“सकाळी उठल्यावर आपण पहिले कोणते काम करत असू, तर ते म्हणजे मोबाइल हातात घेऊन मेसेजेस चेक करणे. काम करताना, जेवताना एवढेच काय, तर अगदी देवासमोर दिवा लावतानाही आपले लक्ष मोबाइलकडेच असते,” हे कबूल करताना श्रेयस (नाव बदलले आहे) पार खजील झाले होते. दर मिनिटाला तीन-चार वेळा तरी त्यांना मोबाइल मध्ये डोकावून बघण्याची सवय, खरे तर व्यसन लागले होते. हे ऐकल्यावर कुणालाही साहजिकच वाटेल की श्रेयस म्हणजे एखादा तरुण असेल. पण तसे अजिबात नाही. ते आहेत, ४८ वर्षांचे मध्यमवर्गीय गृहस्थ. कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात लहानाचे मोठे झालेल्या श्रेयस यांच्या हातात अलीकडेच स्मार्टफोन आला होता. नव्याने हातात आलेल्या या जादुई उपकरणाने त्यांचे आयुष्यच पार बदलून गेले होते.
त्यांनी अनेक सोशल साइट्सवर आपले अकाऊंट उघडले होते. सोशल मीडियावर सक्रिय असणे हे ‘आवश्यक’ आहे, अशी त्यांची समजूत झाली होती. एकीकडे प्रार्थना करतानासुद्धा फोन पाहिल्याशिवाय त्यांना राहवत नव्हते, तर दुसरीकडे काम, कुटुंब किंवा मित्र आणि इतर महत्त्वाच्या बाबतीत मात्र त्यांना कोणतीही घाई नव्हती. आपण नकळतपणे अनेकदा मोबाइल हातात घेतोय, हे त्यांच्या लक्षात आले होते. खरे तर त्यांना तसे करायचे नव्हते. पण तरी ही एक गंभीर मानसिक समस्या असून त्यावर उपचार करणे आवश्यक असल्याचे समजायला त्यांना बराच वेळ लागला. अशा प्रकारची समस्या असलेले श्रेयस हे काही एकटे नाहीत. गेल्या काही वर्षांत अशा समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली पाहायला मिळतेय. त्यात स्त्री, पुरुष किंवा वय असा कोणताही भेदभाव नाही. सतत स्मार्ट फोन, लॅपटॉप, टॅब यांत गुंतून पडायचे. इअरफोन/हेडफोन लावून मोठ्या आवाजात संगीत ऐकणे किंवा सिनेमे पाहणे हा सध्याचा जणू ‘ट्रेंड’च झाला आहे. आपल्या लक्षात येत नसले, तरी ही सवय आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
खरे तर ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे/सोयीसुविधा मनुष्याला मदत करण्यासाठी बनविण्यात आल्या आहेत, आपल्यावर वर्चस्व गाजविण्यासाठी नाही!
लोकांशी संवाद साधण्यासाठी, आपल्यापासून दूर असणाऱ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी या उपकरणांची/सुविधांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर हीच उपकरणे आपल्या मनोरंजनाचे, विरंगुळ्याचे माध्यम बनली. इंटरनेट, स्मार्टफोनमुळे तर जग अवघ्या एका क्लिकवर आणून ठेवले. वेगवेगळ्या अॅप्समुळे पाककृती, बातम्या, पुस्तके, शॉपिंग, संगीत, सिनेमा वाचण्या-पाहण्या-ऐकण्याची सोय झाली. या तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सुकर केले. पर्यायाने ही गॅजेट्स (इलेक्ट्रॉनिक उपकरणे) आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाली. या गॅजेट्सशिवाय आपले आयुष्य कसे असेल, याची कल्पनाही आज आपण करू शकत नाही. या उपकरणांचा वापर योग्य प्रकारे होतो, तोपर्यंत ही उपकरणे आपल्यासाठी निश्चितच वरदान ठरतात, पण हा वापर एका मर्यादेपुढे गेला की, हेच वरदान आपल्यासाठी शाप ठरू शकते. सुरुवातीला आपण त्यांच्यावर वर्चस्व गाजवत होतो. मात्र आज हीच उपकरणे आपल्यावर वर्चस्व गाजवताना दिसतात. इलेक्ट्रॉनिक उरकरणाच्या या बेछूट वापराचा परिणाम आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होत आहे. एवढेच नाही, तर कित्येकदा हे व्यसन जीवावरही बेतलेले पाहायला मिळते.
