समर्थांची परंपरा (समर्थ स्मरण : ३)

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   February 22, 2017 in   समर्थ स्मरण

प्रत्येक संताची म्हणून एक परंपरा असते. ही परंपरा त्या संताच्या उदयापूर्वीपासून चालत आलेली असते आणि त्यांच्यापुढेही ती चालू राहणारी असते. हा संत त्या परंपरेमधील एक दुवा असतो. दुवा खरा, पण तो फार महत्त्वाचा ठरतो. कारण त्याच्यामुळेच त्याच्याआधी त्या परंपरेत कोण कोण होऊन गेले ते जसे समजू शकते, तसेच त्याचे शिष्य, प्रशिष्य कोण हेही आपल्याला जाणवू शकते.

समर्थांनी कोण्या गुरूकडून दीक्षा घेतली नाही. प्रत्यक्ष प्रभुरामचंद्र त्यांचे गुरू हे सर्वज्ञात आहे. अर्थात समर्थांनी जे विचार मांडले ते विचार पूर्वपरंपरेतून आलेले आहेत. समर्थांनी भगवद्‌गीतेचा आधार अनेक ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसतो. दासबोधातही समर्थांनी भगवद्‌गीतेतील वचने उद्‌धृत केलेली आहेत. पण ही परंपरा वैचारिक परंपरा झाली, हे आपण मानतो. त्याप्रमाणे गुरुशिष्य परंपरा नव्हे. समर्थांच्या बाबतीत लौकिक गुरूशिष्याची परंपरा ही समर्थांपासूनच सुरू झाली आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, ही परंपरा आजतागायत अबाधित चालू आहे.

धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिर संस्थेने जशी ही परंपरा चालू ठेवली आहे तशीच अगदी समर्थांच्या काळापासून सज्जनगडावरही ही परंपरा आजही आपल्याला दिसते. चाफळ येथेही समर्थ परंपरा अशीच चालू आहे. सज्जनगडावरून ‘ सज्जनगड ’ या नावाचे मासिक निघते. धुळ्याचे समर्थभक्तही एक नियतकालिक चालवितात. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांतच नव्हे तर दूरवरच्या लहान लहान गावांतही समर्थ भक्त मंडळे आहेत. समर्थांच्या दासबोधाची पारायणे ठिकठिकाणी चालतात आणि विशेष आनंदाची गोष्ट अशी की, ही पारायणे केवळ शाब्दिक पठणापुरती मर्यादित नाहीत, तर समर्थांच्या विचारांचा वेध घेण्याचा प्रयत्न या पारायणांतून अनेक ठिकाणी केला जातो. दासबोधाचे पद्धतशीर शिक्षण देणारी शिबिरे भरविली जातात, इतकेच नव्हे तर पत्ररूपाने दासबोध शिकविणे आणि त्याचा अभ्यासक्रम निश्चित करून अगदी रूढ शिक्षणपद्धतीनुसार त्याच्या स्पर्धा-परीक्षा घेणे हेही चालू असते. अनेक शाळांमधून मनाचे श्लोक म्हणण्याच्या स्पर्धाही चालतात. दासबोधावर आधारित निबंध लेखन स्पर्धा चालतात. तात्पर्य, इतर संतांपेक्षा समर्थांच्या वाङ् मयाचा अभ्यास वेगळ्या भूमिकेतून केला जातो असे सहजपणे आपल्या निदर्शनास येते.

महाराष्ट्रातील सर्वच संतांच्या वाङ् मयाचा अभ्यास, त्याचे मनन, चिंतन करणारे लोक सुदैवाने अजूनही ठिकठिकाणी आहेत. त्यांची वैचारिक देवघेवही चालते.  त्या त्या संतावरील पुस्तकेही प्रकाशित होत असतात. हे सगळे सर्वसामान्य जनांना पूर्णपणे माहीत नसले तरी हा सर्व प्रपंच मराठी माणसांनी अभिमान बाळगावा इतक्या व्यवस्थित रीतीने चालू आहे. त्यामागे काही आखीव भूमिका आहे असे नाही. परंपरा हाच त्याचा नियम. रामदासस्वामींच्या पादुका परिभ्रमणार्थ प्रतिवर्षी निघतात. गावोगावी त्यांचे मुक्काम होतात. सज्जनगडावर जसा दैनिक कार्यक्रम असतो तसाच कार्यक्रम तिथे योजिला जातो. लोकजागृती करण्याचे काम एवढा प्रदीर्घ काळ ही रामदासी मंडळी करीत असल्याचे पाहून समर्थांच्या आत्म्याला परम संतोष झाल्याशिवाय राहाणार नाही, असे ठामपणे वाटते.

समर्थांनी महाराष्ट्राच्या कल्याणाची तळमळ आयुष्यभर बाळगली. समर्थांचा सगळा जीवनक्रम पाहिला तर ते जणूकाय या महाराष्ट्र राज्याच्या संस्थापनेत आणि उत्थानाच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलण्यासाठीच जन्माला आले होते, असे वाटते.

‘ आपणासी जे जे ठावे, ते ते दुसऱ्यासी सांगावे । शहाणे करून सोडावे । सकळ जन । । ’

ही तळमळ त्यांना तीव्र स्वरूपात जाणवत होती. असे थोर महापुरुष ज्या वेळी काळाच्या पडद्याआड जातात त्या वेळी तो अभेद्य पडदासुद्धा त्यांच्या मनातील ही तीव्र तळमळ अडवू शकत नाही. त्या काळाच्या पडद्याआडून ही तळमळ महाराष्ट्राच्या पिढ्यानपिढ्यांना  ‘शहाणे करून सोडावे’ या वचनाप्रमाणे शहाणे होण्याची प्रेरणा देईल. देव म्हणजे आपली कामावरची निष्ठा, चांगल्या रीतीने केलेले काम हीच देवाची उपासना, असा व्यवहारात अत्त्युपयोगी सन्मार्ग दाखविणारा उपदेश यत्न तो देव जाणावा या शब्दांत देणाऱ्या या थोर संताचे वेगळेपण म्हणूनच पुनःपुन्हा विशेषत्वाने जाणवत राहते.

(क्रमश:)

  – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर ( आनंदाचा कंद , देवाचिये द्वारी : भाग ४ मधून )