाईल सुरू करतो.