लग्न झालं, मूल झालं की आपण स्वतःला विसरून इतर सर्वांची काळजी घेतो. आणि एखाद दिवशी आपली मुलंच आपल्या दिसण्यावर कमेंट करतात. छान मेंटेन असलेली एखादी मैत्रीण जास्त आनंदी दिसते. असं का?
खरं म्हणजे लग्न हा स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर स्त्रीमध्ये आमूलाग्र बदल होतो. पण आपल्या आजूबाजूला काय दिसतं? आजच्या आधुनिक जगातही अनेक बायका स्वतःला केवळ नोकरी आणि संसारात गुरफटून स्वतःकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात. कामाच्या धबडग्यात आंतरिक सौंदर्य मिळविण्यासाठी रोजची मेहनत त्यांना कटकटीची वाटते. त्यापेक्षा महिन्या दोन महिन्यांतून एकदा ब्लीच फेशियलसाठी केलेली ब्यूटीपार्लरची वारी त्यांना पुरेशी वाटत असते. पण हे करताना आपण स्वतःच आपलं नुकसान करीत आहोत, हे त्यांना कळतही नाही.
मला नेहमी विचारलं जातं की, हे सौंदर्य कसं टिकवलंस? माझ्यातल्या या बदलाला माझं प्रोफेशन कारणीभूत ठरलं, असं म्हणायला हरकत नाही. आमच्या अभिनयाच्या क्षेत्रात प्रेझेन्टेशनला खूप महत्त्व आहे. त्यामुळे सुंदर, ॲक्टिव्ह दिसणं, हे आवश्यकच असतं. लग्न झाल्यावर मी गरोदर राहिले तेव्हा माझं वजन ७५ किलो झालं होतं. पण मी ठरवलं होतं, एक वर्ष केवळ म्हणजे केवळ मुलाला द्यायचं. नंतर मात्र बॅक टू शेप यायचं. गरोदरपणाच्या काळात मी खूप आळशी झाले होते. ए अमुक आणून दे, जरा तमुक आणून दे… अशा नुसत्या ऑर्डरी सोडायचे मी. त्यातच स्थूलपणामुळे आळशीपणात अंमल जरा वाढच झाली होती. त्यानंतर मात्र मी वजन घटवायला सुरुवात केली. एका वर्षात मी तब्बल १५ किलो वजन कमी केलं. पण माझं समाधान झालं नाही. मला ५७-५८ किलोंवर यायचंच होतं. हे शेवटचं वजन कमी करणं खूप त्रासाचं गेलं. पण अखेर हे आव्हान मी पूर्ण केलं.
अॅक्टिव्ह राहाणं हे खूप महत्त्वाचं असतं. केवळ नोकरदार स्त्रियांसाठीच नव्हे तर हाऊसवाइफनीही प्रेझेण्टेबल राहायला शिकलं पाहिजे. स्वतःलाच आरशात निरखल्यानंतर आपण खूप छान दिसतोय. असं तुम्हाला वाटतं, तेव्हा तुमचा आत्मविश्र्वासही वाढतो. जितकं तुम्ही उत्साही राहाल. तितकंच तुमचं कुटुंब उत्साही राहील. स्त्री ही कुटुंबाची पिलर ऑफ स्ट्रेन्थ असते. तीच ढेपाळली तर संपूर्ण कुटुंबच ढेपाळतं.
वाढतं वजन अनेक आजारांनाही निमंत्रण देणारं ठरू शकतं. गुडघेदुखी, डायबेटिज, हायपरटेन्शन हे आजार सुरू होतात. म्हणून या आजारापासून लांब राहण्यासाठी दररोज किमान २० मिनिटं एक किंवा दोन कि.मी. भरभर चाललंच पाहिजे. रोज जमत नसेल तर आठवड्यातून किमान तिनदा तरी चाललंच पाहिजे. असा व्यायाम केल्याने तुम्ही तंदुरूस्त तर राहताच, पण तुमची त्वचाही तजेलदार होते. हा तजेला तुम्हाला कुठल्याही फेशियल किंवा क्रीमने मिळणार नाही.
मी मनसोक्त खाते. नवरात्री, दिवाळीत मीही लाडू-करंज्यांवर ताव मारते. पण हे सगळं प्रमाणाबाहेर बिलकूल होत नाही. किंवा चुकूनमाकून मी जास्त खाल्लंच तर पुढचे एक-दोन दिवस मी न चुकता एक्झरसाइजचं प्रमाण वाढविते. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणं आणि व्यायाम करणं या दोन्ही अत्यावश्यक गोष्टी आहेत. मी आताही शूटिंगला जाताना सकाळ-दुपारचं जेवण, नाश्ता सगळं टिफिनमध्ये घेऊन जाते. मुळात महत्त्वाचं आहे ते बाहेरचं न खाणं. चायनीज वगैरे जंक फूड महिन्यातून एखाद वेळी ठीक आहेत. अति प्रमाणात बाहेरचं खाल्ल्यामुळे फॅट्स वाढतातच, पण सर्वात जास्त दुष्पपरिणाम त्वचेवर होतात.
