संगोपन नात्याचे आणि मुलांचे
आपण एकत्र राहतो, या ना त्या कारणाने नाती जोडतो, सहजतेने जुळलेली हि नाती किती जण जोपासतात ? तात्पुरती नातीच जास्त असतात, फार नात्यांच्या नसण्यामुळे आपले अडते. इकडची तिकडची नातीसुद्धा तात्पुरत्या जखमांना फुंकर घालत असतात. कधी ती ऑफिसमधली असतील तर कधी “Whatsapp” वरची ! जवळची नाती दूरची व्हायला लागली की साहजिकच दूरची नाती जवळची व्हावी असे वाटते! माणसाला मनातील असुरक्षितेमुळे नात्यांची सवय लागली असणार. जंगलातून शहरात आल्यानंतर असुरक्षितता ही शारीरिक ना राहता मानसिक व्हायला लागली. शहरांतून एकत्र राहण्यासाठी समाज- भानाची गरज होतीच !
पालकांची नक्की जबाबदारी काय असते ?
पालकत्वाची गरज ‘स्व – जात’ संवर्धनासाठीच असते. एकदा का नवीन पिढी जगण्यासाठी सक्षम झाली की पालकत्वाची जबाबदारी संपली. आता आपले पोर जगण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही हे कोणाच्या ( आई ) बापाला कळते का ? पैसे कमावणे, लग्न करून देणे, स्वतःच्या पायावर उभे करून देणे अशा मध्यम- उच्चवर्गीय अपेक्षांच्या ओझ्याखाली पालकत्व पसरत असते. उदरनिर्वाहसाठी तयारी आणि प्रजनन संधीसाठी तयारी ह्या दोन्हीसाठी आजच्या युगात शिक्षण आवश्यक आहे. म्हणून आज पालक शिक्षणासाठी सैरावैरा पळताना दिसतात, पण चांगले शिक्षण तर शाळा, कॉलेज क्लासमधूनसुद्धा मिळते, मग पालकत्वाचे वेगळेपण काय ? पालकत्व म्हणजे फक्त शिकवणे नाही, हत्तींच्या कळपात आईबरोबर आंघोळ करणारे हत्तीचे पिल्लू बघितलेय ? किंवा सिंहिणीचे बछडे आपल्या आईबरोबर लुटपुटची झुंज करताना बघितलेय ? पालकत्वात मजा असली पाहिजे, आनंद असला पाहिजे, नाते असले पाहिजे. जगण्यासाठी सक्षम म्हणजे पोट भरण्यासाठी किंवा प्रजननासाठीच नाही तर समूहात राहण्यासाठी सक्षम , नाती बनविण्यासाठी आणि जोपाण्यासाठी सक्षम! हे पालाकत्वात दिसले पाहिजे.
संगोपन नात्यांचे
नाती महत्वाची असतात आणि संगोपन सुद्धा, हे मुलांना कळणार कसे ? आई वडील त्यांची नाती कशी जोडतात, जोपासतात ह्यावरूनच! नातेवाईक, आप्तेष्ट, शेजारी, मित्र ह्यांच्याबरोबरचे आनंद, अनुभव व मुलांना नात्यांबद्दल शिकवणार. ह्या आनंद अनुभवांना केवळ नात्यांचेच अवधान असेल तर ‘नात्यांसाठी नाती’ जीवाभावांची नाती हे मुलांसाठी केवळ पुस्तकी किवा ‘फिल्मी’ शब्द राहणार नाहीत.
नात्यांसाठी वेळ द्यायला लागतो. त्याबरोबर वेळ द्यायला पाहिजे असे वाटायलाही लागते. एकमेकांचे विचार, वागणे, याबद्दलचे कुतुहूल, आकर्षण नातेच घडवते. मुलांच्या वाढत्या वयाबरोबर बदलणाऱ्या व्यक्तिमत्वाचा टप्पा गाठत पालकांना ही कसरत करायची असते. मुलांच्या वाढत्या वयात पालकांनी केलेला हा प्रयत्न आणि पालकांनी जोपासलेली इतर नाती मुलांना एकमेकांशी ‘ कसे वागायचे ?’ ह्याबद्दल एक विचार देत असतात.
