श्रीकृष्णनीती | जयराज साळगावकर | Shri Krishna Policy | Jayraj Salgaokar

Published by जयराज साळगावकर on   August 1, 2022 in   मराठी लेखणी

श्रीकृष्ण नीती

भारतवर्षाचे सर्वात लोकप्रिय आराध्य दैवत म्हणजे पुरुषोत्तम श्रीकृष्ण. उदा. दक्षिणेतील तिरुपती बालाजी, उडिपीचा श्रीकृष्ण, पुरीचा जगन्नाथ, द्वारकेचा द्वारकाधीश, गुजरातचा डाकोरनाथ, पंढरपूरचा श्रीविठ्ठल, वृंदावनचा बांके बिहारीजी, जगन्नाथ मंदिर अहमदाबाद, मथुरेची कृष्णजन्मभूमी, वाराणसीचे (भग्नावस्थेतील) श्रीकृष्ण मंदिर, केरळमधील गुरुवायुर व श्रीपद्मनाभ, नाथद्वाराचा श्रीनाथजी, गोव्यातील श्रीदामोदर मंदिर अशी काही श्रीकृष्णाची सर्वात मोठी तीर्थक्षेत्रे भारतात आहेत.

तसेच हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा धर्मग्रंथ ‘भगवद्गीता’ हा श्रीकृष्ण नेच प्रेरित केलेला आहे. एकंदरीत भारतीय परंपरेत आणि संस्कृतीत वेगवेगळ्या रूपांत श्रीकृष्ण चे स्थान अव्वल आहे. यशोदेचा कृष्ण, बालरूपी सवंगड्यांचा कृष्ण, पुतनेचे विष पचवणारा बालकृष्ण, कालियामर्दन करणारा कृष्ण, लोणी चोरणारा कृष्ण, गवळणींच्या खोड्या करणारा कृष्ण, कंसाचा संहार करणारा बाळकृष्ण, राधेचा मुरलीधर कृष्ण, मीरेचा कृष्ण, द्रौपदीची लाज राखणारा कृष्ण, रुक्मिणी-सत्यभामेचा पती, सखा कृष्ण, कुरुक्षेत्रातील सुदर्शनधारी कृष्ण, गोवर्धनधारी कृष्ण, युद्ध नको म्हणून शिष्टाई करणारा कृष्ण, धर्मनीतीच्या रक्षणासाठी पांडवांची साथ देणारा कृष्ण, अर्जुनाचा रथसारथी कृष्ण, योगीराज कृष्ण, युद्धभूमीवर ‘गीता’ सांगून अर्जुनाचे मन लढण्यासाठी वळवणारा कर्मयोगी कृष्ण, नरकासुराचा वध करून त्याच्या कैदेतील १६ हजार अनाथ स्त्रियांना आश्रय देणारा कृष्ण ही आणि अशी कृष्णाची अनेक रूपे जनमानसात रुजलेली आहेत. पूजेसाठी बालकृष्ण हेच कृष्णाचे रूप अभिप्रेत असते. रजनीश म्हणतात, की वयाने मोठा झालेला सुदर्शनधारी कृष्ण भाविकांना पेलण्यास जड जातो, सहन होत नाही, कारण त्याचे रणभूमीवरील रौद्ररूप होय. त्याचे वेगळेपण म्हणजे सहज उपलब्ध असताना त्याने वैयक्तिक आयुष्यात कुठलीही स्वार्थी महत्त्वाकांक्षा, लोभ, मोह, माया न बाळगता केवळ न्यायासाठी झगडणारा विरेचक कृष्ण अधिक वेगळा वाटतो.

धर्मवीर भारतींनी आपल्या ‘कनुप्रिया’ या काव्यकृतीत कृष्णाची कनुप्रिया राधा आपण जणू अनभिज्ञ असल्याचे भासवीत त्याची कशी हजेरी घेते हे वर्णिले आहे. युद्धानंतर कृष्णाला बऱ्याच काळाने भेटलेली राधा म्हणते,