गॅजेट्सनी आपले जग आणि आपल्याला कसे बदलले?
अगदी हल्ली हल्लीपर्यंत मोबाइल ही केवळ एक वस्तू होती. दोन व्यक्तींना कोणत्याही वेळी परस्परांशी संवाद साधण्यासाठी या वस्तूचा उपयोग होत असे. पण आज हे मोबाइल स्मार्ट झाले आणि आपला स्मार्टनेस कमी होऊ लागला. या स्मार्टफोननी आज आपले अवघे आयुष्य व्यापून राहिले आहे. हे स्मार्टफोन आज केवळ वस्तू म्हणून राहिलेले नाहीत, तर आपले सहचर बनले आहेत. कुटुंबीय, नातलग, मित्रमैत्रिणी कुणीही आपल्यासोबत नसले तरी चालेल, फक्त एक स्मार्टफोन सोबत हवा. या फोनचा वापर अगणित प्रकारे करता येतो. संवाद साधण्यापासून माहिती गोळा करण्यापर्यंत, मनोरंजन करून घेण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हे एकच्या एक उपकरण सदैव तत्पर असते.
रेडिओ, टेलिफोन आणि टीव्ही ही मनोरंजनाची साधने सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दशके जावी लागली. तर ‘वर्ल्ड वाइड वेब’ जगभरात पसरण्यासाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी वर्षे लागली. पण स्मार्टफोनवरही सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सनी जगाचा ताबा घेण्यासाठी त्याहून कमी वर्षे लागली.
या उपकरणांचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतो?
या उपकरणांमधील बॅकलाइटला ब्ल्यू लाइट असेही म्हणतात. हा प्रकाश आपल्या शरीराच्या घड्याळात (बॉडी क्लॉक) हस्तक्षेप करतो. त्यामुळे झोपेच्या समस्या निर्माण होतात. आपल्यापैकी अनेक जण तहान-भूक आणि झोप सोडून दिवसरात्र मोबाइलमध्ये गढून गेलेले असतात. या सगळ्याचा दुष्परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर झाल्याशिवाय राहत नाही. अशा सततच्या वापरामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, स्वभावात तीव्र उतार-चढाव होतात, लवकर थकवा जाणवतो आणि उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारखे गंभीर आजार उद्भवतात.
या मोबाइलवर उपलब्ध असणाऱ्या सोशल साइट्स, संगीत, सिनेमे, माहितीचे जाल, वेगवेगळे ॲप्स यामुळे मन विचलित होत राहते. याचा परिणाम आपल्या वर्किंग मेमरी (क्रियाशील स्मरणशक्ती) वर, आकलनाच्या स्रोतांचा विचार करता आपल्या अध्ययनावर, प्रक्रिया करण्यावर आणि माहिती जतन करण्यावर होतो.
सतत फोन तपासायच्या सवयीमुळे (किंवा तपासायची इच्छा होणे) आपला संयम कमी होतो आणि आपली वृत्ती आवेगी (इम्पल्सिव्ह) बनते. विशेषतः विकसनशील मेंदूचा विचार करता कार्यक्षमतेवर परिणाम होऊन ‘एडीएचडी’ (अटेन्शन डेफिसिट हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर) सारखी लक्षणे उद्भवू शकतात. ज्यांच्यामध्ये आधीपासूनच एडीएचडीची लक्षणे असतील, तर ती अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतात.
गॅजेट्स आणि मुले
सतत गॅजेट्सच्या वापरामुळे मुलांमध्ये परस्परसंवाद कौशल्ये विकसित होण्यात अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरील हावभावांसारखी अमौखिक संवादकौशल्ये किंवा डोळ्यामधून व्यक्त होणारे भाव विकसित होण्यात आणि समजण्यात समस्या निर्माण होऊ शकते. ज्या मुलांना सोशल मिडियावर नकाराला सामोरे जावे लागते, खिल्ली उडवली जाते अशा मुलांना नैराश्य येण्याची, त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची आणि खिन्नता येण्याची शक्यता असते. या ताणामुळे भावनिक नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. इंटरनेटमुळे मुले अनुचित व्यक्तींच्या संपर्कात येऊ शकतात, तसेच त्यांना लहान वयात अश्लील आणि लैंगिक साहित्य उपलब्ध होण्याचीही शक्यता असते.