नात्यांचे आपल्या जीवनातले स्थान तसे तंत्रज्ञानाने सततच बदलले आहे. पूर्वी कुटुंबाबाहेरील नाती घराबाहेरची होती. ती नाती घरामध्ये अनुभवायच्या संधी फार कमी असायच्या. टपाल आले आणि ही प्रथा मोडली. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक बदलाने बाहेरची नाती उंबरठ्याच्या आत जास्त वेळ वावरायला लागली. टेलीफोन, मोबाईल, मेसेजिंग, चॅटिंगनेही नाती घरच्यांच्या नाकासमोर, घरच्यांच्या अपरोक्ष नांदायला लागली ! नात्यांच्या संवर्धनासाठी लागणाऱ्या परस्परांबरोबर वेळ देहबोलीच्या अनमोल ठेव्याला मुकला नि ‘तंत्रबोली’ च्या सापळ्यात अडकला. देहबोलीच्या वास्तवात नात्याला वेळ लागायचा तो एकमेकांवर विश्वास ठेवायला ! तंत्रबोलीच्या वास्तव्यात स्वैरता, गोपनीयता असल्याने व्यक्तीबद्दल फारशी माहिती नसूनसुद्धा ‘उंबरठा’ आतला संवाद घडू शकतो. “जेव्हा नात्याचा रथ विचारांचे घोडे नाही तर भावनांचे घोडे हाकतात” , तेव्हा काळजी वाटते.
समाजाचा दृष्टीकोन
नाती जेवढी जवळची तेवढी महत्त्वाची बनतात, आई वडील, नवरा – बायको, बहिण – भाऊ ह्या नात्यांचे तर जोडशब्दच बनतात. आपापल्या भावनाविश्वात घट्ट बांधलेल्या अनुबंधाव्यतिरिक्तही बरेच काही ह्या नातेसंबंधात गुंतलेले असते आणि म्हणूनच अशा संबंधात जेव्हा वितुष्ट येते तेव्हा त्याची दाहकता जरा जास्तच असते. वेगवेगळ्या वयाचे हे गाठोडे बांधताना संबंधिताना बऱ्यापैकी लवचिकता दाखवायला लागते. पितृसत्ताक समाजात कर्त्या पुरुषाच्या हाती सूत्रे सुपूर्द करून मातृभक्तीच्या उजळनीने संसारघाणा चालवायचे दिवस हळूहळू ओसरताना दिसतात, तसेच पालकत्वात वडिलांचा सहभाग मनाच्या कुंपणाबाहेरचा, हा समजही इतिहासात जमा झालेला दिसतो. असे दूरचे बाबा, मुले मोठी झाल्यावर अजूनच दूरचे होतात ! जर पूर्वार्धात रक्तात नात्यांमध्ये ऐहिक अपेक्षांचा इतका अतिरेक जाणवत असेल ( मग तो पैशांचा असेल) की ज्यामुळे नात्यातले मोहक क्षण आठवतच नसतील तर उत्तरार्धात ते अवतरतीलच असे सांगता येत नाही. म्हणतात ना, ‘पेरावे तैसे उगविते..’
समाजाच्या स्त्रीबद्दलच्या अपेक्षा आणि स्वतःबद्दलच्या अपेक्षा ह्यातली वाढती तफावत, वाढत्या घटस्फोटांमध्ये प्रतीत होते. स्त्री – पुरुष समानतेला आपल्या मनात जशी जागा तयार होईल तशी घरातली आणि घराबाहेरची नातीही नक्कीच बदलतील. फक्त स्त्री – पुरुषांच्या नात्यापुरते हे बदल मर्यादित राहणार नाहीत, तर स्त्री – स्त्री नात्यावरही त्याचे पडसाद उमटतील. ह्या नात्यांच्या हलाहलातूनही अमृत येण्यासाठी ‘नात्यांच्या संगोपनासाठी मुलांचे संगोपन’ आवश्यक वाटते. अन्यथा ‘वासनांच्या रात्रीतही मी एकटी तू एकटा |’ असेच चालू राहील.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.