आधुनिक स्त्री-कर्तृत्वाचा आलेख – अरुणा ढेरे

Published by अरुणा ढेरे on   March 7, 2017 in   मराठी लेखणी

स्त्रियांचे योगदान


तेव्हा पाळण्यातसुद्धा मुलींची लग्ने व्हायची. मुलगी दहा- अकरा वर्षांच्या वयात कुमारिका असली की ती घोडनवरीच समजली जायची. मुलींची वये लहान; नवरे मात्र तिशी-चाळिशीचे किंवा कधी साठी-पासष्टीचेही द्वितीय, तृतीय वर असायचे. अवघ्या बाराव्या-तेराव्या वर्षी विधवा होऊन जन्मभर हालअपेष्टा सोसणाऱ्या मुलींची संख्या कमी नव्हती. त्या काळात वरच्या समजल्या जाणाऱ्या वर्गांत विधवांना वपनाची सक्ती होती. त्यांनी पुनर्विवाह करणे हेही पाप समजले जाई. एकूणच मुलींचे आणि स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. सती जाणाऱ्यांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. स्त्री कडे पाहण्याची समाजाची दृष्टीच निर्दय आणि अन्याय्य होती. शिक्षण नाही. स्वातंत्र्य नाही. आवड, इच्छा, मत-काहीही नाही. उपजीविकेचे साधन नाही आणि संमतीही नाही. सार्वजनिक जीवनात  ‘ स्थान, मान आणि संधी तर नाहीच, पण पदार्पणाची परवानगीही नाही. नव्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्त्रियांचे योगदान अनेक प्रकारचे आहे आणि फार मोलाचे असे आहे.

स्त्रीच्या अवनतीचा हा काळ काही फार दूरचा नव्हे. अवघा दीड-दोनशे वर्षांपूर्वीचा आहे. अगदी लहानशा अशा पुढच्या कालखंडात आश्चर्यकारक प्रगतीचा टप्पा स्त्रीने गाठला आहे. स्त्रीच्या या कर्तबगारीचे महत्त्व आणि स्त्रियांचे योगदान अनेक पातळ्यांवरचे आहे. अत्यंत प्रतिकूल अशा सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीला न जुमानता कधी संघर्ष तर कधी समन्वय करीत ज्या स्त्रियांनी विकासाच्या वाटा खुल्या करण्याचा ध्यास घेतला, त्यांच्यामुळे च आज एकविसाव्या शतकातल्या स्त्रियांना राजमार्गावरून चालता येत आहे. त्यांचे धैर्य, त्यांचे शहाणपण, त्यांचा निश्चय, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांची तळमळ या सर्व गोष्टींचे स्त्रीधन आधुनिक स्त्री ला परंपरेने मिळाले आहे. स्त्रियांचे योगदान हे फार मोठे ठरले आहे. शिक्षणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे आपण मानतो, कारण मुंबईत एलफिन्स्टन कॉलेजमधून तयार झालेल्या काही तरुणांनी आणि काही सुधारकांनी उदार इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीने मुलींची पहिली शाळा काढली आणि पाठोपाठ बहुजन समाजातल्या मुलींसाठी पुण्यात जोतिबा फुले यांनी पूर्ण देशी अशी शाळा सुरू केली. या शाळांच्या आगेमागे निघालेल्या लहानमोठ्या शाळांमधून मुली शिकू लागल्या. त्यांचे शिक्षण म्हणजे घराबाहेरच्या खुल्या जगाशी त्यांना होणारा पहिला अद्भूत परिचय होता.

ज्ञानाच्या स्पर्शाने ज्यांच्या व्यक्तित्वाला सुंदर बहर आला अशा स्त्रियांचे दर्शन त्या काळात किती नवलाचे, किती रोमांचित करणारे असेल! रवींद्रनाथ टागोरांसारखा कवी त्या काळातच एका मराठी मुलीच्या दर्शनाने अक्षरश: भारला गेला. तिचे हसणे, तिचे बोलणे, तिचे आत्मविश्वासाने वावरणे सारेच कसे उत्फुल्ल, सुंदर होते. परदेशी शिकण्यासाठी जाणाऱ्या रवींद्रनाथांना तिकडच्या रितीरिवाजांची माहिती व्हावी, इंग्रजी बोलण्याचा सराव व्हावा आणि मुख्य म्हणजे लाजाळूपणा कमी व्हावा म्हणून आत्माराम तर्खड यांच्या घरी काही महिने रवींद्रनाथ राहिले होते. तिथे तरुण रवीला अन्नपूर्णा अॅना भेटली. तर्खडांची अॅना हुशार होती. शिकलेली, बुद्धिमान आणि चतुर होती. तिच्या सहवासात टागोरांच्या प्रतिभेला पंख मिळाले. त्यांनी तिला नलिनी हे नाव दिले आणि त्यांच्या कित्येक कवितांमध्ये नलिनी उमलत राहिली. आयुष्याच्या अखेरपर्यंत टागोर नलिनीला म्हणजेच अॅनाला आपली कविताप्रेरणा म्हणून आठवत राहिले. बंगालच्या मातीत जन्मलेल्या त्या महान भारतीय कवीच्या कवितांमध्ये अन्नपूर्णेसारख्या मराठी मुलीच्या सुसंस्कृत सहवासाचा दरवळ आहे, ही केवढी अभिमानाची गोष्ट! त्या काळात ‘स्पेक्टेटर’ सारख्या वृत्तपत्रांमधून अॅनाची काही पत्रे प्रसिद्ध झालेली दिसतात. देशाविषयीच्या अभिमानाने भरलेली, इंग्रजांच्या दुटप्पी धोरणांवर टीका करणारी पत्रे! अॅनाची भाषा, तिचे इंग्रजीवरचे प्रभुत्व, तिचा देशाभिमान आणि तिची बुद्धिमत्ता यांचे दर्शन त्या पत्रांमधून घडते.

