गुरु म्हणजे मार्गदर्शक. कुठे जावे, काय करावे, याचा नीट उलगडा होण्यासाठी जो योग्य मार्ग दाखवितो तो गुरु. म्हणूनच लोकमान्य टिळकांना राष्ट्रगुरू असे यथार्थतेने म्हणता येते. पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच!’ असे तेजस्वी उद्गार काढले आणि या टिळकांच्या उद्गारांना मंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. राष्ट्रगुरु टिळकांनी भारतीयांना हा जणू महामंत्रच दिला. पारतंत्र्याचे जोखड झुगारण्यासाठी आत्मविश्वास देणारा, स्वाभिमानाची ज्योत मनांत पेटविणारा हा मंत्र टिळकांनी उभ्या भारतवर्षाला दिला.
अलीकडच्या इतिहासात गेल्या शे-दीडशे वर्षांत लोकमान्यांएवढी लोकप्रियता आणि लोकमान्यताही दुसऱ्या कोणाला मिळालेली दिसत नाही. लोकमान्यांचे व्यक्तिगत जीवन अतिशय स्वच्छ आणि निष्कलंक असे होते. लोकमान्य हे जणू परमेश्वराचा अवतार आहेत, अशा भावनेने लोक त्यांच्याकडे पाहत असत. लोकमान्य तुरुंगात गेले तर त्यामुळे तुरुंगच पावन झाला,असे एका कवीने म्हटले आहे. लोकी निंद्य कारावास | परि तूं पावन केले त्यास || असे हा कवी म्हणतो. रॅण्डच्या खुनासंदर्भात टिळकांना शिक्षा झाली. प्रथम काही महिने टिळक डोंगरीच्या तुरुंगात होते. तिथे तळहाताएवढ्या भाकरीचा पापुद्रा ते पाण्यात कुस्करून खात. दोन महिन्यांत त्यांचे वजन तीस पौंडांनी कमी झाले. टिळक तुरुंगात असताना कोट्यावधी भारतवासीयांना जेवण गोड लागत नसे. लोकमान्य तुरुंगात आहेत म्हणून लोकमान्यांचे गुरु प्रो. श्रीधर गणेश जिनसीवाले हे इतके व्यथित झाले की, ते चौपाटीवर जाऊन लहान मुलासारखे रडत बसले. लोकमान्यांना तुरुंगात अतिशय वाईट भोजन मिळते, हे समजल्यावर ज्या कैद्यांना घेऊन जेवण आणण्याची मुभा होती ते आपल्या डब्यातून लोकमान्यांना आवडणारे पदार्थ मागवीत आणि युक्तीप्रयुक्तीने ते त्यांच्यापर्यंत पोहोचवीत. येरवाड्याच्या तुरुंगात टिळक असताना तेथील शिपाई टिळकांची आवडती सुपारी त्यांना देण्यात आनंद मानीत. लोकमान्यांना हिणवण्यासाठी ‘तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी’ असे म्हटले जाई. समाजाच्या या वर्गाचा लोकमान्यांवर अतीव लोभ होता.
टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांच्याकडे पुस्तके, कपडे पाठविण्यासाठी पुण्याच्या बापू सुताराकडून पेटी तयार करून घेतली. बापू सुताराने पेटीच्या आतील बाजूला ‘बापू सुताराचा दादांस दंडवत’ असे लिहिले. टिळक मंडालेहून सुटून आले त्या वेळी पुण्यातील काही देवळांमध्ये चक्क दीपोस्तव साजरे झाले. सरदार खाजगीवाल्यांनी टिळक तुरुंगात असेपर्यंत गणपतीचे विसर्जन करणार नाही, अशा निर्धाराने गणपतीचे विसर्जन केलेले नव्हते. तो गणपती टिळक सुटून आल्यानंतर थाटामाटात विसर्जित करण्यात आला. १८९८ च्या प्रारंभी मुंबईला प्लेगची साथ होती. प्लेग प्रतिबंधक लस विश्वासार्ह न वाटल्याने टिळक ती लस टोचून घेण्यास नाखूश होते. त्यामुळे तुरुंगातील इतर कैदी ती लस टोचून घेइनात. मग डॉक्टरांनी तुम्ही लस टोचून घेतली तरच इतर लोक टोचून घेतील, असे टिळकांना सांगितले. ते पटल्यावर टिळकांनी लस टोचून घेतली आणि आधी नकार दिलेल्या सर्व कैद्यांनी नंतर लस टोचून घेतली. टिळक तुरुंगातून सुटून येईपर्यंत अनेकांनी उपासतपास केले, नवस केले. आवडते पदार्थ खाण्याचे सोडले, अनुष्ठाने केली.
टिळक राष्ट्राचे पुढारी होते, पण प्रत्येकाला ते आपल्या घरचेच कोणी वडिलधारे आहेत, असे वाटे. टिळकांसारखा लोकोत्तर आदर्श पुढारी महाराष्ट्राला लाभला हे भाग्यच.
विविध क्षेत्रांत स्वत:च्या बुद्धीसामर्थ्यावर अद्वितीय स्थान प्रस्थापित करणारे टिळक या देशाला स्वातंत्र्याचा मंत्र देणारे राष्ट्रगुरू म्हणून प्रत्येक भारतीयास पूजनीय वाटतात.