बोनसचे दिवस आले होते. आम्ही दोघं नवराबायको त्या रकमेत घरात काय-काय, किती-किती करता येईल ह्याचे हिशेब मांडीत-मोडीत होतो. तेवढयात एक नेहमीचे गृहस्थ आले. आमच्यातला सारा प्रकार ते अवाक होऊन पाहात होते.
ह्यांना एवढं कसलं आश्र्चर्य वाटतंय ॽ माझ्या मनात आलं. मी विचारलही. ते म्हणाले, हा माणूस-म्हणजे तुमचा नवरा व्यवहारात गाढवच दिसतो. बोनस किती आला-येणार तुम्हाला कशाला सांगतोय ॽ अहो, एकदा रक्कम केवढी हे कळलं की तुम्ही हट्ट करणार, एवढया एवढयाचे मला दागिने करुन दिलेच पाहिजेत! मी तर मुळीच घरात सांगत नाही. बोनस किती आला तुम्हाला कळलंय, तुम्ही माझ्या बायकोला ओळखता. पण वहिनी, प्लीज तिला नका सांगू हं ! नाहीतर इतकी मागणीपत्र येतील अन् त्यावरुन पुढच्या बोनसपर्यंत घराच कुरुक्षेत्र.
मला त्या माणसाच्या खोटेपणाचा, लपवाछपवीचा रागही आला, खेदही वाटला. मी जरा बारकाईने आजूबाजूला पाहू लागले. अन् हा प्रकार जिकडेतिकडे आहेच हे जाणवलं. पुरुषांच्या ह्या अशा वर्तनाचं कारण शोधू गेले- व ते माझ्यातच-स्त्रियांच्या वागण्यातच सापडलं.
बहुसंख्य स्त्रिया म्हणजे ‘आणा’ असतो, माझी एक मैत्रीण थट्टेने म्हणते. आणा म्हणजे जुनं नाणं नव्हे. हे घ्या, ते घ्या, अमकं हवं, तमकं पाहिजे असा ‘आणा’. बहुधा तो आणा पतीच्या खिशापेक्षा मोठा-मोठा होऊ लागतो. म्हणून मग पुष्कळसे पती आपल्या कमाईचा नेमका अंदाज पत्नीला लागू देत नाहीत. खरी मिळकत सांगत नाहीत. हेतू, त्यांचे हट्ट अवास्तव वाढू नयेत. जरा कान टवकारले तर घराघरातून टणत्कार ऐकू येतात.
‘‘तुमचे माझ्यावर प्रेमच नाही. त्या अमकी-तमकीला तिच्या नवऱ्यानं नेकलेस केला-तुम्ही मात्र-’’ वस्तूंची नाव बदलतात, दाखल्याच्या व्यक्ती वेगवेगळ्या होतात. पण तक्रार मात्र तीच-अगदी एकच असते. काही वेळा तर पटवूनही त्यांची समजूत पटत नाही. नवऱ्याला शक्य आहे तरी तो आपल्या हौशी पुरवीत नाही. ऐकत असतानाही अमुक एक घेत नाही. स्वतः मात्र चैन करतात, मित्रांवर, सिगारेटींवर पैसे उधळतात, अशी काही बायकांची पक्की खात्री असते. म्हणून मग नवऱ्याला लाटायला, नवऱ्याकडून वस्तू उपटायला सुरुवात होते.
‘काल त्यांच्या आवडीची भाजी केली अन् पर्स कबूल करुन घेतली.’ असं कुणी कौतुकानं सांगते. चार बायका एकत्र जमल्यावर तर आपण कशा चतुराईनं नवऱ्याकडून वस्तू उपटतो हे सांगण्याची चढाओढच लागते.
स्त्रीहट्ट कठीण असा प्रत्येक पुरुषाचा अनुभव असतो. हे हट्ट आवाक्यातले असतील, त्यात जोवर गोडवा असेल तोवर त्याला एक आगळी गंमत असते, त्या मौजेत नवराबायको दोघंही खुलून-फुलून रमतात. पण-पतीनं अमुक एक वस्तू देईन म्हटलं व ती देता आली नाही की घरात महिने न् महिने अबोला धरुन बसणाऱ्या, आदळ-आपट करीत काम करणाऱ्या, नवऱ्याला उठसूठ चार माणसांत टोमणे मारुन हिणवणाऱ्या, घराचं घरपण मळवून टाकणाऱ्या स्त्रियाही आढळतात. मग पत्नीचे हट्ट पुरवता यावे, तिच्या हौशीमौजी भागवता याव्या म्हणून पार्टटाइम नोकऱ्या करणारे पतीही दिसतात. पुष्कळसे पती बायकांचे हट्ट पुरवण्यासाठी कर्ज काढतात ! उधाऱ्याही करतात !
