मुले का बिघडतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी काही प्रसंग पाहूया.
प्रसंग १:
मालतीकाकूंच्या आणि त्यांच्या मैत्रिणींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. मालतीकाकू सांगत होत्या, “शेजारच्या राजेशला खूप दिवसांनी संध्याकाळी मोकळा वेळ मिळाला होता. कधी नव्हे ती मनालीही कामावरून लवकर परत आली होती. म्हणून बाहेर जेवायला जायचा बेत ठरला. आठ वर्षांची ओवी लागलीच म्हणाली, ” आपण परमिट रूममध्येच जेवायला जायचं. तिथं कसं एकदम रोमंटिक वाटेल. ” लेकीची भाषा ऐकून मनालीचा पारा चढला. आणि तिने ओवीला बदड बदड बदडले. ओवी आईला विचारत होती की काय चुकले माझे? त्यावर आई म्हणाली, ” तोंड वर करून विचारायला लाज नाही वाटत? किती उर्मट झाली आहे?” गप्पांमधून अनेक घटना चर्चिल्या गेल्या.
प्रसंग २:
अरुणाताईंना एकदा गच्चीवर दहावीतली मुले सिगारेट ओढताना दिसली. काकूंना बघून मुले गडबडली. ” काय वाया गेलेली मुले आहेत, ” असे म्हणत त्या खाली आल्या. मुलांनी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण त्यांनी लक्षच दिले नाही.
प्रसंग ३:
विनयाकाकूंना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या फॅशनेबल कपड्यांत बघून, प्रेमीयुगलांना बघून किंवा भेटल्यानंतर कोणीही कोणाला मिठी मारताना बघून खूप त्रास होतो.
प्रसंग ४:
सुनीताताई म्हणाल्या की घरी येताना एका सिग्नलला एक मुलगी भीक मागत होती. काम देते, करतेस काय विचारल्यावर तोंड वेंगाडून शिव्या देत निघून गेली. एकदा तिच्याबरोबरच्या मुलीने रिक्षातल्या एका बाईची पर्स पळविली. सिग्नल सुटला. ट्रॅफिकमुळे तिला कोणी पकडू शकले नाही.
अशा प्रकारे सगळ्यांनी आजकालची पिढी बिघडत चालली आहे ह्यावर शिक्कामोर्तब केले. आठ वर्षांची ओवी परमिट हा शब्द शिकली होती. ज्याचा अर्थ आहे परमिशन, परवानगी. तिच्या बुद्धीनुसार जिथे स्पेशल लोकांना परमिशन मिळते अशा स्पेशल ठिकाणी म्हणजे परमिट रूममध्ये तिला जायचे होते. रोमँटिक हा शब्द तिने कॉलेजमधील मुलांच्या तोंडी ऐकला होता. तिला शब्दांचे अर्थ कळत नव्हते. ओरडायच्या आधी ओवीच्या आईने तिला नक्की काय म्हणायचे आहे? हे विचारले असते तर सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला असता. ओवीने स्पष्टपणे आई का मारते आहे? हे विचारलेसुद्धा होते. एकीकडे सगळ्यांना मुले चौकस, हुशार हवी असतात. पण प्रश्न न विचारता? किती विरोधाभास आहे हा! ओवीच्या आईलाच तिच्या भावनांचे नियोजन करता आले नाही. तिने तिचा राग आरडाओरडा करून, मारून व्यक्त केला. ओवीला शेवटपर्यंत तिचे काय चुकले हेच कळले नाही. आता तीही चुकीच्या पद्धतीने तिच्या भावना व्यक्त करायला आईकडूनच शिकू शकेल. त्यात आईने तिला उर्मट हे लेबल लावले. आई म्हणते ते खरे मानून कदाचित ओवी उर्मटपणे वागू लागेल. मारामारी, तोडफोड, भांडणे अशा स्वरूपात ते व्यक्त होऊ शकेल किंवा आईने मला मारले, तिला माझी किंमत नाही, मला काय म्हणायचे आहे हे तिला कळत नाही. ही माझीच आई आहे का? अशा असंख्य प्रश्नांनी ती कोषात जाऊ शकेल. धडपणे उत्तरेही देऊ शकणार नाही. दोन्हीपैकी कशीही वागली तरी त्याची कारणमीमांसा न करता, आम्हाला पाहिजे तसे ती वागत नाही म्हणून तिच्यावर ती बिघडली आहे, असा शिक्का मारला जाईल.
