‘मला कंटाळा आलाय…’, हे विधान अनेक लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले आणि आपल्या आयुष्यात व्यग्र असलेल्या कितीतरी व्यक्तींच्या तोंडून सातत्याने ऐकू येते. अगदी वृद्ध किंवा निवृत्त व्यक्तींच्या तोंडीही हे वाक्य अनेकदा असते. या अस्वस्थ करणाऱ्या कंटाळ्यापासून सुरुवात झालेल्या काही व्यक्तींना औदासीन्य येते, कोणतीही गोष्ट बरोबर नाही असे वाटू लागते, आपल्या जगण्याचा उद्देश समजत नाही आणि काही वेळा तर नैराश्यसुद्धा येते.
अशा वेळी मुख्य प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे एखादा अर्थपूर्ण छंद असणे. दुर्दैवाने छंदाकडे अत्यंत उथळपणे पाहिले जाते. बऱ्याच जणांचा तर असा समज असतो, की जेव्हा एखाद्याचे आयुष्य गंभीर किंवा आपल्या आयुष्यात आपण व्यग्र असतो तेव्हा छंद जोपासण्याची आवश्यकताच नसते. खरे तर छंद हा केवळ ‘टाइमपास’ नाही, तर तो आहे सुरक्षित जीवनाची गुरुकिल्ली. आपल्याला अनेकदा असे दिसून येते की, जसजसा मुलांचा अभ्यास वाढत जातो तसे, म्हणजे ८ व्या किंवा ९ व्या इयत्तेत मुलांना छंदांपासून दूर राहण्यास आणि अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाते. इतर गोष्टींमध्ये वेळ ‘वाया न घालविण्याचा’ सल्ला दिला जातो. विद्यार्थीदशा, त्यानंतर करिअर आणि मग कौटुंबिक आयुष्यासाठी दिवसातील अधिकाधिक वेळ द्यावा लागतो. अशा वेळी बहुतेक जणांचा छंद मागे पडत जातो. एकेकाळी ज्याचे आपल्याला प्रचंड आकर्षण होते किंवा आपण त्यात निपुण होतो, मग ते संगीत, कला, हस्तकला, खेळ, बोर्ड गेम्स, विज्ञान किंवा एखाद्या विषयावरील वाचन असो; त्या सगळ्यावर पाणी सोडले जाते.
असे असले तरी काही सुदैवी व्यक्तींचे कामाच्या ठिकाणीही चांगले बस्तान बसलेले असते आणि आपला छंद जोपासायलाही त्यांना वेळ मिळतो. अशा छंद जोपासण्यामुळे दैनंदिन तणावापासून दिलासा तर मिळतो, शिवाय तो छंद जोपासणाऱ्या व्यक्तीला एका वेगळ्या जगाचे द्वार खुले होते. खरे तर छंद ही बाब गांभीर्याने घेण्याची आहे, ज्यामुळे तुम्ही भावनिक, बौद्धिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्ट्या उद्दिपीत होता. छंदामुळे तुमचा शारीरिक, मानसिक आणि आत्मिक व्यायाम होतो. तुमच्या बऱ्यावाईट काळात, तरुणपणी आणि वृद्धापकाळात छंद तुमची सोबत करत असतात.
छंदामुळे कामावर परिणाम होतो, हा समज पूर्णपणे चुकीचा असून उलट छंद जोपासून ताजेतवाने झाल्यावर काम करताना अधिक समाधान मिळते. ज्यांना आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर छंदाचे महत्त्व कळते, ते खूपच सुदैवी म्हणायला हवेत. हल्ली अनेक पालक आपल्या मुलांना शैक्षणिक वाढीशी संबंध नसलेला छंद जोपासण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे पाहायला मिळते. जेव्हा ही मुले पौगंडावस्थेत पदार्पण करतात तेव्हा हाच छंद त्यांना व्यसन लागण्यापासून किंवा अवैध मार्गांवर जाण्यापासून रोखण्यास मदत करतो. बऱ्याचदा, तिशीत किंवा चाळिशीत असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या शिक्षणाशी काहीही संबंध नसलेल्या क्षेत्रासाठी वेळ खर्च करताना दिसतात. उदा. सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्ती किंवा वकील, डॉक्टर, बँकर्स, शिक्षक हे अर्ध-वेळ शेतकरी, रेस्टॉरंट चालक, कलाकार, इतिहास अभ्यासक, श्वान प्रशिक्षक, लेखक इत्यादी पेशा स्वीकारताना दिसतात. अशा प्रकारच्या समांतर कामांमुळे या व्यक्तींना नैराश्यापासून लांब राहण्यास मदत होते.
