श्रावण कृष्ण नवमी : दहिकाला (दहीहंडी) :
मथुरा, वृंदावन, गोकुळात ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘दहिकाला’ साजरा करतात. विशेषतः कोकणात हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोपसवंगड्यांसह गायींना घेऊन बालकृष्ण रानावनात जात असे. त्यावेळी त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या कालविल्या जात. (त्याला ‘कला’ म्हणतात.) कृष्ण ला दही-दूध अतिप्रिय म्हणून ह्या उत्सवात एका मडक्यात दही, दूध, लोणी भरले जाते. ती हंडी पूर्वी दहा-बारा फुटांवर उंच बांधली जाई. मग गावातील लहान मुले, तरुण मंडळी एकत्र येऊन नाचत-गात ‘गोविंदा आला रे आला’ असे म्हणत अशा हंडी बांधलेल्या जागी पोहोचतात. नंतर मानवी मनोरे रचून त्यातील लहान मुलाला त्या हंडीपर्यंत पोहोचण्यास मदत करतात. तो मुलगा म्हणजे श्रीकृष्ण! तो ती दहीहंडी फोडतो. त्यावेळी त्या हंडीतील दही, दूध सर्वांच्या अंगावर सांडते. तेच प्रसाद म्हणून खाल्ले जाते. मात्र ते चाटून-पुसून खाल्ल्यानंतर हात धुतले जात नाहीत. तर कृष्णाने आणि त्याच्या सवंगड्यांनी ज्याप्रमाणे हात व धुता ते केवळ आपल्या वस्त्रांना पुसले होते, त्याची आठवण म्हणून हात आपापल्या वस्त्रांना पुसले जातात. गावातील अशा सर्व हंड्या उत्साहाने फोडल्या जातात. काही ठिकाणी ह्या गोविंदामधील गोपाळांना दह्या-दुधात कालविलेले पोहे खाऊ घातले जातात.
सद्य:स्थिती : आज ‘दहीहंडी’ ह्या उत्सवाकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदललेला दिसतो. कृष्णप्रेमाऐवजी ह्या हंड्यांना बांधलेल्या भल्या मोठ्या आकड्यांच्या रकमाच साऱ्यांना अधिक आकर्षित करताना दिसतात. ह्या हंडीत राजकारण्यांनी नको तेवढा ‘रस’ दाखविलेला दिसतो. आपले आणि आपल्या पक्षाचे नाव झळकावे, आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून लाखो रुपयांचे बक्षीस लावले जाते. जेवढे बक्षीस मोठे तेवढी हंडीची उंचीही जीवघेणी वाटावी अशी असते. दहीहंडीच्या मागच्या कृष्णप्रेमाच्या आठवणी दुय्यम ठरताना दिसतात. मुलांप्रमाणे मुलींचे गटही ह्या स्पर्धेत सहभागी होताना दिसणे ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. (गोव्यात पूर्वापार जो ‘गवळणकाला’ केला जातो, त्यामध्ये एका मुलीलाच कृष्ण बनविले जाते.) ह्या तरुणाईला अपघाताचे भय वाटत नसते. काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते. त्या भरात अपघातही होतात. उंचावरून पडल्याने कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते ह्याचे भान तितकेसे दिसत नाही. मुळात गणपतीच्या मूर्तीची उंची जशी अति फार मोठी होऊ नये म्हणून आता प्रयत्न होत आहेत, तसाच प्रयत्न दहीहंडीच्या उंचीवर अंकुश ठेवण्यासाठी व्हावयास हवा. ‘थोडक्यात गोडी’ ह्या न्यायाने दोनतीन थरांचे मनोरे होतील एवढ्या माफक उंचीवर ही हंडी बांधली जावी. तसेच त्या त्या भागातील मंडळींना ती हंडी फोडण्याचा प्रथम मान दिला जावा. म्हणजे सर्वांनाच थोडाफार आर्थिक तसेच आनंदाचा लाभ होऊ शकेल. ह्या गोपाळांचा आयुर्विमा आता उतरविण्याचा विचार केला जात आहे. असा अपघाती विमा प्रथम काढला जावा; नंतरच त्यांना पथकात घेतले जावे. सामाजिक संस्थांनीही प्रबोधनपर, मार्गदर्शनपर शिबिरे दोन महिने आधीपासूनच घेणे हिताचे ठरावे. आपण सण-उत्सव साजरे करतो ते आनंदासाठी ह्याचे भान सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे. शाळा-शाळांमधूनही अशा छोट्या-छोट्या दहीहंड्यांचे (प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळ्या) कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. नेहमीपेक्षा वेगळा अनुभव आणि बाळकृष्णाबद्दलची योग्य माहिती बालपणीच दिली जाणे योग्य ठरेल. एरव्ही दहीहंडी-कृष्णाष्टमी हा आपल्या संस्कृतीचा सुखद ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार कसा?
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)