मैं कल्पना करती हूँ कि अर्जुन की जगह मैं हूँ

और मेरे मन में मोह उत्पन्न हो गया है

और मैं नहीं जानती कि युद्ध कौन-सा है

और मैं किस के पक्ष में हूँ और समस्या क्या है

और लडाई किस बात की है

लेकिन मेरे मन में मोह उत्पन्न हो गया है

क्योंकि तुम्हारे द्वारा समझाया जाना

मुझे बहुत अच्छा लगता है और सेनाएँ स्तब्ध खडी हैं

और इतिहास स्थगित हो गया है और तुम मुझे समझा रहे हो…

या आदर्श पुरुषोत्तमाने पारंपरिक आणि प्रस्थापित नीतीचे काही मूलभूत नियम जाणूनबुजून मोडले. उदा. ‘न धरी शस्त्र करी मी’ असे म्हणूनसुद्धा महाभारत युद्धकाळात काही मोजक्या आणि नेमक्या वेळी सुदर्शन चक्राचा वापर संहारासाठी त्याने केला. त्याचा आणि भीष्माचार्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यावर त्याला ते अपराध मोजून दाखवून त्याचा वध केला. जरासंधाच्या वधाच्या वेळी भीमाला जरासंधाच्या देहाचे दोन तुकडे करून, ते दोन विरुद्ध दिशांना फेक, असा (अनाहूत) सल्ला त्याने दिला. दुर्योधनाने आपले शरीर वज्रलेप करून घेण्यासाठी अंध माता गांधारीला (एकदाच) डोळे उघडण्यास लावण्याआधी कृष्णाने त्याला लज्जेपायी लिंग झाकण्याचा सल्ला ऐनवेळी दिला आणि हे गुपित भीमाला गदायुद्धात सांगून, दुर्योधनाच्या दोन मांड्यांच्यामध्ये गदेचा प्रहार करायला लावून, त्याचा अंत घडवला. गुरू द्रोणाचार्यांना अश्वत्थामा मेला, असे सत्यधर्मी धर्मराजाला सांगावयास लावले. परंतु खरेतर तो द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा नसून तो अश्वत्थामा नावाचा हत्ती होता. गुरू द्रोणाचार्यांना अर्धसत्य सांगून त्याने त्यांचा पाडाव केला. भिक्षुकाचे रूप घेऊन कधी दानास नाही न म्हणणाऱ्या दानशूर कर्णाची कवचकुंडले काढून घेतली आणि ‘अजित’ कर्णाला कवचकुंडलहीन बनवून ‘जित’ केले. असे काही प्रसंग पाहता, पुरुषोत्तम कृष्ण असे खोटेपणाचे दुटप्पी वर्तन कसे काय करू शकतो, असा प्रश्न पडतो.

पण श्रीकृष्णाने जे त्याच्या नावाला न शोभणारे असे वर्तन केले ते स्वतःसाठी नव्हते, तर न्यायासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी केले. युद्धानंतर कृष्णाने स्वतःसाठी कोणतेही पद, राज्य, जमीन, धनदौलत इत्यादींची अपेक्षा केली नाही. यादवांचा विनाश किंवा शापामुळे होणाऱ्या मृत्यूपासून स्वतःची सुटका व्हावी म्हणून कोणताही प्रयत्न केला नाही. उलट पारध्याकडून ओढवणारा मृत्यू आणि त्याचे परिणाम भोगण्यासाठी तो सज्ज झाला.

   श्रीकृष्णनीतीचे प्रतिबिंब पुढे चाणक्यनीतीमध्येही उमटलेले दिसते. चाणाक्यनीती आणि मॅकिअॅवेलीच्या ÒThe PrinceÓ ह्या नीतिशास्त्रावर केलेल्या भाष्यांमध्ये व कृष्णनीतीमध्ये साम्य आहे. मात्र फरक इतकाच आहे की, मॅकिअॅवेली जसे इतिहासाचे आणि काळाचे भान ठेवतो तसे भान ना चाणक्यनीतीत दिसते ना कृष्णनीतीत. ÒThe PrinceÓ  हे पुस्तक लिहिणाऱ्या मॅकिअॅवेलीशी कौटिल्याचीही तुलना केली जाते. मॅकिअॅवेलीने राजकारणाची चिरफाड केली, कुटिलतेचा पुरस्कार केला म्हणून तो युरोपात तिरस्काराला पात्र झाला. मॅकिअॅवेली नीतिशास्त्र व राज्यशास्त्र यात फरक करत नाही. माणूस मूलतःच कुटिल आहे. त्याचे व्यवहार स्वार्थमूलक आहेत आणि राजकारणात अप्रामाणिकपणा शीग गाठतो; असे त्याचे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे ध्येयवाद्यांना त्याच्याविषयी तिरस्कार वाटे. कॅथलिक पंथाने तर त्याच्या लिखाणावर बंदी घातली होती. कौटिल्याबाबतही अपवाद निघाले. पण ते पूर्वकालीनांकडून नव्हते तर आधुनिक पाश्चात्त्य प्रणालीच्या जाणत्या चाहत्यांकडून होते. पूर्वसुरींनी लंकावतारसूत्रात कौटिल्याला ऋषी म्हटले आहे. (दुर्गा भागवत)

