यश मिळवणे हे जितके कठीण असते तितकेच ते पचवणेही कठीण असते. लोकांना नेहमी मिळविलेले यशच डोळ्यासमोर दिसते. परंतु त्या यशाच्या मागे घेतलेली मेहनत, परिश्रम यांचा विचार कधी ते करीत नाहीत. यशाबरोबर पैसा, कीर्ती आणि वलय हे प्राप्त होते. अशा प्रसिद्धीचे वलय प्राप्त होणाऱ्या क्षेत्रातील मी एक असल्यामुळे मला त्या वलयाचा आणि मिळालेल्या कीर्तीचा म्हणावा तसा आनंद लुटता येण्यापेक्षा नुकसानच जास्त सोसावे लागते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
किंबहुना असा आनंद घ्यावा अशा स्वरूपाचीसुद्धा माझी मनोधारणा नाही. परंतु इतके वलय आणि कीर्ती मिळाल्यामुळे कधीकधी एक सामान्य व्यक्ती म्हणूनसुद्धा समाजात मला वावरता येऊ नये हीच खंत मनाला लागून राहते. तसे पाहता माझे स्थान प्राप्त करायला मला बरीच वर्षे लागली आणि मेहनतही भरपूर करावी लागली. नृत्यकलेचे शास्त्रोक्त शिक्षण घेतल्यामुळे मला या क्षेत्रात त्याचा भरपूर फायदा उठविता आला. नुसतेच दिसणे असून चालत नाही तर कुठल्याही क्षेत्रात आपणास पारंगत हे व्हावयास लागतेच. त्याचबरोबर दिसणे आणि एखाद्या विषयात पारंगत असणे याच्या जोडीला तुमच्याकडे बोलण्याची लकब आणि समोरच्याला एक माणूस म्हणून समजून घेण्याची जाण असणे हेही महत्त्वाचे आहेच. मग यशाच्या उच्च शिखरावर पोहोचणे तसे फारसे कठीण नाही.
या स्थानावर पोहोचताना मला विविध प्रकारच्या व्यक्तींना सामोरे जावे लागले. कधीकधी तर कोणी माझ्याकडे एक छान दिसणारी मुलगी म्हणून बघितले, तर काहींनी माझ्याकडे असलेल्या गुणांचा आणि वैशिष्ट्यांचा व्यावसायिक तत्त्वांवर कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल या दृष्टीने पाहिले. व्यावसायिक संबंधापोटी जे माझ्या संपर्कात आले ते वगळता माझ्याशी बोलू पाहणाऱ्या किंवा माझ्याशी संपर्क ठेवू पाहणाऱ्यांबद्दलचे अनुभव मी सांगितले तर जागा आणि शब्द पुरायचे नाहीत.
या क्षेत्रात एका मराठी मुलीने एवढे स्थान मिळवायचे ही तशी काही पहिलीच वेळ नव्हे. परंतु परिस्थिती बदलत गेल्यामुळे त्या अनुषंगाने मिळणारे वलयही बदलत गेले. मागे वळून पाहता आपण कोण होतो आणि काय झालो याचा विचार केला तर एवढा बदल आपल्यात होईल असे मला वाटले नव्हते. परंतु यापुढे काय? हा प्रश्न कधीकधी मनात थैमान घालतो आणि चक्क कावरेबावरे व्हायला होते. एवढे यश मी प्राप्त केले, यापुढे मी नुसता पैसा कमवत राहणार काय? हा विचार केला असता मी मनोमन अनुत्तरित होते. एखाद्याने या वयात एवढा पैसा, कीर्ती, वलय प्राप्त केल्यावर खरोखरच पुढे काय करावे हा प्रश्न आहे. समाजाचे विविध ढंग आणि अंगे पाहता सरळ मोकळ्या मनाने या समाजास वाहून घेण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही, यात दुमत नसावे.
मी मिळविलेल्या यशात माझ्या मेहनतीचा वाटा किती आणि नशिबाचा वाटा किती हा एक वादाचा प्रश्न राहील. कारण भरपूर मेहनत घेणाऱ्याला म्हणावे तसे यश येतेच असे नव्हे आणि असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणणारे खाटल्यावरच राहतात असेही दिसून येते. तेव्हा मिळणाऱ्या यशालासुद्धा कर्तृत्वाची झालर ही लागतेच. मनुष्याच्या वागण्याचा ढंग, त्याची महत्त्वाकांक्षा आणि विविध गोष्टींवर त्याने व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया यांचा अभ्यास करण्याच्या माझ्या सवयीचा मला माझ्या व्यवसायात भरपूर उपयोग झाला. आपल्या व्यवसायाला व कामकाजाला नेमक्या कुठल्या बाबीची गरज आहे किंवा कुठल्या बाबी आपण व्यवसायात उचलल्या पाहिजेत ते नेमके शोधून व त्या आत्मसात करून जर आपण त्यात प्रावीण्य मिळविले तर आपण आपले काम अधिक आत्मविश्वासाने करू शकतो.
माझ्या अंगी असलेल्या अनेक गुणांना म्हणावा तेवढा वाव मिळाला नाही. मला रेखाटनाची भरपूर आवड आहे. त्याचा मला माझ्या या क्षेत्रात जरी उपयोग झाला नसला तरी जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या परीने रेखाटन करीत असते. ही आवड मी अगदी मनापासून जोपासली आहे. ज्या वेळी मला माझ्या नेहमीच्या कामाचा कंटाळा येतो, तेव्हा मी विरंगुळा म्हणून रेखाटन करते, त्यामुळे माझा मानसिक थकवा तर दूर होतोच शिवाय पुन्हा नव्या जोमाने मी माझ्या कामाला सुरुवात करते. कदाचित माझ्या यशामागेही अशाच काही गोष्टी दडलेल्या असतीलही!
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.