याकारणें मियां

Published by Vishnu Vaman Shirwadkar on   February 26, 2018 in   मराठी लेखणी

याकारणें मियां। गीतार्थु मऱ्हाठिया।

केला लोकां यया। दिठीचा विषो॥

-ज्ञानेश्र्वरी १८ वा अध्याय

 ज्ञानेश्र्वरांचा काळ देवगिरीच्या यादवांचा. ज्ञानेश्र्वरांनी ग्रंथाच्या समारोपात ‘सकलकलानिवासू’ म्हणून रामचंद्र राजाचा आणि यदुवंशाचा निर्देश केला आहे. हा काळ महाराष्ट्रात शांततेचा, सुबत्तेचा आणि तरीही विविध धार्मिक आंदोलनाचा होता. महानुभाव, वीरशैव, नाथ, जैन, लोकायत इ. संप्रदायाचा आणि विचारप्रणालीचा प्रभाव त्या काळात बराच असावा. विशेषतः महानुभाव पंथाचा प्रसार-संस्थापक गुजराथी असूनही-महाराष्ट्रात बराच होत होता. यातील बहुतेक पंथाचा आणि विचारप्रणालीचा अंतिम उद्देश देवधर्माचा आचारविचार सामान्य माणसापर्यंत आणि सामान्याच्या भाषेतून पोचविणे हा होता.

महानुभाव पंथ अनेक बाबतीत परिवर्तनवादी होता. तसा भाषेच्या बाबतीतही ‘मऱ्हाटी’ भाषा त्याने आपली धर्मभाषाच मानली होती. धर्माच्या वरच्या म्हणजे नियंत्रक स्तरावर कर्मकांडाचे प्राबल्य माजले की त्याची विकृत आणि विद्रूप अवतरणे खालच्या पातळ्यांवर झिरपत जातात. त्यातून स्वार्थाची अनेक क्षेत्रे निर्माण होतात आणि परिणामतः समाजातील बहुसंख्य वर्ग अंध, विपरीत समजुतीच्या आणि वामाचारांच्या शृंखलात अधिकाअधिक बद्ध होत जातो.

ही सर्व चित्र बदलण्यासाठी आणि समाजाला धर्मातील वा अध्यात्मातील विशुद्ध तत्वाचा साक्षात्कार घडविण्यासाठी वर उल्लेखिलेल्या संप्रदायांनी फार मोठा प्रयत्न केला. पण हे सर्व प्रयत्न वैदिक वा ब्राहृमण धर्मपरंपरेपासून दूर जाणारे होते. त्यामुळे सामान्यतः स्थितिनिष्ठ असलेला बहुतांश समाज त्या विचारापर्यंत पोचू शकला नाही. परिणामतः सर्वांना समवेत नेऊ पाहणाऱ्या विचारधाराचे रुपांतर मर्यादित पंथोद्यात झाले. या पार्श्र्वभूमीवर ज्ञानेश्र्वरांच्या भूमिकेचे वेगळेपण लक्षात येते.

विकृत आचारविचारांचा अंधार हटविण्यासाठी वैदिक परंपरांच्या बाहेर जाऊन प्रकाशाचा शोध घेण्याची गरज आहे. त्या विचारांच्या विशाल प्रांगणातच तो शोधता येईल. ही ज्ञानेश्र्वरांची भूमिका आहे. या दृष्टीनेच त्यांनी वेदोपनिषदाची नाही, तर भगवत् गीतेची योजना प्रकाशदानासाठी केली. वेदोपनिषदे तर वरिष्ठ वर्णीयांच्या तटाकोठात अडकलेली. त्या पलीकडील सामान्यांच्या आणि स्त्रियांच्या कानावरदेखिल त्यातील शब्द पडता कामा नये, मग ते त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोचणे सर्वस्वी अशक्यच. ज्ञानेश्र्वरांनाही वेद वंद्य आहेत. पण त्यांची कृपणता त्याना जाणावलेली आहे. म्हणून अठराव्या अध्यायात त्यांनी म्हटले आहे.

     वेदुसंपन्नु होय ठाई

     परी कृपणु अैसा आन नाहीं

     जे कानी लागला तिही । वर्णांच्याची ॥

गीतेजवळ असली कृपणता नाही, भेदाभेद नाही. गीता हा तत्वज्ञानावरील ग्रंथ असला तरी तो ‘गुरुवतीचा ठावो’ अशा महाभारत या महाकाव्यात समाविष्ट आहे. मुलतः काव्यरुप असल्याने गीतेच्या संपर्कक्षेत्रांला कोठलेली कुंपण नाही, वर्णव्यवस्थेच्या उतरडीत जखडलेल्या समाजात ती कोठेही संचार करु शकते. ज्ञानेश्र्वरांना विचाराधिष्ठित ‘जीवनशास्त्र’ समाजाच्या सर्व थरात स्त्री-पुरुषात पोचवायचे होते. म्हणून गीता गीता ही वेदापासून भिन्न नाही. ती ‘औदार्य आगला वेदू’ च आहे. अशी ज्ञानेश्र्वरांची भावना आहे.

