१९४८ मध्ये ३० जानेवारी रोजी म्हणजे आजच्याच दिवशी महात्मा गांधी या जगातून गेले. गांधीजी देहरुपाने गेले असले तरी मरावे परी कीर्तिरुपे उरावे या समर्थांच्या वचनाप्रमाणे ते उरलेले आहेतच. जगभरचे विचारवंत आजही गांधीजींच्या विचारांची मुक्त कंठाने स्तुती करीत असतात.
नेल्सन मंडेलांसारखा जगन्मान्य नेता आपल्या अलौकिक यशाचे श्रेय गांधीजींच्या तत्त्वज्ञानाला देतो. त्यांच्या निधनाला चार दशके लोटल्यावरही त्यांच्यावरचा चित्रपट जगभरातील लोकांना आकर्षित करु शकतो. सत्याग्रह, बहिष्कार, उपोषण, अहिंसात्मक प्रतिकार अशी जगावेगळी शस्त्रे या महात्म्याने यशस्वीपणे हाताळली. महात्मा गांधींनी उपवास केला की, सर्व देश एकाच वेळी चिंतेने व्यथित आणि संतापाने बेभान होई. सातासमुद्रापलीकडे इंग्रजांच्या काळजात धडकी भरे. ‘नंगा फकीर’ म्हणून हेटाळल्या जाणाऱ्या या माणसाची मानसिक ताकद विलक्षण होती.
गांधजींनी सर्वार्थाने इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारचे राजकारण तर केलेच, पण त्याशिवाय जीवनाच्या विविध क्षेत्रांत वेगवेगळे प्रयोग करुन आपल्या लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वाचा ठसा अशा रितीने जगासमोर ठेवला की, मी मी म्हणणाऱ्यांचीही मती कुंठित व्हावी. आहार, आरोग्य, मनोविकार, धर्म, नीती, ग्रामोद्धार, स्वावलंबन, मनःशुद्धी, प्रार्थना इत्यादी अनेक विषयांत गांधीजींची म्हणून खास आग्रही मते होती. ती मते पडताळून पाहण्यासाठी गांधीजी कोणाचीही फिकीर न करता किंवा आपल्या लोकमानसातील प्रतिमेवर काय प्रतिकूल परिणाम घडेल याचाही विचार न करता निःशंक मनाने स्वतःला वाटेल त्या अवघड स्थितीत झोकून देत.
आज गांधीजींच्या स्मृतिवर्षाचा प्रारंभ करताना मागे वळून पाहिले तर अनेक विषयांतले गांधीजींचे अंदाज खरे उतरल्याचे दिसून येते. गांधीजी माणूसच होते. काही विषयांतील त्यांची मते काळाच्या निकषावर टिकली नाहीत. आपण गांधीजींकडे केवळ राजकारणी म्हणून पाहतो. त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा माणूस घडविण्याचे जे स्वप्न बाळगले ते प्रत्यक्षात यावे म्हणून विशेष प्रयत्न झाल्याचे आढळत नाही. गांधीजींच्या कार्याशी संबंधित असलेल्या संस्थांनी या दिशेने विचार करण्याची गरज आहे.
लाला लजपतराय काय, महात्मा गांधी काय किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले शेकडो, हजारो इतर नेते काय ते स्वार्थ हेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती । तो परार्थी पाहती ॥ या विचाराचे होते. स्वार्थासाठी, स्वतःचा नावलौकिक वाढविण्यासाठी किंवा आपल्या वंशजांच्या चरितार्थाची सोय करण्यासाठी त्यांपैकी कोणी समाजसेवा वा देशभक्ती करीत नव्हते.
या नेत्यांनी जे आदर्श नजरेसमोर ठेवले त्यांचे योग्य प्रकारे स्मरण नव्या पिढीला करुन दिले पाहिजे. पुढारीपणा म्हणजे देशभक्तीचे सोंग हीच प्रतिमा झपाटयाने सर्वत्र फैलावत असताना ऐतिहासिक महत्त्व पावलेल्या थोरांचे आदर्श नव्या पिढीच्या नजरेसमोर ठेवले पाहिजेत. स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे हे श्रेष्ठ आत्मे म्हणजे ‘धर्मस्थापनेचे नर’ होत आणि ते ‘देणे ईश्र्वराचे’ हे समजून घेतले पाहिजे.