अॅनासारख्या मुली त्या काळात मोजक्याच होत्या. रेबेका सीमियन, कार्नेलिया सोराबजी, रखमाबाई दादाजी, आनंदीबाई जोशी, कृष्णाबाई केळवकर, काशीबाई नवले, लक्ष्मीबाई राजवाडे, गंगुबाई खेडकर अशा विविध समाजस्तरांमधून आलेल्या मुली! कुणी प्रचलित रूढी प्रथांविरुद्ध जाऊन लग्ने केली, लग्ने मोडली, शिक्षण घेतले, परदेश प्रवास केले, परदेशात जाऊन वेदान्तावर व्याख्याने दिली. यांचे धाडस मोठे होते. मुलींनी शिकू नये, शिकल्याने वैधव्य येते. घरकामाचे शिक्षण त्यांना पुरेसे आहे अशी समजूत असताना निर्भय आत्मविश्वासाने काहीजणी पुढे झाल्या. भाऊ, वडील, सासरे, नवरे यांच्या साहाय्याने आणि उत्तेजनाने त्यांनी शिक्षण घेतले. त्या स्वत : तर समृद्ध झाल्याच, पण स्वत : भोवतीच्या समाजासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे या भावनेने त्यांनी काम केले. कुणी डॉक्टर होऊन दवाखाने उघडले आणि पुरुष डॉक्टरांकडे जाणे नको म्हणून आयुष्य भर दुखणे सोसणाऱ्या किंवा मरण पत्करणाऱ्या स्त्रियांना मोठा दिलासा मिळाला. कुणी शिक्षिकेचा पेशा स्वीकारला आणि मुलींच्या शिक्षणाच्या वाटा प्रशस्त करीत नेल्या. कुणी स्त्रियांच्या अखिल भारतीय स्तरावरच्या संघटना निर्माण करण्यासाठी कष्ट घेतले. सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांच्यासारख्या स्त्रियांचे काम आज आपल्याला परिचित आहे, पण पंढरपूरला वडिलांच्या नावाने अनाथ बालकाश्रमाचे काम पुढे नेणाऱ्या काशीबाई नवले यांच्यासारख्या सेवाभावी डॉक्टरची आठवण आपल्याला सहसा होत नाही

नवा महाराष्ट्र व स्त्रियांचे योगदान

शिक्षणाच्या प्रारंभकाळात नाना क्षेत्रांत धडाडीने काम करू लागलेल्या अनेक स्त्रियांनी दाखवलेले सामाजिक भान फार मोलाचे होते. स्वतःची प्रगती करून घेत असतानाच इतरांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची जाणीव प्रकट करणाऱ्या स्त्रियांमध्ये ताराबाई मोडक, गोदावरी परुळेकर, अनुताई वाघ, बाया कर्वे, पार्वतीबाई आठवले, गंगुताई पटवर्धन अशी पुष्कळ नावे घेता येतील. कुणी बालशिक्षणाचे सकस प्रयोग केले, कुणी आदिवासींच्या विकासाचे कार्य केले, कुणी अनाथ, असहाय्य, गरजू स्त्रियांना आधार दिला. तळागाळातल्या समाजाच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या आणि मूलभूत मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्या मेधा पाटकरसारख्या झुंजार कार्यकर्तीपर्यंत या सर्वांच्या कार्यामागच्या निश्चयाचा, समर्पणभावनेचा आणि कणखरपणाचा वारसा येऊन पोचला आहे.