खरं तर सर्वसाधारण पती माणूसच असतो. आपल्या माणसांवर प्रेम करणं, त्यांच्या आवडीनिवडी बघणं, त्यांच्यासाठी झटणं, त्यांना चार चांगल्या वस्तू घेऊन देणं हे तो आपल्या कुवतीनुसार करीतच असतो. पण काही स्त्रियांना त्याची जाणच नसते. अंगावर खूपसे दागिने, तऱ्हेतऱ्हेच्या फॅशनच्या साडया असल्या म्हणजेच नवऱ्याचं प्रेम असणं असा त्यांचा हिशेब असतो. पुष्कळदा तर दुसरीजवळ आहे, म्हणून ते मला हवंच-मला ते नवरा देत नाही, म्हणजे त्याचं माझ्यावर प्रेमच नाही, असाही त्यांचा भिनलेला समज असतो. एकवेळ विष उतरवणं सोपं, पण ह्या वेडातून त्या स्त्रियांना सोडवणं कठीण होऊन बसतं, मग साहजिकच पुरुषाला घर संसार फासासारखा वाटू लागतो.
संसार रम्य खेळ की आखाडा
संसार एक रम्य खेळ ! त्यात दोन पक्ष असले तरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी नव्हेत. तिथं चुरस असली तरी शत्रुत्व नसावं. दोघांनी मिळून खेळ रंगवायचा. हारजित सारख्याच संयमाने स्वीकारायची, असं ते क्रीडांगण आहे. नवरा त्या खेळातला समोरचा खेळाडू ! पण पुष्कळशा स्त्रिया नवऱ्याला प्रतिस्पर्धीच समजतात. नवरा आपल्याला नेहमीच फसवतो, आपण हुशारीनं वागून म्हणजे गोडीगुलाबीच्या लांडयालबाडया करुन त्याच्याकडून जमेल ते ते उकळल पाहिजे. त्या साध्यासाठी झटणं म्हणजे अंगी चातुर्य असणं ! असं त्याचं तत्वज्ञान असतं.
पण असा संसार आखाडा बनतो ! कुस्तीतले दोन मल्ल एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी शोधीत, बळ दाखवीत, चपळाई करीत, सतत झुंजत असतात. तसं त्या संसाराला स्वरुप येतं. पुरुष कितीही पराक्रमी, खंबीर असला, तरी घरच्या आघाडीवर लढाऊ वृत्तीन खचत भंगत दिवस काढतो ! नवरा आपलाच माणूस हे काही स्त्रियांना उमजतच नाही. माहेरच बरं असलं तर येता जाता त्याचा टेंभा मिरवून नवऱ्याला खिजवणं त्यांना चातुर्याच वाटतं. पती आपल्याला अमुक एक वस्तू-सुखसोय देऊ शकत नाही हे त्याच हीनत्व आहे, ते चारचौघात उघड करणं त्यांना स्वतःच्या मोठेपणाचं वाटतं.
स्त्रीहट्टापायी अनेक घर कोसळायला आलेली दिसतात. पत्नीच्या मागण्यांचे धोंडे खाऊन पती जर्जर झालेला दिसतो. पतीच्या आमने सामने असण्यापेक्षा त्याच्या बरोबरीने राहणं हाच खरा पत्नीधर्म ! पतीला स्फूर्ती देणं वेगळं-भडकवणं वेगळं ! सतत हिणवून त्याच्या पौरुषावर आघात होतो. संसारात पति-पत्नी मित्र असावेत. त्यांच्यात सामंजस्य असायला हव. शरीराच्या मिलापापेक्षा तेच जास्त महत्त्वाचं ! दोन वेगळे छाप असूनही एकच असलेल संसार हे नाणं ! एक छाप जरी पुसट झाला तरी त्याची किंमत गेली !
नवऱ्याची कमाई, संसाराच्या गरजा, इतर अडचणी पाहून त्यानुरुप स्त्रियांना आपले हट्ट बेतायला हवेत. त्या शिलकेच्या परिघातच आपल्या मागण्या ठेवल्या पाहिजेत. दार कुरकुरलं तर ती नित्याचीच गोष्ट ! पण भिंती कोसळू लागल्या तर घरातलं सारं उघडयावर येतं ! स्त्रीच्या हट्टानं भिंती उभ्या ठेवल्या पाहिजेत. कुटुंबाचे आधार काढून घेता कामा नयेत. नवऱ्याची उघळपाघळ संसाराला मारक ठरत नाही. पण अवास्तव स्त्रीहट्ट पुरुषाला हीन बनवतात. त्याची स्फूर्ती मारतात.
संसार म्हणजे सौदेबाजी नव्हे. ती एक रंगलेली जुगलबंदी मैफिल असते. जोडीनं उभ्या असलेल्या दैवतांच्या मूर्ती, त्यांच्या अस्तित्वाच्या मांगल्यानं भरलेला, भक्तिनं दरवळलेला तो गाभारा-मंदिर असतं !
लैला महाजन – कालनिर्णय दिनदर्शिका ऑक्टोबर १९८०