महाभारतामधील कथानकांतून नीतिधर्माचा पुरस्कार केलेला आढळतो. नारदनीती, भीष्मनीती, विदुरनीती, कणिकनीती, दंडनीती व कृष्णनीती म्हणजेच ‘गीता’. या नीती सर्वप्रसिद्ध आहेत. या नीतींचे रचनाकार हे त्या काळात सर्वमान्य होते, लोकमान्य होते आणि सर्वप्रसिद्धही होते. त्यामुळे त्यांनी कथन केलेल्या नीतीला लोकमानसात मानाचे स्थान प्राप्त झाले. नीतिकार नारद, भीष्म, विदुर व श्रीकृष्ण हे व्यक्तिगत जीवनात कृतकृत्य तर होतेच; शिवाय ते हर्षामर्षाच्या व तृष्णा-स्वार्थाच्या पलीकडे गेलेले आदरणीय नेते होते. या उदात्त चारित्रिक पाश्र्वभूमीमुळे यांनी सांगितलेला नीतिधर्म हा केवळ महाभारत काळापुरताच मर्यादित न ठरता तो नीतिधर्म हा सार्वकालिक मान्यताप्राप्त ठरला. (कपटनीती)

पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांमध्ये एका अग्रगण्य अशा प्लेटोच्या नीतिशास्त्राकडे (The Republic) पाहिले असता, त्याच्या ‘आदर्श राज्य’ संकल्पनेत त्याने संपूर्ण समाज तीन वर्गांत विभागला आहे. हे वर्ग म्हणजे संरक्षक, सैनिक आणि उत्पादक. संरक्षक वर्गात प्लेटो न्यायतत्त्वाची, तर सैनिकांच्या वर्गात तेजतत्त्वाची आणि उत्पादकांच्या वर्गात विषयोपभोगी तत्त्वाची स्थापना करतो आणि असे प्रतिपादन करतो, की ज्या राज्यात तेजस्वी आणि विषयोपभोगी ही तत्त्वे (विरेचक अशा) न्यायतत्त्वाच्या योग्य नियंत्रणाखाली असतात, अशा राज्याला आदर्श राज्य म्हणता येईल. राज्यातील सैनिक आणि उत्पादक हे वर्ग संरक्षक वर्गाच्या विरेचक-न्यायतत्त्वाच्या नियंत्रणाखाली असले पाहिजेत. प्लेटोची ही धारणा ‘युटोपीयन’ (कल्पनासदृश) मानली जाते, तर कृष्णनीती किंवा चाणक्यनीती कालानुरूप आजही स्वाभाविक आहेत.

कृष्णाने त्याच्या नीतिशास्त्रामध्ये प्लेटोच्या समाजरचनेपलीकडे जाऊन, सर्वांना सोपी पडेल अशा कर्मयोगाची मांडणी जवळजवळ तीन हजार वर्षांपूर्वी केली आहे, तर प्लेटोचे ‘रिपब्लिक’ (ख्रिस्तपूर्व ३७५ वर्षे) कर्मयोगावर आधारित असा सम्यक समाज त्याने आदर्श मानला आहे. अपेक्षाभंग होऊ नये म्हणून फळाची अपेक्षा धरू नये. त्यामुळे कर्ता हा सम्यक् होऊन कर्माला एक तटस्थ असे अधिष्ठान प्राप्त होईल, असे संतुलित तत्त्वज्ञान कृष्णाने अंगीकारले आहे. ह्यामुळे मोह आणि कर्म यातील लक्ष्मणरेषा गडद होते. कर्माला महत्त्व प्राप्त होते.

