शेवग्या च्या शेंगां चे महत्त्व
पाल्याप्रमाणे शेवग्याच्या शेंगां-मध्येही अनेक पोषणमूल्ये असतात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांचाही आहारात नियमित समावेश करायला हवा.
शेवग्याच्या एक कपभर शेंगां मध्ये आपल्याला दिवसभरात लागणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वाच्या जवळजवळ दीडपट ‘क’ जीवनसत्त्व असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. ‘क’ जीवनसत्त्व उच्च अँटीऑक्सिडंट आहे. त्याशिवायही इतर आणखी अँटीऑक्सिडंट्स शेंगांमध्ये असतात. त्यामुळे शरीरातील विघातक घटक (टॉक्सिक) काढून टाकण्यासाठी, त्यांचा निचरा होण्यासाठी मदत होते. शेंगांमुळे रक्तशुद्धी होते. मुरुमांचा त्रास, त्वचाविकार कमी होण्यास मदत होते. पित्ताशयाचे व यकृताचे कार्य सुधारण्यास मदत होते. कर्करोगाला प्रतिबंध होतो. शेवग्याच्या शेंगांमध्ये सूक्ष्मजीवविरोधी गुण आहेत. त्यामुळे श्वसनमार्गाच्या समस्या दूर होतात. क्षयरोग, अस्थमा, ब्राँकायटीस अशा फुप्फुसाच्या रोगांसाठी शेंगा हितकारक आहेत. घशामध्ये खवखव होत असेल, श्वसनाचा त्रास असेल तर अशा वेळी शेवग्याच्या शेंगांचे सूप प्यावे. या शेंगांमध्ये भरपूर कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर चोथा असतो. विरघळणाऱ्या चोथ्यामुळे रक्तात साखर सावकाश शोषली जाते. परिणामी, रक्तातील साखर नियंत्रणात राहते. न विरघळणाऱ्या चोथ्यामुळे मलोत्सर्जनाला फायदा होतो व आतड्याचे आरोग्य चांगले राहते. शेवग्याच्या शेंगांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये भरपूर ओलिक आम्ल (श्द्यद्गद्बष् ड्डष्द्बस्र) असते, जे शरीरासाठी विशेष करून हृदयाच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. भरपूर ‘क’ जीवनसत्त्व आणि कॅल्शियम यामुळे शेवग्याच्या शेंगा गरोदर स्त्रियांसाठी लाभदायक समजल्या जातात.
भरपूर पोषणमूल्ये असली, तरी शेंगांचा अतिरेक टाळायला हवा, नाहीतर बाधू शकतात. आठवड्यातून तीन ते चार वेळाच त्या आहारात घ्याव्यात. शेंगा विकत घेताना वाकलेल्या, तुटलेल्या, सुरकुतलेल्या, सरळ नसलेल्या, खूप बारीक किंवा खूप जाड शेंगा घेऊ नयेत. शेंगा ताज्या, हिरव्या दिसल्या पाहिजेत. जाड असलेल्या जून शेंगांची साल कठीण आणि बिया कडक असतात. त्यातील गरही कडवट असतो.
स्वयंपाकात शेंगा वापरण्यापूर्वी स्वच्छ धुऊन त्यांचा बाहेरचा चोथट थर थोडा काढून टाकावा. मग त्यांचे साधारण दोन ते तीन इंचाचे तुकडे करून कुकरमध्ये वाफवाव्यात किंवा पाण्यात शिजवाव्यात. प्रेशर कुकरमध्ये वाफविल्यास त्यातील ‘क’ जीवनसत्त्वाचा नाश कमीतकमी होतो. आपल्याकडे शेंगा आमटीत, सांबारात, पिठल्यात आवर्जून टाकल्या जातात. वांगी आणि शेंगा यांची मिक्स भाजी खूप छान लागते. कढीमध्येही शेंगा घातल्या तर चविष्ट लागतात. भोगीच्या भाजीत शेंगा असतात.
गोव्याकडे नारळाचे दूध घालून शेवग्याच्या शेंगांची भाजी केली जाते. दक्षिण भारतात बीसीबेळी भातात शेवग्याच्या शेंगा घालण्याची पद्धत आहे. दक्षिण भारतात सर्व राज्यांमध्ये तुरीची डाळ वापरून सांबार बनविले जाते ज्यामध्ये चिंच, टोमॅटो व शेवग्याच्या शेंगा घातलेल्या असतात. गुजरातमध्ये बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा दोन्ही उकडून घेऊन कांदा-टोमॅटोच्या रश्श्यात भाजी केली जाते. आंध्रातही अशीच भाजी केली जाते. फक्त दोन्ही गोष्टी कच्च्या घेऊन रश्श्यात घालून शिजवलेल्या असतात. भाटिया कढीत शिजवलेली तूरडाळ, दही, भाज्या आणि शेवग्याच्या शेंगा घातल्या जातात. ओरिसामध्ये बेसन आणि दह्याच्या मिश्रणात आर्वी, भोपळा, मुळा, गाजर, टोमॅटो वगैरे भाज्या, चिंच आणि पंच फोरन मसाला वापरून शेवग्याच्या शेंगांची भाजी केली जाते. बंगालमध्ये अशाच सर्व भाज्या, पंच फोरन मसाला व मोहरी आणि खसखशीचे वाटण घालून दुधामध्ये शेवग्याच्या शेंगांची भाजी केली जाते. दह्यात उकडलेल्या शेंगा घालून त्यावर फोडणी घालून रायताही बनवला जातो. याशिवाय बारीक चिरलेली मेथी, काजू, वालाचे बिरडे, शेंगदाणे, मटार अशा विविध जिन्नसांची शेंगा घालून अनेक ठिकाणी भाजी बनवली जाते. शेवग्याच्या शेंगांचे सूप आणि लोणचेही बनविले जाते. आपल्या देशाशिवाय, फिलिपीन्स, थायलंड, म्यानमार या देशांमध्येही शेवग्याची पाने, शेंगा आणि पानांची पूड वापरून पदार्थ केले जातात.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. वर्षा जोशी