देवळाबाहेरचा माणूस

Published by Vapu Kale on   March 24, 2017 in   मराठी लेखणी

मन आनंदानं वाहू लागलं, म्हणजे मला देवळात जावंसं वाटतं. कोणत्याही गरजेसाठी, याचनेसाठी, कुणासमोर तरी उभं राहावं लागणं, यासारखी मानहानी नाही.  निरपेक्ष  भेटीची शान वेगळीच असते. किंबहुना तीच खरी भेट.  आयुष्यातल्या मागण्या संपणं ही आनंदपर्वणी. मी देवळात  जातो. सरळसरळ मान वर करून आराध्यदैवताचा चेहरा पाहतो. याचना नाही, मग खाली मान कशासाठी?

म्हणूनच देवळातून बाहेर पडताना, मी जास्त हलका होतो. मागण्या नाहीत म्हणून नवस बोलल्याची खंत नाही. फेडायची धास्ती नाही. माझी देऊळ- भेट म्हणजे, न मागता जे जे मिळालं, त्याची ती ACKNOWLEDGEMENT सारखी पावती असते.  देवळाच्या समोर तो बसलेला असायचा. जेमतेम आठ बाय दहाच बैठं कौलारू घर. समोर एक कट्टा. म्हणजे वाढवलेला PLINTH. तिथं एक कापडी फळा. त्यावर कोणतं ना कोणतं संतवचन. संतवचनं फार परिचयाची झाली की रक्तात मुरत नाहीत. “हरी मुखे म्हणा । हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी । । ” अशा वचनांकडे मी चित्र बघावं, तसं बघतो.

एक दिवस मात्र थबकलो.

 हम खोज रहे है उसे, जो आसपास है!

यह जिंदगी अपने लिये घर की तलाश है! ”

ते वाचलं आणि फकिरासमोर जाऊन बसलो.

नमस्कार केला.

“ काय सेवा करू?” त्यानं विचारलं

“ या ओळींचा अर्थ हवाय. ”

“ तो अर्थ अनेकजण शोधताहेत. ”

“ अनेक? म्हणजे कोण कोण?”

“ एअरकण्डिशण्ड गाड्यांतून कैक भिकारी वर्षभर येतात. मला साधू समजतात. न मागता काही ना काही देतात. न मागताच भरपूर मिळतं. उरलेलं वाटून टाकतो. ”

“ भिकारी का म्हणता?”

“ तुमचं भिक्षापात्र मोठं आहे, रत्नजडित आहे, म्हणून तुम्ही सम्राट नव्हेत, सिकंदर पण भिकारी होता. जेवढी मोठी मागणी तेवढा मोठा भिकारी. घर हरवलेला भिकारी, सगळा जन्म घर शोधण्यात जातो. सिकंदराचाही. ”

“ माझ्या लक्षात आलं नाही. ”

“ खूप सोपं आहे, म्हणून समजलं नाही. सगळं जग जिंकलं म्हणजे काय? – दगड, माती, विटा. कारण घराचा अर्थ समजला नाही. माणसाला हवं असतं प्रेम, त्याऐवजी तो घर बांधतो. तीन तीन गाड्या घेतो. कमिशनरपासून मंत्र्यांना खिशात ठेवतो. ती चटावलेली माणसं करोडो रुपये खिशात घालतात, जमिनी तोडून देतात, पण त्या माणसाला आपलं मन देत नाहीत. सत्ता बदलली की नवे उंबरे. आजूबाजूला वावरणारी जिवंत मनं, खळाळणारे प्रेमाचे झरे त्यांना दिसत नाहीत. तुफान प्रेम करणारी जितकी माणसं जोडाल, तेवढी घरं तुमची झाली. भक्तीच्या अलीकडची प्रेमाची पायरी जिंका, पुढच्या पायरीवर परमात्मा आहे. ”

“ परमात्मा म्हणजे नेमकं कोण?”

“ परमात्मा हा माझ्याही प्रचीतीचा भाग नाही. पण शांत मन म्हणजे परमात्मा. शांत मन म्हणजेच देऊळ. ”

“ माणूस शांत आयुष्य का जगू शकत नाही?”

“ त्याला स्वतःचं आयुष्य नसतंच. ”

“ म्हणजे?”

 जो भी मिला वो एक उस टुकडा ले गया ।

जुडता नहीं किसीसे भी, यह मन उदास है । ”

“ आता याचा अर्थ सांगतो. आपल्या आयुष्याचे सातत्यानं तुकडे होतात. आई, बाप, भावंडं, पुढे पती किंवा पत्नी, मुलं आणि शिवाय तुम्ही जोडाल तेवढी माणसं. अखंड मन शांत असतं. तुम्ही जोडलेली माणसं एकेक तुकडा घेऊन जातात. खंडित मन शांत कसं राहील सांग?”

“ नातेवाईक, समाज यांच्यात राहून मन शांत ठेवायचा उपाय आहे?”

“ प्रत्येक माणूस म्हणजे एकेक अपेक्षा. स्टेशनवरच्या हमालाशी नातं किती मिनिटांचं असतं? पण तेवढ्या मिनिटांतही तो मनस्ताप देतो. मग आयुष्याच्या शेवटी माणसं जोडूनही मन अशांत राहतं. ”

“ उपाय सांगता ना?”

