गॅस सिलेंडर लीक होतोय?| गुगल गृहिणी | Leakage from the Gas Cylinder? | Google Housewife

Published by गुगल गृहिणी on   July 1, 2022 in   मराठी लेखणी

गॅस सिलेंडर लीक होतोय?

गॅस सिलेंडर लावताना तुम्हाला कधी वायू गळतीची (गॅस लीकेज) दुर्गंधी येते का? वायू गळतीचा वास येत असल्यास नेमके काय करायचे, हे बहुतांश जणांना कळत नाही. गॅस एजन्सीशी संपर्क साधला तरी ही एजन्सी लगेचच त्यांच्या माणसाला पाठवेल याची शाश्वती नसते. मग नेमके करायचे काय, हा मोठा गहन प्रश्न उभा राहतो आणि या प्रश्नाचे उत्तर सापडत नसल्याने आपल्यापैकी अनेक जण चिंतातुर होऊन जातात. पण घाबरू नका. अशा वेळी तातडीने १९०६ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधा. एलपीजी अर्थात गॅस सिलेंडरसंबंधित कोणतीही समस्या सोडविण्यासाठी भारत सरकारद्वारे २४ × ७ सेवा देणारी ही आपत्कालीन हेल्पलाइन सुरू करण्यात आलेली आहे. सर्व स्थानिक भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध असून या सुविधेचा सहज फायदा सर्वसामान्यांना घेता येऊ शकतो.

छोट्या गळतीमुळे मोठी आपत्ती उद्भवू शकते. अशा आपत्ती रोखण्यासाठी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्या व आपत्कालीन सेवा कक्षाचा हा संयुक्त असा स्तुत्य उपक्रम आहे. पेट्रोलियम व गॅस सेवा देणाऱ्या या कंपन्या बहुतेक मोठ्या शहरांमध्ये कार्यरत आहेत. प्रत्येक शहरामध्ये गॅस गळतीची समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या संपर्क क्रमांकाचा वापर यापूर्वी होत असे. पण आपत्कालीन काळात हा संपर्क क्रमांक शोधणे कठीण होते. हे लक्षात घेऊन पोलीस, रुग्णवाहिका व अग्निशामक दलाशी संपर्क साधण्यासाठी जसा एकच हेल्पलाइन क्रमांक आहे, तसाच एलपीजी समस्या सोडविण्यासाठीही देशस्तरावर एकच हेल्पलाइन क्रमांक असेल असे भारत सरकारद्वारे सुचविण्यात आले. याचाच परिणाम म्हणजे देशपातळीवर १९०६ हा आपत्कालीन क्रमांक अस्तित्वात आला. ‘डिजिटल भारत’ उपक्रमाचाच हा एक भाग आहे.

या क्रमांकावर संपर्क साधला असता ‘सुस्वागतम’ (वेलकम) म्हणत आपल्याला प्रतिसाद मिळतो. मग आपल्या पसंतीची भाषा निवडण्यासाठी काही विशिष्ट क्रमांक दाबावे, अशी सूचना केली जाते. कॉल जोडला गेल्यानंतर समोरील व्यक्ती आपले नाव, पत्ता, शहराचे नाव व दूरध्वनी क्रमांक विचारते. कॉल सुरू असतानाच त्वरित मेकॅनिकला कॉल करून आपली तक्रार नोंदवली जाते. ही सेवा पुरवताना आपल्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही, हे विशेष. आपल्याकडे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना काय करावे आणि काय करू नये, याबाबतचे मार्गदर्शनही फोनवरील व्यक्ती आपल्याला करते.

आपण दिलेल्या मोबाइल क्रमांकावर मेकॅनिकचा संपर्क क्रमांक एसएमएसद्वारे पाठवला जातो. काही मिनिटांच्या अवधीतच हा मेकॅनिक आपल्या घरी येऊन गॅस गळतीची समस्या सोडवतो. नंतर काही वेळाने आपल्या तक्रारीचे निरसन झाले की नाही, हे तपासण्यासाठी आपल्याशी पुन्हा संपर्क साधला जातो. आपल्या तक्रारीचे समाधान झाल्याचा सकारात्मक प्रतिसाद आपण दिल्यानंतर आपली तक्रार बंद केली जाते. २४ तासांत पुन्हा एकदा कॉल सेंटरला आपल्याला कॉल करण्यास सांगितले जाते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


गुगल गृहिणी