जी मुले बराच काळ हिंसक व्हिडिओ गेम खेळतात त्यांचे वर्तन, विचार आणि भावनाही हिंसक होतात, असे अभ्यासातून दिसून आले आहे. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीशी ते अधिक आक्रमकपणे वागू लागतात. इतरांमध्ये मिळून-मिसळून राहणे, इतरांविषयी सहानुभूती वाटणे या गुणांचा अभाव अशा मुलांमध्ये दिसून येतो. मोबाइल, टॅब, आयपॉड यासारख्या गॅजेट्सच्या सान्निध्यात वेळ घालविल्यामुळे ही मुले मैदानावर खेळायला जात नाहीत. याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो. ही मुले मित्रमैत्रिणी-शेजारी-भावंडे यांच्यासोबत एकत्र वेळ घालवत नाही. यामुळे मानसिक आणि भावनिक आरोग्याचा विकास विकास होत नाही. ‘शेअरिंग-केअरिंग’, नकार पचवणे, अपयश स्वीकारणे या भावना अशा मुलांमध्ये विकसित होत नाहीत. पुस्तकांऐवजी या उपकरणांसोबत वेळ घालविल्यावर त्याचा अभ्यासावर काय परिणाम होतो, हे वेगळे सांगायची गरज नाही.
उपकरणे आणि सामाजिक संबंध
माणसासाठी सामाजिक संवाद आणि परस्परसंबंध महत्त्वाचे आहेत. मोबाइल मुळे आभासी (Virtual) सामाजिक नात्यांमध्ये वाढ झाली आहे. आपली प्रोफाइल अपडेटेड ठेवण्यासाठी आणि ज्या व्यक्तीचा आपल्याशी दूरान्वयानेही संबंध नाही, अशा व्यक्तीच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी माणसे व्यायाम टाळतात, मित्रांसोबत स्नेहभोजनाचा किंवा चित्रपट-नाटक एकत्र पाहण्याचा आनंद लुटत नाहीत. त्यांचे मैदानी खेळ खेळणेही थांबले आहे. समाज माध्यमांवरील (सोशल साइट्सवरील) अपडेट्स, मेसेजेस पुन्हा पुन्हा तपासण्याच्या या वृत्तीला संशोधकांनी ‘चेकिंग हॅबिट्स’ (तपासणीची सवय) ही संज्ञा वापरली आहे.
अलीकडे झालेल्या पाहणीनुसार दिवसातून सरासरी ८० वेळा अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीकडून सोशल मीडियाशी संबंधित अॅप्लिकेशन्स उघडून पाहिली जातात. ज्या व्यक्तींना अशा प्रकारची सवय लागली आहे त्या व्यक्तीसुद्धा कबूल करतात, की त्यांना अशी ताजी माहिती जाणून घेण्याची गरज नाही किंवा तशी त्यांची इच्छाही नाही. तरीही नकळतपणे आणि जणू काही बंधनकारक असल्याप्रमाणे त्यांच्याकडून ही कृती घडते. ही एक सवयच झाली आहे. उपकरणांचे व्यसन लागण्यासाठी ‘सोशल मीडिया ऑब्सेशन’ (समाज माध्यमांबद्दल असलेले वेड) हे एक प्रमुख कारण आहे.
आपण स्मार्टफोनमध्ये गुंतून का जातो?
