आई
परिभ्रमण चालू असतांना अंबाजोगाई येथे समर्थ एका देवळात कीर्तन करीत होते. त्यांच्या कीर्तनाला योगायोगाने जांब गावचे एक वृद्ध गृहस्थही आले होते. समर्थांची कीर्ती, त्यांची वाणी, रूप हे सारे पाहून त्या गृहस्थांना वीस-बावीस वर्षांपूर्वी बोहल्यावरून पळून गेलेल्या ठोसरांच्या नारायणाची आठवण झाली. थोडी शंका येऊन त्यांनी कीर्तन संपल्यावर समर्थांना सरळ ‘ मूळ कुठले?’ म्हणून विचारले. समर्थांनी जांब गावचा म्हणून सांगताच त्या गृहस्थांनी रागावून तुमचे ठीक चालले आहे. पण तिथे तुमच्या आईने तुमच्या वियोगाने जो आक्रोश केला त्यात तिचे डोळेदेखील गेले. मागाहून हवे तिकडे जा, पण आता आधी एकदा आई ला भेटून जा, असा उपदेश केला.त्या गृहस्थांकडून घरची हकिगत कळल्यावर समर्थ मातृप्रेमाच्या ओढीने मार्गात कुठेही न थांबता तडक जांब गावी येऊन पोहोचले.
साधारण बत्तीस-तेहतीस वर्षांचे वय, सूर्यनमस्काराने बलदंड, बांधेसूद झालेले असे समर्थ वीस-एकवीस वर्षांनंतर घरी आले होते. आईच्या ओढीने ते घराच्या दारापर्यंत आले खरे, पण एकदम घरात न जाता दारात उभे राहून त्यांनी खणखणीत आवाजात एक स्वरचित श्लोक म्हणून जय जय रघुवीर समर्थ । असा रघुवीराच्या नावाचा जयजयकार केला. पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून पुन्हा दोन श्लोक म्हटले. पण आई मुलाचा बदललेला आवाज ओळखू शकली नाही. मात्र तिने आपल्या सुनेला म्हणजे समर्थांचे वडीलबंधू श्रेष्ठ यांच्या पत्नीला, ‘ बाहेर गोसावी आला आहे त्याला थोडी भिक्षा घालून ये ‘ असे निर्विकार मनाने म्हटले. समर्थांनी आईचे ते उद्गार ऐकले आणि ‘ हा गोसावी भिक्षा घेऊन जाणाऱ्यांपैकी नाही ’ असे गदगदल्या स्वरात सांगितले. त्याबरोबर आईला आपल्या लाडक्या लेकाची ओळख पटली. माझा नारायण आला की काय? असे आनंदाने आई विचारीत असतानाच समर्थांनी आत येऊन तिच्या पायावर आपले मस्तक ठेवून ‘ होय आई, मी नारायण आलो आहे, ’ असे उत्तर दिले.
माय-लेकरांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या साहाय्याने मोकळीक दिली. काही वेळाने भानावर येऊन आई आपल्या लेकराला हाताने चाचपडून पाहू लागली. कारण लेकाच्या वियोगाने रडून रडून तिची दृष्टी गेली होती. समर्थांचा वज्रदेह हातानेच अनुभवून आई हताशपणे म्हणाली, ‘ नारायणा, तुझे हे रूप बघू तरी कसे? डोळेच नाहीत ना मला आता. ‘ आईचे हे उद्गार नारायणाच्या काळजाला भिडले. आपण गृहत्याग केल्यामुळे रडून रडून मातेचे डोळे गेले, हे समजून तै अंतर्बाह्य गलबलले. मनाच्या तशा व्याकुळ अवस्थेत समर्थांनी आईच्या डोळ्यांवरून आपला समर्थ हात फिरविला आणि काय आश्चर्य! आईला दृष्टी आली. नव्याने दृष्टी लाभलेल्या आईने कौतुकाने आपल्या या लाघवी लेकाला न्याहाळीत विचारले, ‘ हा चमत्कार कसा केलास रे बाबा? ही भूतचेष्टा कुठे शिकलास?’ त्यावर समर्थ उत्तरले,
सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय । रामदास नित्य गाय । तेंचि भूत गे माये । ।
हे भूत म्हणजे प्रत्यक्ष रामराजाच बरं का आई!
होतें वैकुंठीचे कोनीं । शिरलें अयोध्याभुवनीं । लागे कौसल्येचे स्तनीं । तें चि भूत गे माये । ।
त्यानंतर समर्थ काही काळ घरी राहून सर्वांना वीस वर्षांचे स्वत चे अनुभव कथन करून आईची, वडीलबंधूंची परवानगी घेऊन, गावकऱ्यांचा निरोप घेऊन लोककल्याणार्थ पुन्हा भ्रमंतीस निघाले. उपलब्ध माहितीप्रमाणे त्यानंतर पुढे पुन्हा एकदा ते जांब गावी आले होते. जांब येथे ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता त्याच ठिकाणी १८५४ च्या चैत्र शुद्ध नवमीला भव्य मंदिर उभारून त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली.
समर्थांचे एकूण चरित्र बघता राणूबाईच्या या लाघवी लेकराने केवळ आपल्या आईलाच पुनर्दृष्टी प्राप्त करून दिली असे नव्हे तर महाराष्ट्र-मातेच्या लेकरांनाही नवी दृष्टी प्राप्त व्हावी, स्वत्व विसरलेल्या त्यांच्या डोळ्यांवरचे ‘ मळभ ’ दूर व्हावे म्हणून भीम-प्रयत्न केले.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या
(क्रमश:)