बहुजनापासून दूर राहिल्याच्या आपल्या चुकीचे निराकरण करण्यासाठी वेदच गीतारुपाने प्रगट झाले असे त्यांनी म्हटले ओ. हाच भावार्थ ‘सर्वोपनिषदो गावो’ – या प्रसिद्ध सुभाषितात आहे. उपनिषदे या गायी आहेत आणि गोपलनंदनाने त्या गाईंचे गीतामृत हे दूध काढलेले आहे. अर्जुनाला सांगितलेले हे तत्त्वज्ञान अर्जुनापुरते मर्यादित नाही आणि भारतातील त्या कथाभागाशीही निमित्तापुरतेच संबंधित आहे. माणसाने जगावे कसे आणि कशाकरिता याचा शोध उपलब्ध असलेल्या विचारांच्या प्रकाशात गीतेने घेतला आहे आणि तोच शोध सर्वसाधारणापर्यंत पोचविणे ही ज्ञानेश्र्वरांची प्रक्रिया आहे

 

     हे स्वानंदभोगाची सेल

     भलतयासीचि देईन

     सर्वेंद्रियायां पोचविल श्रवणकरवीं॥

     (हा आत्मानंदाचा गाभा साधारणालाही लाभेल आणि श्रवणाच्या व्दारा त्यांच्या सर्वस्वाचे पोषण करेल.)

भलत्याकडे म्हणजे सामान्यांकडे जायचे तर त्यांच्याच भाषेचा आश्रय घ्यायला हवा म्हणून ज्ञानेश्र्वर मराठी भाषेकडे वळलेले आहेत. मराठीसारख्या प्राकृत भाषेत धर्मविषयक ग्रंथरचना करणे आणि ती लोकांसमोर मांडणे ही त्या काळात धार्मिक गुन्हेगारीच मानली जात होती. ज्ञानेश्र्वरानंतर तीनशे वर्षांनी एकनाथसुद्धा संस्कृत भाषा देवे केली। परी पाकृत काय चोरांपासून जाहली॥ असे तापट उद्गार काढावे लागले. मग ज्ञानेश्र्वरांच्या काळात हा प्राकृतविरोध किती उग्र आणि जाचक असेल याची कल्पना करता येते. तेव्हाचे सर्व धर्मविषयक ज्ञान संस्कृत भाषेतील पोथ्यात आणि पुरोहितवर्गाच्या स्वाधीन होते.

मराठीसारख्या लोकभाषेने त्या ज्ञानाला स्पर्श करणे म्हणजे वरिष्ठ वर्गाचा रोष आणि निषेध ओढवून घेणे होते. त्याकाळात राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता अधिक सर्वस्पर्शी होती. प्रायश्चित, बहिष्कार यांसारखी जगणे अशक्य करणारी दंडसाधने तिच्या हातात होती. ही सर्व आव्हाने स्वीकारुन ज्ञानेश्र्वरांना आपला मार्ग शोधायचाच नव्हे तर नव्याने बांधायचा होता. ज्ञानेश्र्वरांच्या पूर्वी चक्रधरादि महानुभव संतानी मराठी भाषा धर्मक्षेत्रात आणली होती हे खरे, पण या चळवळीचे संकोचिकरण एका पंथात झाल्यामुळे तिला समाजात व्यापक अधिष्ठान लाभले नव्हते. आव्हाने होती तशी राहिली.

तरीही ज्ञानेश्र्वरांनी मराठीचा स्वीकार केला तो केवळ गरजेपोटी वा अगतिकतेने केला नव्हे. मराठी भाषेवर त्याचे निःसीम प्रेम आहे आणि तिच्या सामर्थ्यावर त्याचा नितांत विश्र्वास आहे. माझ्या मऱ्हाटीतून अमृताशीही पैजा जिंकणारी अक्षरे मी मिळवीन. समुद्राहून खोल आणि अर्थभरित असे माझे मऱ्हाटी शब्द. असे मराठीच्या गौरवाचे आणि आत्मविश्वासाचे उद्गार त्यांनी जागोजाग काढले आहेत. यासंबंधात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. गीतेवरील आपल्या भाष्यासाठी त्यांनी अनुष्ठुभसारख्या संस्कृत छंदाचे वा अन्य श्र्लोकवृत्ताचे माध्यम निवडले नाही तर हेपुपुरस्सर मराठी मातीतच जन्मलेल्या रुजलेल्या ‘ओवी’ची योजना त्यांनी केली आहे.

     तेणे आबालसुबोधे।

     ओवियेचेनि प्रबंधे।

     ब्रह्मरस सुस्वादे।

     अक्षरे गुंथिली॥

अशा मऱ्हाटीच्या प्रेमातून, सामान्यविषयीच्या जिव्हाळ्यातून, पांडित्यपूरित अलौकिक प्रतिभेतून, आपल्याला हे ‘लावण्यरत्नभांडार’ लाभलेले आहे. मराठीत रसांना रसाळपणाचा आवो या गुरुवतीच्या ग्रंथातूनच प्राप्त झाला.


 – विष्णू वामन शिरवाडकर- कुसुमाग्रज | कालनिर्णय डिसेंबर १९९०