अलीकडेच युरोपीय देशांत फिरण्याचा योग आला. सुंदर हिरवी कुरणे व चंदेरी हिमाच्छादित डोंगरमाथे सर्वांनाच भुलवतात. पण त्याहूनही रम्य अशी काही दृश्ये माझ्या मनावर कोरली गेली. रुंद, सहा पदरी रस्ते, पादचाऱ्यांसाठी व सायकलींसाठी स्वतंत्र लेन, शिस्तबद्ध नीरव रहदारी, सार्वत्रिक स्वच्छता आणि त्याहून सुंदर म्हणजे निर्धास्तपणे कानाला संगीत लावून जॉगिंग करीत असलेल्या सर्वसाधारण महिला! सायकली चालवत रपेट करणारे सर्व वयोगटांतील जथे. माझे मन मायदेशी झेपावले.
सकाळी घरातील कामे उरकून धावतपळत कामाच्या ठिकाणी पळणाऱ्या, घामाघूम गर्दीत लटकून-थकून घरी येताच क्षणी घरकामाला लागणाऱ्या, मोबाइल व जंक फूडला शरण गेलेल्या मुलांच्या चिंतेत असलेल्या किंवा कामाच्या ठिकाणी व्यवस्थित स्वच्छतागृहाची सोय नस लेल्या अनेक सख्या माझ्या डोळ्यांपुढे उभ्या राहिल्या. एका समृद्ध, संपन्न परंपरा मिरविणाऱ्या, विविधतेने आणि संसाधनांनी श्रीमंत असणाऱ्या माझ्या प्रिय देशात आरोग्य-संस्कृती रुजून, बाळसे धरील का आणि कसे, याचा मी विचार करू लागले.
आपल्याकडे प्राचीन काळापासून आरोग्य-संस्कृती होती व आजही ती नष्ट झालेली नाही; असा सार्थ दावा करताना हे लक्षात घेतले पाहिजे, की संस्कृती ही स्थिर किंवा ताठर अशी संकल्पना नसून सतत होणाऱ्या बदलांना ती सामावून घेत असते.
आपल्या देशाला स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश, पाण्याची मुबलक उपलब्धता, विस्तीर्ण समुद्रकिनारे यांचे वरदान लाभले आहे. युद्ध-युद्धजन्य परिस्थिती किंवा खूप मोठ्या नैसर्गिक आपत्ती आपल्याला भेडसावत नाहीत. माझ्या मते, आरोग्य-संस्कृती रुजविण्यासाठी ही अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. आपण अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून सुरुवात करू.
आहार हा शरीराच्या गरजेच्या प्रमाणात व संतुलित असला पाहिजे. अति खाणे, उपासमार होऊ देणे, पिझ्झा-बर्गर असे निकस पदार्थ वरचेवर खाणे, अवेळी, विशेषतः उत्तररात्री खाणे, शिळे, उघड्यावरचे, दूषित अन्न खाणे, घाईघाईने अन्न गिळणे हे सर्वांसाठीच अयोग्य. याव्यतिरिक्त मधुमेह, हृदयाचे- किडनीचे आजार किंवा विशिष्ट व्याधी असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य आहार घेतला पाहिजे. नवजात शिशूला पहिले सहा महिने फक्त मातेचे दूध दिले पाहिजे. गरोदर, स्तनदा माता, वृद्ध व्यक्ती, बालके यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. खेळाडू व किशोरवयीन मुलामुलींना कृत्रिम पावडरी न देता नैसर्गिक आहारातून प्रथिने दिली पाहिजेत.
वस्त्रे ही ऋतुमानानुसार असावीत. आवडीप्रमाणे कपडे घालताना हे लक्षात घ्यावे, की बिनबाह्यांच्या किंवा अर्ध्या विजारींच्या वापरामुळे डास चावून ‘डेंग्यू’, ‘चिकुनगुनिया’ अशा आजारांचा धोका अधिक संभवतो. तसेच खूप तंग कपडे तितकेसे सुखकारक नसतात. आगीजवळ किंवा यंत्रांबरोबर काम करताना, दुचाकीवरून प्रवास करताना, बस, आगगाडीत चढता-उतरताना त्यात कपडे अडकून अपघात होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.
