कडव्या वालाची युनिक भाजी
साहित्य : २ वाट्या वाल, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, 1 वाटी खवलेला नारळ, 1 मोठी वाटी तेल फोडणीसाठी, ४ लाल सुक्या मिरच्या फोडणीसाठी, मोहरी, हळद, हिंग, चवीसाठी साखर, सजावटीसाठी कोथिंबीर.
कृती : दोन वाट्या वाल मोड आणून घरातच टोपलीत ठेवावे. रोज त्यावर पाणी शिंपडून पातळ कपड्याने हे वाल झाकून ठेवावे. दोन दिवसानंतर त्या वालाची बोटाएवढी झाडे तयार होतात म्हणजे, दांडीला दोन डाळिंब्या व मध्ये लहान दोन पाने आली की भाजी करायला तयार.
प्रथम टोपलीतून वालाची लहान झाडे काढून घ्या. या झाडांचा खालचा भाग काढून वरील दांड्या घ्या. अशा प्रकारे सर्व भाजी निवडून, चिरून घ्या व कुकरमध्ये शिजवून घ्या. नंतर कढईत तेल तापत ठेवा. त्यात हळद, मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करा. वर चिरलेला कांदा घालून चांगला शिजवा. नंतर त्यावर शिजवलेली भाजी, एक वाती खवलेला नारळ, मीठ, चवीला साखर व थोडे तिखट घाला. मिश्रण ढवळून वर झाकण ठेवा. दहा मिनिटानंतर गॅस बंद करा.
आता थोडे तेल गरम करा, त्यात पाच-सहा सुक्या मिरच्या तळून घ्या. बाहेर काढा. उरलेल्या तेलाची फोडणी करून परत वरून भाजीवर घाला. तळलेल्या मिरच्या हाताने चुरून नंतर भाजीत घाला. अशी ही वालाच्या कोवळ्या झाडाची भाजी फार छान लागते. वर सजावटीला नारळ व कोथिंबीर घाला व सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अंजली कानिटकर