आजच्या आपल्या अतिव्यवहारी जगात अनेक मंडळी कोणत्याही गोष्टीकडे आर्थिक लाभाच्या दृष्टीने पाहताना दिसतात. पण अशा प्रकारची दृष्टी ही अत्यंत संकुचित प्रकारची असते. उत्पन्न, बचत, गुंतवणूक, आर्थिक स्थैर्य या सगळ्या बाबी निश्चितच महत्त्वाच्या आहेत. पण तारुण्य नैराश्यात, मध्यम वय तणावात जाणार असेल आणि निवृत्त आयुष्यात आपल्या अस्तित्वाबद्दल प्रश्न पडणार असेल, तर या आर्थिक गणितांचा उपयोग तो काय? म्हणूनच छंद हे आपल्या आयुष्याला स्थैर्य प्राप्त करून देणारे मजबूत स्तंभ असतात, हे विसरून चालणार नाही.
एकीकडे जग विस्तारत आहे आणि तरीही सोशल मीडिया, नेटवर्किंग, इंटरनेट, व्हॉट्सअॅप ग्रुप्स या माध्यमातून जग जवळ येत आहे. अशा वेळी छंदांचा पुरेपूर आनंद घेता येण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. इंटरनेटवरील एक ‘पिंटरेस्ट’ जरी पाहिलेत तरी अंदाज येईल की, विविध वयोगट, खंडातील आणि लिंगांच्या व्यक्ती शेकडो वेगवेगळ्या छंदांबाबत कल्पनांची, माहितीची आणि प्रेरणांची कशी देवाणघेवाण करत असतात.
छंद जोपासण्यासाठी फार लांब जायचीही गरज नाही. आजूबाजूला होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याला मदतीसाठी साद घालत आहे. अशा कामात प्रत्येक जण आपल्या कुवती व आवडीनुसार सहभागी होऊ शकतो. टेकड्या, तलाव यांची स्वच्छता, वृक्षा-रोपण, पक्षी व कीटकांचे छायाचित्रण, पर्यावरणाचा आनंद घेण्याची आणि आदर करण्याची प्रेरणा लहान मुलांना देणे इथपासून घरगुती पातळीवर कचऱ्याचे रिसायकलिंग करण्यापर्यंत कोणताही छंद जोपासता येईल.
आपल्या मुलांमध्ये छंद जोपासावेत, यासाठी पालकांनी काही गोष्टी करायला हव्यात :
* आपल्या मुलांच्या आवडीच्या गोष्टी कोणत्या, त्याची यादी बनवा.
* मुलांच्या छंदांना वाव मिळू शकेल, अशा ज्या गोष्टी आपल्या शहरात / गावात, आजूबाजूला आहेत, त्यांची ओळख मुलांना करून द्या.
* मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू द्या. ‘हे कर, हे करू नको’ अशी जबरदस्ती तुम्ही त्यांच्यावर करू नका. मुलांना आपली आवड ओळखण्यासाठी थोडा वेळ लागेल, जो आपण त्यांना द्यायला पाहिजे.
* मुलांच्या छंदावर आपण किती पैसे आणि वेळ खर्च करतोय, याबाबत मुलांना कधीही ऐकवू नका.
* पालकांनीदेखील काही छंद जोपासायला हवेत. हे छंद जोपासताना तुम्हाला मिळणारा आनंद मुलांना पाहू द्या.
* मुलांची प्रगती होत असताना आनंद घ्या. मात्र मुलांची प्रगती हळूहळू होत असेल, तर त्यांना टाकून बोलू नका, टीका करू नका. मुलांचा त्या छंदामध्ये किती सहभाग आहे, ते पाहणे महत्त्वाचे आहे, प्रगती नव्हे!
* आपल्या मुलांनी जोपासलेल्या छंदांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करायलाच हवी, असा अट्टहास पालकांनी धरायला नको. हे सगळे निर्णय मुलांच्या हॉबी टीचर (छंदवर्ग शिक्षिका)वर सोडा.