“ दुसऱ्यानं कसं वागायचं, हे तुम्ही ठरवायला गेलात की तेवढा तुकडा गेला. आयुष्य खंडित, उदास झालं. तुम्ही देणारे व्हा. घेणारे झालात की प्रवाह खंडित झाला. न मागता, देणारे व्हा. मग आयुष्य वाढत राहतं. पात्र मोठं होता होता, किनारे नसलेला सागर होतो. समुद्राला कधी उदास पाह्यलंत? मागणारे देवळात येतात. न मागणारे स्वतःच्याच गाभाऱ्यात कृपा असतात. ”

जेवढ्या माणसांना संसारात विसंवादी साथीदार मिळाले, त्या सगळ्यांचं होमकुंड आठवून मी विचारलं,

“ माणूस खरंच कुणासाठी जीव टाकत नाही?”

प्रेम आणि भक्तीच्या वर नेणाऱ्या ओळी फकिरानं ऐकवल्या.

“ जितने भी उज्वल ख्याब थे, रात बन गये । ”

फिर भी न जाने, कौनसे सुबह की आस है । ”

“ किती उज्वल भविष्याची स्वप्न पाह्यलीस?”

“ अगणित. ”

“ त्यांचं काय झालं?”

“ पुन्हा रात्रीच्या अंधारात त्यांचं रूपांतर झालं. ”

“ तुमचं सुप्त मन, एक दैवीशक्ती, तू कोण होऊ शकशील, त्याची झलक दाखवतं. सूर्यप्रकाशात ती स्वप्न साकार करायची जिगर हवी. आणि ही जिगर देवळांच्या रांगेत मिळत नाही.”

“ तुम्ही देवळासमोर राहता. याच परिसरात. कधी देवळात जाता?”

“ एकदाही नाही, पण त्या कृष्णाच्या मूर्तीची मी खडान्‌खडा माहिती सांगू शकेन. ”

“ आपलं नाव?”

“ सम्राट शहेनशहा – म्हणशील ते. ”

“ खरं नाव?”

“ हीच खरी नावं. ज्याच्या जीवनातल्या मागण्या संपल्या तो सम्राटच. ”

आणि त्यानंतर खरोखरच त्या सम्राटानं माझ्यासमोर शब्दातून शिल्प उभं केलं. मूर्तीची उंची, मुकुट, दागदागिने, भावमुद्रा, हातातली बासरी, त्यावरची बोटं त्यानं प्रत्यक्ष पोज घेऊन दाखवली.

“ इतकं अचूक सांगताहात, प्रत्यक्ष देवळात का नाही गेलात?”

“ मला मूर्तीकडे पाह्यलं की चैतन्यशून्य संगमरवरी दगड दिसतो. त्या मूर्तीपेक्षा, समोरचं तळं, कारंजी, मासे, बदक, फुलं, वाऱ्यानं  हलणारी झाडं आणि मघाशी मी ज्यांना एअरकण्डिशण्ड भिकारी म्हणालो ना तिथंच तो चैतन्यानं दिसतो. ”

“देवळात येणाऱ्यांना आपण भिकारी का म्हणता?”

“ त्याच्याजवळ देण्यासारखं प्रचंड आहे. यांच्या – मागण्या क्षुद्र आहेत, म्हणून न मागता किती मिळालंय, हे त्यांना दिसत नाही. ”

“ वर्णन कसं केलंत मूर्तीचं?”

“ मीच त्या मूर्तीचा शिल्पकार आहे. ”

मी उडालोच.

“तरी तुम्ही असे, इथे?”

“ मी ही मूर्ती घडवली. पण ती विकली जाईना. माझं सगळं चैतन्य मूर्तीत ओतून मी रिकामा झालो होतो. मग ती मूर्ती मी एके ठिकाणी पुरली. फकीर झालो. एका साखरसम्राटाला भेटलो. तुला साक्षात्कार होईल, म्हणून सांगितलं. त्यानंतर हे देवस्थान त्या साखरसम्राटानं बाधलं. तो दानशूर झाला.” ‘ साखरेच खाणार तोच देव घडवणार ‘ असं मी म्हणतो. मला त्या मूर्तीत दगडच दिसतो आणि इथं रांगा लावणाऱ्यांत चैतन्य दिसतं. आता शेवटचं सांगतो.

 पूजा के वख्त देवता पत्थर बना रहा ।

वैसे तो जर्रेजर्रेमें उसका निवास है । ”

“ तुम्हाला साक्षात्काराचा खोटा आधार का घ्यावासा वाटला?”

“ उरलेल्या दगडात, म्हणजे मूर्ती साकार झाल्यावर, उरलेल्या तुकडे करून फेकलेल्या संगमरवरातही मला देवच दिसला. त्याचा हा चौथरा, साखरसम्राटानंच बांधून दिला. निर्मितीलाही साक्षात्काराचा शेंदूर फासल्याशिवाय, परंपरेचा, धर्माचा चिखल फासल्याविना, मूर्तीचं देवस्थान होत नाही. ”

आता मी अॅकनोलेजमेंट रिसीट फाडण्यासाठीही देवळात जात नाही. रिसीट कुणाला देऊ? – माझी मलाच?

मी आता जातो. सम्राटाला भेटतो. जिथं प्रेम दिसतं तिथं चैतन्य दिसतं. मन अपार करुणेनं वाहू लागलं, वाऱ्याची झुळूक जरी आली तरी त्याचं दर्शन घडलं, की माझ्याच शरीराचं देऊळ होतं.

कृष्णाची बासरी ऐकू येते.

 –  व.पु. काळे  (कालनिर्णय, फेब्रुवारी १९९६)