सिगारेट ओढणारी मुले खरेतर अरुणाताईंशी बोलायला गेली होती. पण त्यांनी मनोमनी ही मुले फुकट गेलेली आहेत हे ठरवून टाकले होते. म्हणून त्यांनी बोलायचेच टाळले. मुले, त्यांना सिगारेट ओढून बघायची होती असे सांगायलाच गेली होती. खरेतर आजकाल प्रत्येक सिनेमाच्या आधी धूम्रपान आरोग्यास अपायकारक आहे हे दाखवितात. पण तरीही मोठ्यांनी मुलांचा मूड असेल तेव्हा त्यांच्याबरोबर ही चर्चा करणे आवश्यक आहे. नाही ऐकले तर ह्या पुढे होणारी शरीराची हानी अटळ आहे, ते तुम्हांलाच भोगावे लागेल, हे स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडून त्यांनाच निर्णय घ्यायला सांगितला तर मुले योग्य आचरण करण्याची शक्यता नक्कीच वाढेल. योग्य ती माहिती, त्याचे चांगले-वाईट परिणाम ह्यांची माहिती देऊन घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी मुलांनीच घ्यायला हवी, हा स्पष्ट संदेश त्यांच्यापर्यंत जाणे आवश्यक आहे.
विनयाकाकूंना मुलांचे फॅशनेबल कपडे खटकतात. पण त्यांनी त्यांच्या तरुणपणात डोकावून पाहिले तर त्यांच्यावेळी पंजाबी ड्रेसला मोठ्यांनी नावे ठेवल्याचे आठवेल. प्रत्येक मागच्या पिढीला पुढच्या पिढीतील नवीन गोष्ट स्वीकारणे कठीण जाते. जग जवळ येत चालले आहे. जग झपाट्याने बदलतेय. जनरेशन गॅप स्वीकारणे मोठ्यांसाठी कठीण आहेच, पण मुलांसाठी जास्त कठीण आहे. शिवाय पूर्वीपेक्षा जीवन खूपच गुंतागुंतीचे होत चालले आहे. माध्यमे वाढत आहेत. एका क्लिकवर माहिती उपलब्ध आहे. माहितीचा स्फोट होतो आहे. ती फिल्टर करून योग्य ती माहिती घेणे मुलांना जमत नाही. घरात सांगितलेल्या गोष्टी आणि बाहेर मिळणारी माहिती ह्यात तफावत आहे. घराबाहेर चांगल्याबरोबर वाईट गोष्टीही आहेत. त्यामुळे योग्य मार्गदर्शन नसेल, कोणी त्याना काय योग्य-अयोग्य, चूक-बरोबर हे समजावून सांगत नसेल तर मुले संभ्रमावस्थेत राहतात. शिवाय संगत चांगली नसेल, घरातील ताण, बिघडलेली नाती, सुसंवादाचा अभाव आणि योग्य तो सारासार विचार करता येत नसेल तर ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम मुलांच्या खरोखरीच्या बिघडण्यावर होऊ शकतो.
समजुतीच्या चौकटी
आपल्या समजुतीच्या चौकटी- बाहेरच्या पद्धतीत मूल वागले तर त्याला आपण बिघडले असे म्हणतो, पण ह्यातली गोम अशी आहे की पालक, शिक्षक किंवा बाकीच्यांकडे मुलाशी मुलांच्या वयानुसार कसा सवाद करायचा ह्याची माहिती नसते. साध्या मीटिंगसाठी किंवा एक तासाचा वर्ग घ्यायचा असेल तर आपण किती तयारी करतो. मग ज्या मुलाला घडवायचे आहे त्यासाठी योग्य माहिती करून घेणे गरजेचे आहे. मागच्या पिढीची माहिती जशीच्या तशी अमलात आणता येणार नाही. काळानुसार बदलावे लागेलच. दृष्टिकोनात बदल करावा लागेल. मग त्यांनी मारलेल्या मिठ्या ह्या प्रत्येक वेळी तशा हेतूनेच असतील असे नाही, हे लक्षात येईल. ती एक वागण्याची पद्धतही असू शकेल.
मित्र व्हा
खऱ्याखुऱ्या बिघडलेल्या किंवा आपण ज्या मुलांना ती बिघडली आहेत असे म्हणतो आहोत ही सर्व मुले आपल्याच समाजातील आहेत. मुलाला/मुलीला तू आता चुकीचे काय वागलास/वागलीस हे नक्की सांगावे. पण एखाद-दुसऱ्या वागण्याने बिघडल्याचा शिक्का मारु नये. मुलांनी कितीही वरवर दाखविले तरी त्यांना आतून अपराधी वाटत असते. अशा चुकलेल्या वेळी पाल्याच्या मागे प्रेमाने, खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते. पण चुकीच्या वागण्याला मान्यता द्यायची नाही. त्यांच्या भावना समजावून घेऊन त्यांचा स्वीकार करणे गरजेचे आहे, कारण कोणतीच भावना पूर्णपणे चांगली किंवा वाईट, चूक किंवा बरोबर नसते. त्यांच्या जागी स्वतःला ठेवून पाहिल्यास मुले का बिघडतात? ह्याची आणखी काही कारणे समजतील आणि पर्यायाने त्यांना सुधारण्याचे मार्गही दिसतील.