सर्वच समाजामध्ये ‘अन्न’ शब्द उच्चारला तर काही ठराविक पदार्थांचेच चित्र स्वभावत: तरळते. युरोपियनांसमोर ‘गव्हाचा पाव’ येईल, अरबांसमोर ‘खुबुस’ तरळेल; बंगाली, बिहारी, दक्षिणी लोकांना ‘भाताचा शीग आणि रसम’चा दरवळ आठवेल; तशी मऱ्हाटी संस्कृतीत ‘भाकर’. अन्न म्हणजे भाकर! ही भाकरी मराठी भाषेत फार खोल रुतली आहे. ‘ज्याची भाकरी त्याची चाकरी’पासून ‘भाकरीला महाग’पर्यंत. बहिणाबाईंनी तर ‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’ सांगून अर्थशास्त्रातल्या ‘देअर आर नो फ्री लंचेस’चे सुंदर दाहक रुपांतर बहाल केले.
निव्वळ महाराष्ट्रातच नव्हे, तर गुजरात, खानदेश, मध्य प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकचे वैराण जिल्हे, तसेच आंध्रचे दुष्काळी आणि गोदा-कृष्णा तिकाटण्यातले सुकांळी, या सगळ्या प्रदेशांत ज्वारीचा अंमल असे. पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या पर्जन्यछायी जिल्ह्यांमध्ये तीन समान धागे आहेत. एकच कथा असणारे तीन धनगरी देव, दुष्काळ आणि दुष्काळातही तग धरून बुडत्याला कडब्याचा आधार देणारी ज्वारी! दुष्काळात पाण्याचा ताण सोसून उभे राहणारे पीक म्हणूनच ज्वारीला हुकमी ‘खावटी’ पिकाचा लौकिक लाभला आहे. पण पाण्याच्या मुबलकतेतही या पिकाची मोहिनी राहतेच.
ज्वारीचे माहेर आफ्रिकेमधले. तिथून चार उपजातींचा जगभर प्रवास झाला. त्याच्या पोटजातीदेखील वीस-पंचवीस, पण सर्वाधिक खपाची आणि आढळाची जात ‘सोरधम’ ‘बायकलर’ – ‘दुरंगी जोंधळा’. हा आफ्रिकेमधून परागंदा होण्याचा काळ किमान २८०० ते ३००० वर्षांपूर्वीचा असणार. इजिप्तमध्ये ‘ममीं’च्या सोबतीला त्याचे अवशेष आढळले आहेत ते सुमारे इ.स.पू.२२०० वर्षांपूर्वीचे. वायव्य उत्तर भागातल्या वैदिकांना याची अगोदर जानपहचान असावी. त्यांच्या तोंडी रुळले होते ते ‘यव’(बार्ली) या नवीन धान्यवताराला त्यांनी ‘यवनाल’, ‘यावनाल’, ‘जुनूल’, ‘जोन्नालक’ अशी नावे देत आपलेसे केले असावे. ‘भेलसंहिता’ त्याला ‘यावनाल’ म्हणते, तर ‘चरकसंहिता’ ‘जुर्णाह’ म्हणून संबोधते. चरकसंहितेचा टीकाकार चक्रपाणिदत्त ‘गौड’ देशी म्हणजे बंगाली. त्याने ‘जुर्णाह’चा ‘जोनार इतिख्यात’ असा अर्थ दिला आहे. त्यामधूनच अवधी हिंदीतला ‘जुन्नी’, हिंदी ‘जनेरा’, बंगाली ‘कस जोरनार’ आणि मराठी ‘ज्वारी’ हे अवतार उपजले.
उत्तर हिंदुस्थानी रागसंगीतात आणि लोकगीतांमध्ये ज्वारीचा उल्लेख आहे. महानुभव पंथाच्या चक्रधरस्वामींना ‘जोंधळ्याचा हुरडा’ आवडत असे. ‘जोंधळा व उडदा’चे घावन त्यांचे फार आवडते. अकबरकालीन अबुल फजलने ‘खानदेशात ज्वारीची तीन पिके घेतात’ असे म्हटले आहे आणि ज्वारीचे ओले ताट इतके गोड, की ते उसासारखे खातात, असेही नोंदविले आहे.
आजही जगात ज्वारीचा बोलबाला आहे तो गुळी ज्वारीचा! म्हणजे ‘स्वीट सोरघम’. या ज्वारीच्या धाटीत उसासारखी ओतप्रोत साखर असते. अमेरिकेत या ज्वारीची काकवी भरघोस बनते आणि खपते. आफ्रिकेत ज्वारीच्या इतर पदार्थांबरोबरीने ज्वारीची बीअर खपते. भारतातही या ज्वारीचे लोण पुन्हा फोफावते आहे. पुन्हा म्हणायचे कारण १६४० ते १६७२ या वर्षांमध्ये राघुनाथ गणेश नवहस्त (म्हणजे ‘नवाथे’) याने आपल्या ‘भोजन कुतूहल’ ग्रंथामध्ये ‘यावनाल गुड’ असा उल्लेख केला आहे. आता जगभर ज्वारी होते ती या गुळाच्या आणि त्याच्या अल्कोहोलच्या लोभाने. तांदूळ, गहू, मका यांचे साम्राज्य पसरूनही ‘ज्वारी’ अद्याप तगून आहे. याची भाकरी गरिबांचे अन्न आहे. ‘पुरी सणाला आणि पोळी जावई आला’ तर होते. रोज खळगा भरते ती भाकरीच. तिला तेल लागत नाही. सुबक तवा लागत नाही. अगदी रस्त्याच्या कडेला तीन दगडांत कोंडलेल्या विस्तावावरसुद्धा ही बनते. सुगरण गृहिणीला तर थापायला ताट किंवा परातसुद्धा लागत नाही, निव्वळ हातावर गोल गोल फिरवत ती भाकरी थापते. त्याला ‘हातावरची भाकरी’ म्हणतात. या भाकरीचे निरनिराळे अवतार आहेत. पण सामान्यांच्या दृष्टीने अन्न म्हणजे भाकर – तीही ज्वारीची. त्याचीदेखील परंपरा फार जुनी आहे. महाभारतकथेचा ‘विक्रमार्जुनविजय’ नावाचा कन्नड ग्रंथावतार आहे. त्याचा काळ सुमारे इ.स.९४०चा. त्यातली महाभारताची सगळी पाने आता ‘कन्नड’ संस्कृतीत माखलेली. परिणामी, दुर्योधनाबद्दल बोलताना कर्ण कुंतीला म्हणतो, “त्याने माझ्यावर जे उपकार केले ते धुडकावून मी (त्याच्या) जोंधळ्याला बेईमान होऊ का?” असा हा ‘सर्वोपकृत जोंधळा!’
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
स्वादिष्ट एप्रिल २०१२