रोजचा आहार, व्यायाम यासंबंधी पाळाव्या लागणाऱ्या या बाबींना तुम्ही नियम मानू नका. त्याला सवयीचा भाग बनवा. चहा-नाश्त्यासारखंच नियमितपणे चालणं, योगासनं करणं याला तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग माना. तुम्ही तुमच्या शरीराला असं वळण लावलंत तर तुमचाही उत्साह वाढेल. तुमच्या वागणुकीतही सुधारणा होईल. जिमला जायला जमलं तर नक्की जा. फार तर काय होईल, अजून अर्धा तास एक्झरसाइज करावं लागेल ना? पण ते आवर्जून करा. वयानुसार शरीरातलं कॅल्शियम कमी होत जातं. पण तुमचे स्नायू सशक्त असतील तर तुमच्या हाडांनाही संरक्षण मिळतं आणि तुमचं आयुष्यही वाढतं.
संसारापायी करिअर अर्ध्यावर सोडावं लागलं, ही खंत मला नाही. माझं करिअर खूप लवकर सुरू झालं. मी १६ वर्षांची असताना मराठी चित्रपट केला आणि २३ वर्षांची असताना लग्नाच्या बंधनात अडकलेही. योग्य वेळी लग्न आणि मूल हे मराठी संस्कार तेव्हा कुठेतरी माझ्यावर रुजले होते. त्यामुळे सगळं यथासांग झालं. याबाबत मला अजिबातच खंत नाही. ग्लॅमरची ती सात वर्ष मी मनापासून एन्जॉय केली आहेत आणि आताही तितक्याच दमदारपणे पदार्पण करून मी माझी सेकंड इनिंगही मनसोक्तपणे जगतेय. त्यामुळे संसारापायी करिअर सोडावं लागलं, अशी खंत उराशी बाळगू नका. लग्नानंतरही बरंच काही करता येऊ शकतं.
शाळा-कॉलेजमध्ये असताना मी ब्यूटी काँटेस्टमध्ये भाग घेतला होता. मी मिस मिठीबाईही होते. पण काही कारणांमुळे मिस इंडिया स्पर्धेत भाग घेण्याचं राहून गेलं होतं. मग ही संधी मला लग्नानंतर चालून आली. मुलगा चार-पाच वर्षांचा झाला होता. तेव्हा जिममधल्या मैत्रिणींनी मला मिसेस इंडियाच्या स्पर्धेत भाग घेण्याचा आग्रह केला. माझ्या नवऱ्यानेही मला यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. मी मैत्रिणींच्या गराड्यात होते, त्या वेळी मला वाटायचं की मीच खूप छान आहे. पण त्या स्पर्धेत प्रत्यक्ष उतरल्यावर मला ही स्पर्धा किती खडतर आहे, हे कळून चुकलं. तिथे माझ्यासारख्या मुलं असलेल्या सौंदर्यवती होत्या. या स्पर्धेसाठी काहींनी तर दोन-दोन वर्ष मेहनत केली होती. मराठी मुली या स्पर्धेत उतरत नाहीत. पण मी ते आव्हान स्वीकारलं आणि शेवटच्या पाचांत पोहोचलेही. या स्पर्धेने मला खूप शिकवलं. मी तर म्हणेन की, प्रत्येकीने अशा प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. त्यामुळे तुमचं ग्रुमिंगही होतं आणि मुख्य म्हणजे तुमचा आत्मविश्वासही वाढतो. तुमचं वजन थोडं जरी वाढलं तरी भीती वाटायला लागते आणि आपण आपल्या वजनाबाबत जागरूक होतो. आपण प्रत्येकीनेच अशी सेकंड इनिंग खेळायला हवी.
मुलांना आणि नवऱ्यामध्ये घराची ओढ विकसित करण्यात स्त्रीचा मोठा वाटा असतो. तुम्ही हाऊसवाइफ असाल आणि दिवसभर काम करून, श्रम करून थकत असाल तरी तुम्ही ताजेतवाने दिसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता मुलंही खूप लवकरच कळत्या वयाची होतात. शाळेत तीही अन्य मुलांच्या आयांना पाहत असतात. त्यांनाही वाटतं की, आपल्या आईने स्मार्ट राहावं. मुलांना, नवऱ्याला घराची ओढ वाटावी, यासाठी तरी प्रत्येक स्त्रीने अॅट्रॅक्टिव्ह राहिलंच पाहिजे. त्यामुळे नियमित व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण हवंच. रोजच्या कामाच्या धबडग्यातून थोडासा वेळ व्यायामासाठी काढला तर तुम्हालाही खूप छान वाटेल. तुमच्यातही सकारात्मक भावना जागृत होतील आणि फिट राहणं आवडू शकेल. सुरुवातीला थोडा कंटाळा येईल, पण या कंटाळ्यावर जेव्हा तुम्ही मात कराल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं जीवन आनंदानं फुलेल, हे नक्की!