घर कुठे आणि कसे असावे, यात आर्थिक परिस्थिती हा घटक महत्त्वाचा ठरतो. परंतु आरोग्य-संस्कृतीचा विचार करता त्या घरात उजेड व वारा येणे, हवा खेळती राहणे, स्वच्छता असणे, पाण्याच्या टाक्या डासांपासून सुरक्षित असणे, वृद्ध व बालके यांना राहण्यास ती जागा अनुकूल असणे म्हणजे घसरण्याच्या, पडण्याच्या शक्यता कमी किंवा नष्ट करणे अशा प्रकारची असावी. त्याचबरोबर घरातील अनावश्यक वस्तू वेळच्या वेळी काढून टाकणे, तसेच उंदीर, घुशी, माश्या, झुरळे, मच्छर या साऱ्यांपासून घर सुरक्षित ठेवणे. शक्य असेल तर घराभोवती झाडे लावून त्यांची निगा राखणे. अंगण असेल, तर घरच्या घरी भाज्या, फुलझाडे लावणे व मुख्य म्हणजे घराबरोबर घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे. घराप्रमाणे कामाच्या जागाही स्वच्छ, सुरक्षित, प्रसन्न असाव्यात.
वैयक्तिक पातळीवरील आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे व्यसनाधीनता टाळणे. दररोज ७-८ तास झोप घेणे, जागरणे टाळणे व शारीरिक सक्षमता राखणे. त्यासाठी नियमित व्यायाम, चालणे, कृतिशील राहणे आवश्यक असते. सतत बैठे राहण्याने स्थूलता व आजारांना निमंत्रण मिळते. आपल्या दैनंदिन जीवन व्यवहारात नियमितता असणारे लोक दीर्घायू असलेले आढळतात.शरीराइतकेच किंवा कदाचित अधिक महत्त्वाचे मन आणि भावना! मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी व भावनांचे नियोजन करण्यासाठी कुटुंब, शाळा व इतर संस्था व विविध समाज घटकांशी येणारा निकोप संपर्क महत्त्वाचा ठरतो. खेळ, योगसाधना, प्रार्थना यांचाही उपयोग होतो आणि गरज पडल्यास मनोरोगतज्ज्ञ वा समुपदेशकांचा सल्ला घेणे इष्ट ठरते.
एक समाज म्हणून आरोग्य-संस्कृती जोपासताना वाहतुकीचे नियम पाळणे, समाजातील दुर्बल घटकांचे भान ठेवणे, एकमेकांना मदत करणे, कठीण प्रसंगी धीर देणे, कायदे पाळणे, व्यावसायिक व व्यावहारिक जीवनात नीतिमूल्यांचे पालन करणे, महिलांचा सन्मान ठेवणे, अंधश्रद्धांना फाटा देणे, आरोग्य सेवांची मागणी करणे, आपल्या नेमक्या गरजा व्यक्त करणे व आरोग्य सेवा पुरविण्यात सहभाग घेणे, आपत्कालीन परिस्थितीत स्वयंसेवा करणे व खटकणाऱ्या, चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टींसंदर्भात योग्य मार्गाने जागृती करणे हे आरोग्य-संस्कृतीत सामावते.
खेळण्यासाठी, व्यायामासाठी पुरेशी मैदाने, बागा, मोकळ्या जागा उपलब्ध करून देणे, आरोग्यपूर्ण सवयींना प्रोत्साहन देणे, अमली पदार्थांवर बंदी / नियंत्रण आणणे, अनारोग्यामुळे आर्थिक संकटात जाणाऱ्या कुटुंबांना वाचविणे, आवश्यक आरोग्यसेवा पुरवणे, जनतेच्या आरोग्यासाठी पुरेशा निधीची सोय करणे, प्रतिबंधात्मक उपायांमध्ये अधिक गुंतवणूक करणे व उपायांवरील खर्च सर्वसामान्यांच्या आटोक्यात राहील अशी धोरणे आखणे, हे सरकार आरोग्य-संस्कृती जपण्यास उत्सुक असण्याचे निदर्शक आहे.
वैयक्तिक, सामाजिक व राजकीय अशा सर्व पातळ्यांवरील आपण आरोग्य-संस्कृती जपू लागलो, तर आपल्या देशातील जीवनमान उंचावून माता व बालमृत्यू दर, आजार व रोगराई तर कमी होतीलच; पण मानवी जीवनाचा दर्जा उंचावून एक आरोग्यपूर्ण देश म्हणून आपण प्रतिष्ठा मिळवू शकू.