आंबा हा फळांचा राजा आहे, असे म्हणतात. इतका सर्वप्रिय, सर्वार्थांनी मधुमधुर असा दुसरा कोणता ‘राजा’ भूतलावर असेल असे वाटत नाही. आंबा सर्वांना आवडतो. त्यामुळे यंदा आंबा रुसला या बातमीनेच बहुसंख्य लोक हिरमुसले झाले.
आपल्या समर्थ रामदासस्वामींनाही आंबा फार आवडायचा. खरे म्हणजे ते कमालीचे विरक्त. पण आहारामध्ये चोखंदळ होते. पण त्या चोखंदळपणाचा आपल्या आत्मिक उन्नतीत अडथळा होऊ नये यासाठी समर्थ फार जपत. या विषयातील खिरीची गोष्ट प्रसिद्धच आहे. समर्थांना आंबा किती आवडत असावाॽ त्यांनी आंबा या विषयावर आंब्यासारख्याच सुमधुर अशा अठरा ओव्या लिहिल्या आहेत. ऐका ऐका थांबा थांबा। कोण फळ म्हणविले बा। सकळ फळामध्यें आंबा। मोठे फळ॥ त्याचा स्वाद अनुमानेना॥ रंग रुप हें कळेना। भूमंडळी आंबे नाना। नाना ठाई॥ आंबे किती नानाप्रकारचे उपलब्ध आहेत, त्याचा तपशील समर्थ यापुढे देतातः मावे हिरवे सिंधुरवर्ण। गुलाली काळे गौरवर्ण। जांभळे ढौळे रे नाना जाण।पिवळे आंबे॥ आंबे येकरंगी दुरंगी। पाहो जातां नाना रंगी। अंतरंगी बाहेरंगी। वेगळाले॥ आंब्याचे आकार किती विविध आहेत, काही आंबे टणक तर काही लोण्यासारखे मऊ. काही आंबे बडिशेपच्या तर काही कोथिंबिरीच्या वासाचे, असे समर्थ नोंदवून ठेवतात. आंबे वाटोळे लांबोळे।चापट कळकुंबे सरळे। भरीव नवनीताचे गोळे। ऐसे मऊ॥ नाना फळांची गोडी ते। आंब्यामध्ये आडळते। सेपे कोथिंबिरी वासाचे। नानापरी॥ केवळ आंब्याच्या वासानेच माणसाला सुख लाभते, आनंद वाटतो. आपण तर एका सुवासिक तांदळालाच आंबेमोहोर असे नाव दिले आहे. आंब्याचा मोसम नसतानाही आंब्याचा वास मात्र लाभावा, असा हेतू त्यामागे असावा.
कोवी लहान दाणे मोठे। मगज अमृताचे साटे। हाती होतां सुख वाटे।वास येतां॥ सोफूसाली हि असेना। नासक वीटक दिसेना। टाकावे वस्त्रावरी नाना। कोरडे आंबे॥ येंक आंबा वाटी भरे। नुस्त रसामध्यें गरे।आता श्रमचि उतरे। संसारींचा॥ आंबे खाल्ल्यामुळे संसाराचा ताप कमी होतो, श्रम हलके होतात, असे हा महाराष्ट्राचा श्रेष्ठ-विरक्त संत आपल्याला सांगत आहे. रस सुकवून-वाळवून आंब्याचे जे साठ केले जाते, त्यामध्येही आंब्याची गोडी उतरते. आंबा तगणाऊ नासेना। रंग विरंग दिसेना। सुकतां गोडी ही सांडिना। काही केल्या॥ भूमंडळीं आंबे पूर्ण। खाऊन पाहतो तो कोण। भोक्ता जगदीश आपण। सकळां ठायीं॥ नाना वर्ण नाना स्वाद।नाना स्वादामध्ये भेद। नाना सुवासें आनंद। होत आहे॥ एवढे सांगेन झाल्यानंतर समर्थ आंबा खाण्याचा आनंद मनसोक्त घ्यावा, सर्वांनी एकमेकांना आंबा द्यावा, अशी इच्छा प्रगट करतात. आंबे लावावे लाटावे।आंबे वाटावे लुटावे। आंबे वाटिता सुटावे। कोणी तरी॥ आंब्याला नेहमी पाणी घालावे लागत नाही. आंब्याने एकदा मूळ धरले की तो आपणच मोठा होत जातो आणि फळांची खैरात आयुष्यभर करीत राहतो. केवढा हा उपकार. नाहीं जळ तेथे जळ। कां तें उदंड आंब्रफळ। परोपकाराचें केवळ। मोठे पुण्य॥ पुण्य करावें करवावें। ज्ञान धरावें धरवावें। स्वयें तरावें तरवावें।ऐक मेका॥ समर्थ एवढे सांगून थांबले तर त्यांनी केवळ आंब्याचाच गुणगौरव केला असे होईल. म्हणून आंबा जसा इतरांना आनंदी करून त्या आनंदात स्वतःचे सुख पाहतो, परोपकारार्थ स्वतः कारणी लागतो त्या आंब्यासारखेच आपणही सर्वांनी वागावे, असे समर्थांचे सांगणे आहे. मी तो बोलिलों स्वभावें। यांत मानेल तितुकें घ्यावें। काही सार्थक करावें। संसाराचें॥ दास म्हणे परोपरी। शब्दापरीस करणी बरी। जिणे थोडे ये संसारी। दो दिसांचे॥
शब्दांमधून उपदेश करण्यापेक्षा कृतीने करावा.
आंबा घ्यावा, आंबा द्यावा, आंबा लुटावा आणि आपणही आंब्यासारखेच परोपकारी व्हावे, मधुमधुर असावे, असा समर्थांचा संदेश आहे.
या वर्षी आंबे कमी मिळाले, जवळजवळ मिळालेच नाहीत. त्यामुळे आमरस चाखणे अवघड झाले, पण समर्थांच्या साहित्यातील हा आमरस खऱ्याखुऱ्या आमरसाची थोडीतरी उणीव भरून काढील, असा विश्र्वास वाटतो.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
संदर्भ टीप –
प्रस्तुत लेखासाठी समर्थांची १८ ओव्यांची एकच रचना घेतली आहे. समग्र समर्थ साहित्य – रचना २८, पृ.७३३.