कृष्णाने अर्जुनाला त्याच्या योद्ध्याच्या भूमिकेपासून ढळून, निःसंग होण्यापासून थोपविण्यासाठी आणि त्याच्यात कर्मयोगाचा आणि क्षत्रियभावनेचा पुनःसंचार होण्यासाठी सांख्य, कर्म, राजविद्या, विभूतीविस्तार, भक्ती तसेच पुरुषोत्तम असे काही योग भगवद्गीतेत विशद केले आहेत. अनेक शतकांनंतर फ्रेडरिक नित्शे या जर्मन तत्त्वज्ञानानेसुद्धा कृष्णाच्या या तत्त्वज्ञानाचा समांतर विचार केलेला दिसतो. अधिकारी व्यक्तिमत्त्वामध्ये सत्तेच्या अभिलाषेचा (ङ्खद्बद्यद्य ह्लश् श्चश्२द्गह्म्) मापदंड म्हणून विचार केला गेला आहे. धर्माला-चर्चला आव्हान देणाऱ्या नास्तिक नित्शेला असा विश्वास होता की, यश, महत्त्वाकांक्षा आणि जीवनात शक्य तितक्या उच्च स्थानी पोहोचण्यासाठी धडपडणे (कर्म) ह्या मुख्य प्रेरक शक्ती आहेत. ह्या नित्शेच्या तत्त्वात अर्जुनाला नवचेतना देणाऱ्या कर्म-संन्यास योगाचे (कृष्णाचे) तत्त्वज्ञान मात्र दिसत नाही. एकंदरीत नित्शेचे जर्मन तत्त्वज्ञान आणि कृष्णनीतीमध्ये पारंपरिक तत्त्वांना वळसा देऊन नव्या विचारांची मांडणी

केलेली मात्र स्पष्टपणे दिसते.

नीतिशास्त्राच्या पारंपरिक प्रस्थापित मूल्यांना कधी कधी छेद देणारे कृष्णाचे नीतिशास्त्र महाभारतातील काही निर्णायक प्रसंगांमधून दिसत असले तरी कृष्णाने हे सर्व काही वैयक्तिक स्वार्थासाठी केले नव्हते हे पुन्हा नमूद करावेसे वाटते. इतर नीतिशास्त्रातून अंगीकारलेल्या मूल्यांमध्ये निर्मोह-निष्काम कर्मयोग किंवा संन्यास हा विचार आढळत नाही, कृष्णाच्या आढळतो. हे कृष्णाचे वेगळेपण आहे आणि कदाचित म्हणूनच कृष्णाचा पुरुषोत्तम किंवा योगीराज म्हणून स्वीकार जनमानसात झालेला आहे. परंपरेने अधिकृत मानलेल्या दोषांचे, गुणांत परिवर्तन करणारे कृष्णचरित्रासारखे उत्तम उदाहरण इतिहासात दुसरे नसावे. कृष्णाने शेवटपर्यंत आपली विवेचकाची-न्यायाची भूमिका प्रामाणिकपणे कर्मयोगाद्वारे निभावली, हे कदाचित त्याचे एक कारण असू शकेल.

कोणत्याही नीतिशास्त्रात न्यायाची भूमिका ही केंद्रस्थानी असली पाहिजे. (And justice for all : American Constitution) आता प्लेटोच्या ‘द रिपब्लिक’मधील (The Republic) न्यायविषयक अवलोकन करून थांबतो.

राज्य न्यायाचे व्हावे.

‘आदर्श राज्य’ ग्रंथातील, तात्त्विक संवाद पद्धतीने केलेल्या प्रतिपादनाचे प्लेटोने दहा भाग पाडले आहेत. विषयांची मांडणी, उकल या दृष्टीने ग्रंथातील विवेचन पाच टप्प्यांमध्ये पूर्ण झाले आहे. पहिला भाग आणि दुसऱ्या भागाचा काही अंश यांमध्ये माणसाचे प्राप्तव्य, कर्तव्य इ. संबंधीच्या काही प्रधान, प्रचलित भूमिकांचा ऊहापोह आहे. माणूस काही महत्त्वाच्या नीतितत्त्वांच्या आधारे प्रगती साधू इच्छितो. उदाहरणार्थ : न्याय

‘‘न्याय म्हणजे खरे बोलणे, न्याय म्हणजे दुसऱ्याकडून जे घेतले ते परत देणे.

न्याय म्हणजे प्रत्येकास त्याच्या योग्यतेप्रमाणे देणे. न्याय म्हणजे प्रजेचे कल्याण” इत्यादी.

।। कृष्णार्पणमस्तु ।।

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


जयराज साळगावकर

(‘कृष्ण आणि काली” ह्या आगामी पुस्तकातून)

(लेखक अर्थतज्ज्ञ व साहित्यिक आहेत.)