जीवनात प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा तरी आदर्श हा असतोच. लहानपणापासून वडील हेच ‘आदर्श’ होते. हे कर, हे करू नको! असे त्यांनी मला कधीही सांगितले नाही, परंतु तेच माझे खरे ‘हीरो’ होते, आहेत आणि राहतील.
आम्ही ‘साहित्य सहवास’ मध्ये चौथ्या मजल्यावर राहायचो, त्यावेळी माझे मित्र, पोस्टमन, कचरा नेणारे, घरगडी ह्यांची विचारपूस वडील आपुलकीने करत. त्यांना सणासुदीच्या शुभेच्छा तर द्यायचेच पण वेळप्रसंगी मदतही करायचे. पोस्टमनला तर घरात बसवून पाणी द्यायचे. मला त्यावेळी त्यांच्या अशा वागण्याचा बोध होत नव्हता, पण आता त्यामागची त्यांची भावना कळते. पोस्टमन चार मजले चढून येतो, घरोघरी जातो, त्याला जी मेहनत पडते त्याची जाण आणि कदर माझे वडील करीत असत आणि आता मी मोठा झाल्यावर त्या सगळ्या गोष्टींचे महत्त्व मला कळते. त्यांनी स्वत: त्रास सोसून गरजू लोकांना केलेली मदत मला अजूनही आठवते. आपल्या कृतीने दुसऱ्याला नेहमी आनंद मिळेल असे त्यांचे वागणे होते. अशा वेळी स्वतःची होत असलेली कुचंबणा त्यांनी कधीच जाणवू दिली नाही, याउलट ते नेहमी हसत-खेळत, आनंदी राहायचे. हेच आयुष्याचे सार आहे असे माझे मत आहे.
वडिलांचे विचार त्यांनी माझे साधेपणाने केलेले पालन आणि कुठेही बढाया न मारता अनुसरलेली जीवनपद्धती, हे सर्व लहानपणापासून डोळ्यांसमोर असल्यामुळे, माझ्या मनावर त्यांच्या प्रतिभेचे आणि प्रतिमेचे संस्कार नकळत घडतच गेले. माझे ‘हिरो’ माझे बाबाच! लहानपणापासून कुठल्याही मॅचमध्ये मी विक्रमी किंवा विलक्षण कामगिरी केली की, देवासमोर पेढे ठेवणे हा बाबांनी दिलेला शिरस्ता मी आजही पाळतो. देवाचे आभार मानतो आणि पुढच्या कामगिरीच्या विचारास लागतो. मला घडविण्यात माझ्या मोठ्या भावाचा म्हणजेच अजितदादाचा हातभार फार महत्त्वाचा व मोलाचा आहे. त्याने मला आयुष्यासाठी काही नियम आखून दिले आहेत. उदा., ‘मागचे मागे ठेव, त्याबाबत लोक विचार करतील, तू पुढच्या मॅचचा विचार कर.’ हेच समीकरण माझ्या आयुष्याचे सूत्र ठरले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
माझी आई ही माझी सर्वार्थाने प्रेरणा! लहानपणी तिचे माझ्यावर खूपच बारीक लक्ष असायचे. मी पौष्टिक आहार कोणता आणि कधी घ्यायचा ह्याचे वेळापत्रक ती सांभाळीत असे. आमची परिस्थिती तशी बेताचीच होती, तरीही तिने मला कधीही काही कमी पडू दिले नाही. अनेक तडजोडी करीत माझ्यावर लक्ष केंद्रित केले. आपली एल. आय.सी.मधील नोकरी सांभाळून संसारगाडा चालविणाऱ्या आईने आमच्याकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. दररोज सायंकाळी आम्हा मुलांसाठी ती आवर्जून वेळ काढत असे. तिने त्यावेळी केलेल्या संस्कारांचा पगडा अजूनही माझ्या मनावर कायम आहे. माझ्या मते ‘आई’ चे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असते. मी जगात कुठेही असलो तरी ती माझ्या पाठीशी उभी आहे असे मला वेळोवेळी जाणवत असते. हल्ली असे दिसून येते की कित्येक मुलांच्या पालकांना आपला मुलगा ‘सचिन व्हावा असे वाटते आणि त्या दृष्टीने ते आपल्या मुलाला घडविण्याचा प्रयत्नही करतात. ह्याबाबतीत मला एक आवर्जून सांगावयाचे आहे की, मुलांना काय आवडते, रुचते तेच त्यांना करू द्या?’, ‘तू आमिर हो, ‘तू ए. आर रेहमान झाला पाहिजेस’ अशी त्यांच्यावर सक्ती करू नका.
