पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी
माणकोजी शिंद्यांची मुलगी आणि मल्हारराव होळकर ह्यांची लाडकी सून एवढीच अहिल्याबाईंची ओळख नाही. धर्मासाठी जे जे करता येईल, प्रजेच्या कल्याणासाठी जे जे करता येईल ते सारे अहिल्याबाईंनी मनापासून केले. संपूर्ण भारतात असे एक तीर्थक्षेत्र नाही जिथे अहिल्याबाईंनी काही ना काही तरी लोककल्याणार्थ योगदान दिलेले नाही! मग तो नदीतटीचा घाट असो वा एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार! कुठे नित्यपूजेची वहिवाट, कुठे अन्नछत्र, तर कुठे पाणपोई. अनेक धर्मशाळा, बागा, रस्ते अशा विविध तऱ्हेच्या सोयींसाठी अहिल्याबाई सतत ‘देत्या’ राहिल्या. सर्वच्या सर्व म्हणजे बारा ज्योतिर्लिंगे, अयोध्येपासून द्वारकेपर्यंतच्या सप्तपुऱ्या आणि चारोधाम अशा सर्वच ठिकाणी अहिल्याबाईंनी जे लक्ष घालून काम करवून घेतले आहे त्याला फक्त आणि फक्त ‘धर्माचे काम’ म्हणूनच गौरविले जाऊ शकते. कामही असे भक्कम की, काळाच्या खुणा कुठेही उमटू न देता आजही कायम टिकून आहे. अशा अहिल्याबाईंना ‘पुण्यश्लोक’ ह्या यथार्थ विशेषणाने सन्मानित करावयाचे नाही तर मग दुसऱ्या कोणाला? (अहिल्याबाईंनी स्वत:साठी एक आगळा-वेगळा छंद जोपासला होता तो म्हणजे क्षिप्रा नदीच्या काठावर बसून नदीच्या पात्रामधील मासे बाहेर काढून त्यांच्या नाकांमध्ये कौतुकाने सोन्याच्या सुंकल्या घालावयाच्या आणि पुन्हा प्रेमाने त्या माशांना पात्रात बागडायला सोडावयाचे! आपले एवढे सोनेरी कोडकौतुक कोणी करीत आहे हे लक्षात आल्यावर नक्कीच इतर मासोळ्या स्वत:हूनच ‘मलासुद्धा सुंकली घाला’ म्हणून अहिल्याबाईंकडे हट्ट करीत असतील!) श्रावण कृष्ण चतुर्दशी ही ह्या कर्तुत्ववान, शूर आणि धर्मिकवृत्तीच्या अहिल्याबाईंची पुण्यतिथी!
सद्य:स्थिती :अहिल्याबाई ह्या केवळ आपल्या धनगर समाजाचे भले करीत राहिल्या नाहीत; तर त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या धर्माच्या कल्याणाचा विचार केला. त्यामुळेच आज जिथे संपूर्ण देशाने अहिल्याबाईंची पुण्यतिथी साजरी करावयास हवी, तेथे केवळ धनगर समाजच ती साजरी करतो, हे खरोखरच अतिशय दु:खकारक आहे. आपण साऱ्यांनीच कृतज्ञतापूर्वक त्यांचे स्मरण केले पाहिजे. प्रत्येक हिंदुधर्मीयांचे ते एक परमकर्तव्य आहे. ह्या कर्तव्य भावनेने जातीपातीच्या सीमारेषा ओलांडून जेव्हा सर्व देश अहिल्याबाईंची पुण्यतिथी स्वत:हून एकत्रितपणे साजरी करू लागेल, ती हिंदू धर्मासाठी एक फार मोठी अभिमानाची गोष्ट ठरेल! आजच्या पिढीला अहिल्याबाईंचे कर्तृत्व, त्यांचे पुण्यशील जीवन तितकेसे माहीत नाही. ते साऱ्यांना कळावे ह्यासाठी ह्या दिवशीचे औचित्य साधून त्यांच्यावर, त्यांच्या कार्यावर लेख लिहिले जाणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन केवळ अहिल्याबाईंची वेबसाइट (माहिती वाहिनी) काढणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाचा इतिहास छायाचित्रांसह उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यांच्यावर ठिकठिकाणी ह्यानिमित्ताने व्याख्याने आयोजित केली जाणे, त्या व्याख्यानांना श्रोता म्हणून उपस्थित राहाणे हेदेखील एक व्रतकर्मच ठरावे.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर