बैलपोळा – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर(धर्मबोध)

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 29, 2019 in   2019मराठी लेखणी

पोळा(बैलपोळा)


शेतीची नांगरणीची कामे करून थकलेल्या बैलांना एक दिवस आराम मिळावा, त्यांच्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून प्रांतोप्रांती वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या महिन्यात ‘पोळा’ हा सण साजरा केला जातो. ह्याला काही ठिकाणी ‘बैलपोळा’देखील म्हणतात. पोळा ह्या दिवशी बैलांना प्रेमपूर्वक तेल लावून स्नान घातले जाते. त्यांची शिंगे रंगविली जातात. त्या शिंगांना नवे लोकरीचे गोंडे, वेगवेगळ्या मण्यांच्या माळा बांधल्या जातात. त्यांच्या गळ्यात अशाच माळा घालतात. शिवाय फुलांच्या माळाही घातल्या जातात. पाठीवर नक्षीकाम केलेली नवीन झूल घातली जाते. नंतर त्यांची पूजा प्रथम मालकीण आणि मग लेकी-सुना करतात. त्यांना कुंकू गुलाल लावून अक्षता टाकून ओवाळले जाते. ह्यावेळी संपूर्ण कुटुंब, गडीमाणसे उपस्थित असतात. नंतर मालक ह्या आपल्या साथीदाराला पुरणपोळीचा घास देतो. प्रत्येक सदस्य असा गोडाचा घास देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांना सावलीत विश्रांतीसाठी बसविले जाते. बैलांचे असे भरपेट सुग्रास जेवण पूर्ण झाल्यावरच घरातील मंडळी जेवतात.

सद्य:स्थिती : ज्याच्या जिवावर आपल्याला सुखसमृद्धी लाभली त्याच्याबद्दल आपल्याला किती प्रेम वाटते, कृतज्ञता वाटते ती ह्या दिवशी शेतकरी कुटुंब ह्या सणाच्या निमित्ताने बैलांशी प्रेमाने, मानाने वागून व्यक्त करते. बैल हा शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा एक सदस्यच असतो. त्या कुटुंबासाठी उन्हातान्हात, वाऱ्यापावसात जिवाची तमा न बाळगता शेतात ऊर फुटेस्तोवर काम करीत असतो. त्याच्या ह्या सहकार्याची जाणीव शेतकऱ्यांना असते. ती ह्या सणातून व्यक्त होते. आजही हा सण तितक्याच जिव्हाळ्याने साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आपली आदर्श भारतीय परंपरा अशा कृतज्ञता-दिनातून पुन्हा एकदा जगासमोर येते. विशेष म्हणजे ज्यांचा शेतीशी पर्यायाने बैलांशी काहीही संबंध नाही अशी शहरातील मंडळीही पोळ्याच्या दिवशी आवर्जून पुरणपोळ्या करतात! बैलांच्या कष्टातून पिकलेले अन्नधान्यच आपले भरण-पोषण करते. एवढी जाण ह्या कृतीतून नक्कीच व्यक्त होते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर(धर्मबोध)