मुलांची आवड-निवड समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्यावर जबरदस्ती, दबाव नको. मी आणि अंजलीने चि. अर्जुनला क्रिकेटमध्ये येण्याची किंवा आणण्याची जबरदस्ती केली नाही. वयाच्या चार- पाच वर्षापर्यंत तर तो क्रिकेटकडे दुर्लक्ष वा द्वेषच करीत होता. परंतु नंतर हळूहळू त्याला गोडी लागत गेली. पहिली पाच वर्षे क्रिकेटबद्दल तो बोलायचाही नाही. मी दौऱ्यावर जायच्या आदल्या संध्याकाळपासून माझ्यापासून दूर-दूर राहायचा, अबोला धरायचा. मी निघत असताना मला बाय ही करीत नसे. मी पुन्हा परतलो तरी ह्याचा अबोला सुरूच! थोड्या कालावधीनंतर मी म्हणायचो, ” चल खेळूया. ” मग स्वारी नॉर्मल व्हायची! सुरुवातीला तो बुद्धीबळ-वेडा होता, नंतर त्याचे वेड ‘फुटबॉल’ कडे झुकले. काही दिवसांनी त्याचा तोच क्रिकेट खेळू लागला आणि आता तर तो दिवसाचे चोवीस तास क्रिकेटमध्येच असतो! आई – वडिलांनी मुलांची आवड समजून घेणे फार महत्त्वाचे असते, त्यांना स्वत:लाच जर नेमके उमगत नसेल तर थोडे ‘पुश’ करणे आवश्यक आहे. मात्र लहानपणी त्यांच्यावर करण्यात आलेल्या जबरदस्तीचा दोष ही मुले त्यांच्या वयाच्या २४ – २५ व्या वर्षी आपल्याला देणार नाहीत ना, ह्याची खबरदारी पालकांनी वेळीच घ्यायला हवी.
आता माझ्याबाबत सांगायचे झाले, तर लहानपणी माझी ‘टेनिस बॉलनेच खेळणे’ ही आवड होती. माझा मोठा भाऊ अजितदादा क्रिकेट चांगला खेळायचा. मी बाजूला राहून फिल्डिंग करायचो. त्या वेळी ‘साहित्य सहवास विरुद्ध पत्रकार’, ‘साहित्य सहवास विरुद्ध आर्टेक’ अशा मॅचेस व्हायच्या. त्यात मला संधी दिली जाऊ लागली. त्यातील कामगिरीची नोंद माझा मोठा भाऊ बारकाईने घेत होता. त्याचकाळात माझी कॉलनीत मस्तीही फार चालायची.
तसा मी मुळात खट्याळच. गाडीच्या टायरमधील हवा काढणे, सगळ्यांच्या दाराला कड्या घालून जाणे, अशा कृत्यांमुळे माझ्या तक्रारीही घरी यायच्या ! हे सगळे बघून अजितदादाने मला सुट्टीत शिवाजी पार्कवर खेळावयास जायला सांगितले. खेळून पूर्णपणे दमून येऊन मी थकून झोपायचो. दादाने माझ्यातील कौशल्य जाणून मला आचरेकर सरांकडे कॅम्प निवडीसाठी नेले. त्या दिवशी सरांना माझा खेळ आवडला नाही, तेव्हा ‘हा सिझन बॉलने प्रथमच खेळतोय’ असे दादाने सांगितल्यावर सरांनी मला तीन दिवस सरावासाठी बोलावले. सरांनी तीनही दिवस दुरून माझ्या खेळाचे निरीक्षण केले आणि मग निवडही केली. मी दोन महिन्याचे कॅम्प्स केले. माझ्या भवितव्याच्या दृष्टीने माझी शाळा बदलून मला शारदाश्रम शाळेत दाखल करण्यात आले. ह्याबाबतचे सर्व निर्णय अजितदादाच घेत होता. त्याचेच मार्गदर्शन मला लाभले. महत्त्वाचे निर्णय घेण्याची माझी त्यावेळी कुवत नव्हती. पण पुढे मात्र कळले की, त्याने स्वत:च्या खेळावर पाणी सोडून माझ्यासाठी बऱ्याच तडजोडी केल्या. स्वत:ला बदलवले. मला रोज सकाळी सरावासाठी वांद्रा ते दादर-शारदाश्रम असा प्रवास दोन बस बदलून करावा लागायचा. एक बस चुकली की दिवसभराचे सारे गणित कोलमडायचे. ह्यावर उपाय म्हणून दादाने माझी शिवाजी पार्क येथील इंद्रवदन सोसायटीत राहणाऱ्या काकांकडे सोय केली. परिणामी सराव-शाळा ही गणिते चोख होऊ लागली.
माझी आई व बाबा रोज सायंकाळी मला भेटायला शिवाजी पार्कला यायचे आणि नंतर वांद्र्याला जायचे. त्या वेळी मला त्याचे महत्त्व जाणवले नाही. परंतु आता मात्र, ते तसे का करीत होते हे कळते. काका-काकूंनी तर मला स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढविले. मी तीन वर्षे त्यांच्याकडे होतो. माझ्या आयुष्यात त्यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. मैदानावरची खेळासाठीची मेहनत तर मी करतच होतो, परंतु त्यापेक्षा माझे आई-वडील, अजितदादा, सविताताई, नितीनदादा, काका-काकू आणि माझे प्रशिक्षक ह्यांचा माझ्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा आहे.
