रांगोळी आणि शुभचिन्हे

Published by डॉ. नयना तडवळकर on   October 24, 2019 in   2019Diwali Editionमराठी लेखणी

 

नवीन कपडे, फटाके, फराळ ही जशी दिवाळीची ओळख तशीच खास ओळख म्हणजे रांगोळी. दारापुढे रेखलेल्या सुबक आणि सुरेख रांगोळीशिवाय दिवाळीचा सण पूर्ण होऊच शकत नाही. दिवाळीच्या दिवसांत दारापुढे रांगोळी रेखाटताना स्त्रिया रांगोळीमध्ये अनेक शुभचिन्हे हमखास चितारत असल्या, तरी या चिन्हांबाबत आपल्याला फारशी माहिती नसते.अशाच काही शुभचिन्हांविषयी आपण जाणून घेणार आहोत :

स्वस्तिक : हा शब्द ‘सु’ (शुभ) आणि ‘असति’ (अस्तित्वात असणे) या दोन शब्दांच्या संधीतून तयार झाला आहे. हे दोन शब्द एकत्र येतात, तेव्हा चांगल्या गोष्टींचे अस्तित्व असू दे, असा त्याचा अर्थ असतो. स्वस्तिकाच्या आकारात एक संरक्षक शक्ती असते. प्राचीन काळी किल्ले तयार करण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जात असे. मोहेंजोदडोच्या मुद्र्रेवरही हत्ती स्वस्तिक चिन्हाला नमन करताना आढळून येतो असे म्हणतात. देवांना स्वस्तिक हे आसन म्हणून इतके प्रिय असते, की स्वस्तिक काढल्याबरोबर तिथे कुणी ना कुणी देवता येऊन स्थानापन्न होते.

लक्ष्मीची पावले : दिवाळीत काढली जाणारी पदचिन्हे म्हणजे लक्ष्मीची पावले असतात. लक्ष्मी ही सुबत्ता, समृद्धी, आनंद यांचे प्रतीक आहे. लक्ष्मी प्रसन्न झाल्यास रंकाचा राव होऊ शकतो. दिवाळीच्या दिवसांत स्त्रिया लक्ष्मीची पावले दारासमोर काढतात. एक प्रकारे या पदचिन्हांच्या रांगोळीच्या माध्यमातून लक्ष्मीला निमंत्रित करण्यात येते आणि दारी आलेली ही लक्ष्मी

आपल्या कुटुंबीयांना संपन्नतेचे आणि आनंदाचे वरदान देईल, अशी धारणा असते. लक्ष्मीची पावले बहुधा मुख्य दारासमोर किंवा देव्हाऱ्याच्या बाजूला काढली जातात. घरातील समृद्धीचे ते प्रतीक असते.

कमळ : हे अत्यंत पवित्र फूल समजले जाते. जीवनदान, सुपीकता आणि संपत्ती हे तीन घटक कमळाशी निगडित असल्याचे मानले जाते. कमळाचे बी चिखलात रुजते आणि अंधाऱ्या पाण्यातून कमळाचे रोपटे वाढते, त्याला पाने फुटतात. मग हवेत आणि प्रकाशात ते फुलते. कमळाची वाढ ही भौतिक सुखांमधून, अनुभवांच्या पाण्यातून, साक्षात्कार होण्यापर्यंतचा आत्म्याचा प्रवास दर्शविते. त्यामुळे रांगोळीमध्ये कमळाचा वापर करणे अत्यंत लोकप्रिय आणि शुभ मानले जाते.

  पणती : दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. रांगोळीमध्ये काढण्यात येणारे पणतीचे चिन्ह /आकृती म्हणजे अज्ञानाला दूर करण्याचे प्रतीक आहे. तात्त्विकदृष्ट्या विचार करता पणतीची ज्योत ज्ञान व ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दर्शविते. या चिन्हांबरोबरच आणखी काही चिन्हे, आकृत्यांचाही वापर आपल्या रांगोळ्यांमधून केलेला पाहावयास मिळतो. अशीच एक आकृती म्हणजे गाय. वसुबारसच्या दिवशी गायींची पूजा केली जाते. गायींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ती एक कृती असते. आजपर्यंत केली, तशीच यापुढेही गायींनी सेवा करावी, अशी विनंती गायींना या निमित्ताने करण्यात येते. याच दिवशी गाय आणि वासरू यांचे चित्र असलेली किंवा गायीच्या खुरांचे ठसे किंवा गोपद्माची रांगोळी काढण्यात येते. अशी रांगोळी काढण्यामागेही कृतज्ञता व्यक्त करणे, हाच हेतू असतो.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. नयना तडवळकर