जी गोष्ट आपल्याला टाळायची आहे, ज्यामुळे आपल्या आजूबाजूच्यांनाही त्रास होतो, अशा एखाद्या कृतीमध्ये आपण का अडकत जातो? आपला विश्वास नसला आणि आपण स्वीकारत नसलो तरी वस्तुस्थिती अशी आहे, की ती कृती प्रत्यक्षात आपल्याला आवडत असते. नवा ईमेल, आपली प्रशंसा करणारा एखादा शेरा किंवा नवा मित्र जोडण्याची संभाव्य संधी यामुळे मेंदूमध्ये खळबळ माजत असते. या छोट्या छोट्या सुखांबरोबरच त्या व्यक्तीच्या मेंदूतील रिवॉर्ड सेंटरमधून डोपामाईन पाझरू लागते. अमली पदार्थांच्या सेवनानंतर एक प्रकारच्या सुखाचा, पूर्ततेचा आणि आत्मसन्मान वाढल्याचा जो अनुभव येतो, तोच अनुभव सोशल मीडियाला दिलेल्या भेटिनंतरही येतो. जेव्हा मेंदूला याची सवय होते, तेव्हा त्याला हा अनुभव वारंवार हवा असतो. त्यामुळे सोशल मीडियामधून अपेक्षित प्रतिसाद मिळण्याच्या अपेक्षेपायी एखाद्या व्यक्तीला सोशल मिडियावर जाण्याची इच्छा होते आणि म्हणूनच वरचेवर स्मार्टफोनचा वापर केला जातो.
हे का वाईट आहे?
- आजूबाजूच्या किंवा वास्तवातील लोकांशी संबंध दुरावतो.
-
हे धोकादायक आहे. फोनच्या वापरामुळे रस्त्यावरून चालताना, ट्रेनमधून प्रवास करताना, गाडी चालवताना अपघात होऊ शकतात.
-
हा वेळेचा अपव्यय आहे.
-
हातातील कामातून लक्ष विचलित होते.
-
व्यक्तीच्या समस्या सोडविण्याच्या क्षमतेत घट होते.
सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे, हे कसे ओळखाल?
- प्रयत्न करूनही तुम्ही सोशल मीडियावर जाणे टाळू शकत नाही.
-
लोक तुम्हाला तुमचा फोन बाजूला ठेवण्यास सांगतात.
-
फोन जवळ नसल्यास तुम्ही बेचैन आणि अस्वस्थ होता.
-
तुम्ही सतत नव्या नोटिफिकेशनच्या प्रतीक्षेत असता.
हे व्यसन सोडविण्यासाठी तुम्ही खालील प्रयत्न करू शकता
- तुमच्या गॅजेट वापराकडे लक्ष द्या. लाइक्स, नोटिफिकेशन, अपडेट्स, मेसेजेस किंवा कमेंट पाहण्यासाठी तुम्ही आतुर आहात का? तसे असेल तर प्रथम ते कबूल करा.
-
गॅजेटमुक्त दिनचर्या बनवा, काहीही झाले तरी अमुक एका वेळेपर्यंत तुम्ही आपल्या गॅजेटला हात लावणार नाही, यासाठी मनाची तयारी करा. सुरुवातीला कालावधी कमी ठेवा आणि मग तो वाढवत न्या.
-
गॅजेट वापराचे नियम बनवा. सौजन्य, विनम्रता किंवा आदर यापैकी काहीही म्हणा; पण गॅजेटपेक्षा तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना अधिक महत्त्व द्या.
-
सुट्टी असते तेव्हा आपल्या गॅजेट्सना कोपऱ्यातल्या एखाद्या खणात ठेवून द्या आणि हाडामांसाच्या व्यक्तींसोबत वेळ घालवा.
-
तुमच्या फोन वापरावर लक्ष ठेवा आणि तुमच्या प्रगतीचे मूल्यमापन करा. जर तुम्हाला प्रगती दिसून येत असेल, तर अधिक प्रगती करण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन द्या. प्रगती नसेल, तर तुमच्या कृतीआराखड्यात बदल करा.
-
गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. गॅजेट्स वापरण्याची अतिरेकी सवय म्हणजे व्यसनच आणि कोणतेही व्यसन आरोग्यासाठी चांगले नाही. परिणामकारक वर्तन तंत्र (कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल टेक्निक) वापरून या विषयातील तज्ज्ञ गॅजेट वापरण्याची तुमची तल्लफ हाताळण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात.
-
तुमच्या गॅजेटबाहेर असलेले सुंदर जग पाहण्यासाठी उपलब्ध असलेल्या इतर सर्व मदत स्रोतांचा वापर करा आणि हे “प्रत्यक्ष” जग पाहायला, अनुभवायला शिका.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. शेफाली बत्रा