माझ्या वडिलांना क्रिकेटची काहीच माहिती नव्हती. ते कधी क्रिकेट खेळतही नव्हते. मात्र मला ते नेहमी एकाग्रता वाढावी याकरिता प्रोत्साहन देत. दबाव मात्र कधीच टाकीत नसत. त्यांचे लहानपणापासून माझ्यावर संस्कार होते, म्हणूनच मी शतक ठोकले की वर बघून देवाला आणि वडिलांना विनम्र अभिवादन करतो. प्रत्येक मॅचअगोदर देवासमोर नतमस्तक होऊनच जातो आणि माझ्या उल्लेखनीय कामगिरीनंतर पेढे ठेवून त्याचे आभार मानतो. पूजापाठ गैर आहे असे मी मानत नाही, परंतु आपल्या कर्तृत्वावर अधिक जोर द्या आणि देवाला स्मरून कामगिरी करून दाखवा, असेच मी तरुण पिढीला सांगेन. आपण आपले आदर्श, गुरू, मार्गदर्शक योग्य निवडले पाहिजेत. माझे आदर्श गावस्कर-विवियन रिचर्डस्, मार्गदर्शक भाऊ आणि आचरेकर सर तर वडिलांना मी कायम आदर्श आणि गुरू असेच मानले.
मी जेव्हा पहिल्यांदा भारतातर्फे खेळलो तेव्हा माझ्या वडिलांनी एक मोलाचा सल्ला दिला होता, ‘ही तर सुरुवात आहे, यशाने आणि कीर्तीने वाहवत जाऊ नकोस. पुढे तुला फार मोठी कर्तृत्वाची इमारत बांधायची आहे. प्रसिद्धी, कीर्ती ह्या गोष्टी १० – १५ वर्षे राहतील, पण निसर्गनियमानुसार तू कायम राहणार आहेस. तेव्हा तू स्वत:ला सांभाळेस आणि घडविलेस तर लोक तुझ्यावर निरंतर प्रेम करतील. ते तुझे स्थान वेगळे असेल, तुला कधीच कशाची चिंता करावी लागणार नाही.’ मीही त्या सल्ल्याचे अगदी तंतोतंत पालन केले. माझ्या आयुष्यात मला योग्य वेळी अॅवार्डस् मिळत गेले, जे मला माझ्यासाठी महत्त्वाचे वाटते. आपण एक ‘चांगली- आदर्श व्यक्ती’ होण्याचा प्रयत्न करा, यश आपोआप मिळतेच आणि तुम्हाला मानसन्मानही काही पटींनी दिला जातो. अन्यथा हे सगळे मिळणे मुश्किल. आपल्याबद्दल ‘तो माणूस खरा’ असे बोलले गेले पाहिजे. तसेच, आयुष्यात ‘स्वप्ने बघणे’ आवश्यक तर आहेच, परंतु त्यांचा सातत्याने पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात साकार करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
क्रिकेटने मला भरपूर दिले आहे. ज्यांनी ज्यांनी मला सुरुवातीला मदत केली त्यांना मी अद्याप विसरलेलो नाही. त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी त्यांना मदतही करतो. त्यांना सहकार्याचा हात देणे हे मी माझे कर्तव्य समजतो. प्रत्येकाने आपली पाळेमुळे विसरता कामा नयेत. ‘देणं’ हे महत्त्वाचे आहे. जर मी ‘दिलं’ तर माझे अनुकरण इतरही करतील, अशी माझी मनोमन खात्री आहे. पण मला, मी जे ‘देतो’ त्याचा बोलबाला करायला आवडत नाही. माझ्या देण्याने मला जे समाधान मिळते तेच मी महत्त्वाचे मानतो. लोकांच्या समाधानासाठी आणि प्रसिद्धीसाठी काही ‘देणे-करणे’ मला योग्य वाटत नाही, म्हणूनच मी त्याचा गाजावाजा होणार नाही ह्याची खबरदारी बाळगतो.
वाचा : माझ्या यशाचे रहस्य (सुनील गावस्कर)
माझ्या संपूर्ण निवृत्तीचा मी अजून तरी विचार केलेला नाही, परंतु खेळणे थांबविल्यावर गरजू माणसे जिथे आहेत तिथे समाजकार्य करायला मला आवडेल. सध्याही तशा बऱ्याचशा गोष्टी करतो, परंतु निवृत्तीनंतर त्या अधिक विस्तृत प्रमाणात करायला मला नक्कीच आवडतील.
– सचिन रमेश तेंडुलकर । कालनिर्णय डिसेंबर २०१४
कालनिर्णयचे फेसबुक पेज Like करा.
Pingback: माझ्या यशाचे रहस्य । सुनील गावस्कर । कालनिर्णय । जून १९९४