सार्वजनिक जीवनात सर्व क्षेत्रांत आत्मविश्वासाने आणि हिरिरीने पुढे सरसावलेल्या कर्तृत्ववान स्त्रियांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक विकासाला जसा हातभार लावला तसाच सांस्कृतिक विकासालाही लावला आहे. जेव्हा शिकणे हेच बाईसाठी पाप मानले जात होते तेव्हा लिहिणे किंवा गाणे किंवा नाचणे यांचा तर विचारच करता येणे शक्य नव्हते. केवळ स्त्रियांनाच कलांचे दरवाजे बंद होते असे नव्हे, तर सभ्य पुरुषांनीही गाणे-बजावणे, नाटक करणे निषिद्धच होते. तरीही लोकनिंदेचा स्वीकार करत हळूहळू स्त्रियांनी तीही क्षेत्रे आपल्या कर्तृत्वाने गाजवली.

हिराबाई बडोदेकर, मोगुबाई कुर्डीकर, केशरबाई केरकर, बाई सुंदराबाई अशा प्रारंभीच्या गायिकांनी सभ्य स्त्री-पुरुषांमध्ये गाणे पोचवले आणि कला म्हणून गाण्याला आणि कलांवत म्हणून गायिकेला प्रतिष्ठा मिळवून दिली. आकाशवाणीच्या प्रारंभाला बाई सुंदराबाईकडे संगीत विभागाचे प्रमुखपद आले आणि नव्या युगाची नांदीच झाली असे म्हटले पाहिजे. मालिनी राजूरकर, शोभा गुर्टू,वीणा सहस्त्रबुद्धे, प्रभा अत्रे, किशोरी आमोणकर आणि आशा भोसले, लता मंगेशकर यांसारखी नावे मराठी संगीतात सन्मानाने आज स्थिरपद झालेली दिसतात.

शांता आपटे, हंसा वाडकर, वनमालाबाईंपासून चित्रपट क्षेत्रात अभिनय आणि दिग्दर्शनाची स्वतंत्र मोहर उमटवणारी नावे स्मिता पाटील, सई परांजपे, माधुरी दीक्षित यांच्यापर्यंत घेता येतात आणि नाट्यक्षेत्रात तर फक्त ज्योत्स्ना भोळे किंवा जयमाला शिलेदार किंवा विजया मेहता किंवा भक्ती बर्वे किंवा प्रतिमा कुलकर्णी यांचीच नावे घेऊन थांबता येणार नाही एवढी स्त्रियांची मोठी कामगिरी नजरेत भरते.

राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर नृत्याचे आंतराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवणाऱ्या कथकनर्तकी रोहिणी भाटे किंवा भरतनाट्यमच्या पारंपरिक शैलीचा प्रतिभाबळाने विकास घडवणाऱ्या सुचेता भिडे- चापेकर यांचे ऋण वर्तमान तरुण कलावतींवर मोठेच आहे. काशीबाई कानिटकर, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, बहिणाबाई चौधरी, लक्ष्मीबाई टिळक आणि मालतीबाई बेडेकरांपासून इरावती कर्वे, दुर्गा भागवतांपर्यंत अनेक लेखिकांनी साहित्यक्षेत्राला जी वैचारिक आणि भावनिक समृद्धी दिली तिच्यामुळेच नव्या पिढीतल्या लेखनाची मुळे पोसली गेली आहेत.

एकूणच गेल्या दोन दशकांतल्या स्त्रियांच्या विविधांगी कामगिरीचे दर्शन अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. स्त्रियांनी परकीयांशी संघर्ष केला. परकीयांच्या अहंकाराशी आणि तुच्छताभावाशी संघर्ष केला. त्यांनी स्वकीयांच्या संकुचित अन्याय्य दृष्टिकोनाशी संघर्ष केला, अंध रूढीप्रथाशी संघर्ष केला. त्यांनी दडपणे झुगारली, अनिष्ट बंधने नाकारली, त्यांनी राजकीय हक्क मिळवले, सार्वजनिक क्षेत्रात संचार करण्याची मुक्तता मिळवली. साहित्य, कला, कायदा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये आश्चर्यकारक कर्तृत्व गाजवले. आई, बहीण, मुलगी, पत्नी, भावजय या नात्यांची जबाबदारी सांभाळत समजुतीने काम करता करता सहकारी म्हणून, सखी म्हणून, सुजाण नागरिक म्हणून त्या जगल्या. पुरुषविरोध आणि सत्ताकांक्षा याऐवजी सहृदयता आणि सामाजिक दायित्वाची जाण त्यांनी प्रकट केली.

इतिहासाच्या मंचावर उमटणारा कर्तृत्ववान स्त्रियांचा पदन्यास, त्यांचा स्वर, त्यांचे शब्द आणि त्यांची कृती यामुळे आमच्या कलेची, संस्कृतीची आणि समाजाची स्त्री कडे पाहण्याची दृष्टी बदलली. त्यांचे ऋण आमच्या वर्तमानावरच नव्हे, तर भविष्यावरही आहे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


 अरुणा ढेरे (कालनिर्णय ,सप्टेंबर २००४)