नाशिकची प्राचीन चांभारलेणी
नाशिक शहरापासून अवघ्या आठ कि. मी. अंतरावर असलेल्या म्हसरूळ गावाजवळच्या डोंगरात चांभारलेणी कोरण्यात आली आहे. ही लेणी जैन पंथीयांची असून इसवी सन ११व्या शतकात तिचे निर्माण झाले असावे असा संशोधकांचा अंदाज आहे.
चांभारलेणी समुद्रसपाटीपासून १४० मीटर उंचीवर आहे. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट चढून गेल्यावर तेथे पोहोचता येते. लेण्यांच्या अलीकडे दगडात कोरलेली दोन टाकी आहेत. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रारंभी एक साधे उथळ कोरीवकाम असून त्यापुढे ओवरी व चार खांब असलेले एक लेणे आहे. यातील एक खांब व अर्धखांब अपूर्ण असून उरलेले खांब अष्टकोनी आहेत. समोरच पूर्णकमळ असून लेण्यात तीर्थकरांच्या मूर्ती कोरल्या आहेत. दरवाज्यावरसुद्धा द्वारपाल म्हणून अर्हत कोरलेले आहेत. डावीकडे गौतम असून त्याच्या शेजारी दोन स्त्रीमूर्ती आहेत. दरवाजाच्या वरच्या तुळईवर जिन कोरलेला असून उजवीकडे हत्तीवर बसलेला पुरुष कोरला आहे व डावीकडे अंबिका आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूस पार्श्वनाथ असून त्याच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग कोरलेला आहे. पार्श्वनाथाच्या एका बाजूला स्त्री व दुसऱ्या बाजूला पुरुष कोरलेला आहे. व्हरांड्याच्या उजव्या टोकाला अपूर्ण अशी खोली असून तिच्या दरवाजावर जिनाची मूर्ती कोरली आहे.
या लेणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेणीच्या डाव्या बाजूस शिल्पसमूह आहे. त्यात आदिनाथ, एक बसलेली पुरुष मूर्ती, त्याभोवती तीर्थकरांच्या लहान मूर्ती आहेत. या सर्व मिळून २४ मूर्तींचा समूह आहे. लेणीमध्ये तिन्ही बाजूंना दगडी बाक असून मागच्या भिंतीत मध्यभागी पार्श्वनाथ, त्यांच्या दोन्ही बाजूंना चवरीधारक इंद्र-अंबिका कोरलेले आहेत.
मूळ चांभारलेण्याच्या थोडे पुढे एक अर्धवट सोडलेले लेणे आहे. त्याच्याही पुढे आणखी एक लेणे असून त्यास ओवरी आहे. डावीकडे इंद्र व उजवीकडे अंबिका कोरले आहेत. मध्यवर्ती प्रवेशद्वार उत्तमरीत्या कोरलेले आढळून येते. दरवाज्याच्या डावीकडे नागफणा असलेली पार्श्वनाथाची मूर्ती आहे तर उजवीकडे गौतमाची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूला अनेक छोट्या मूर्ती अर्धखांबावर कोरलेल्या आहेत. डाव्या भिंतीवर दोन जिन मूर्ती असून त्या सिंहासनावर आरूढ आहेत. त्यांच्या डावीकडे अंबिका तर उजवीकडे इंद्र आहे. याशिवाय तीन पुरुष उभे असून त्यांच्या डोक्यावर छत्र आहे. मागच्या भिंतीवरही तीन उभे पुरुष कोरले असून त्यांच्या डोक्यावरही छत्र आहे. त्यामध्ये अर्धखांब असून त्यांच्या पायथ्याशी जिन मूर्ती व वरच्या बाजूला वेलीची नक्षी आहे. या तीन पुरुषांच्या दोन्ही बाजूला वाकलेल्या स्त्रीमूर्ती आहेत.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कालनिर्णय ऑगस्ट २००२