श्रीकृष्णजयंती – ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)

Published by ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर on   August 22, 2019 in   2019Festivalsमराठी लेखणी

 

श्रीकृष्ण जयंती


श्रावण कृष्ण अष्टमी :

१. श्रीकृष्णजयंती व्रत (कृष्णजन्माष्टमी) : श्रावणाच्या कृष्णपक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना बुधवारी मध्यरात्रौ ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव-देवकीच्या पोटी जन्म झाला. त्यानिमित्ताने दरवर्षी श्रावण कृष्ण अष्टमीला सर्व वयोगटातील भक्तमंडळी एकत्र येऊन हा कृष्णजन्मोत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. ह्या निमित्ताने ‘व्रत’ म्हणूनही ह्या जन्मोत्सवाकडे बघितले जाते. व्रतकर्त्या स्त्री-पुरुषांनी अष्टमीला कृष्णजन्म होईपर्यंत उपवास करावा. आदल्या दिवशी म्हणजे सप्तमीलादेखील नेहमीपेक्षा प्रमाणात जेवावे. अष्टमीला प्रात:काळी स्नानादी नित्य कर्मांनंतर सूर्यासह सर्व दिक्पती, भूमाता, पंचमहाभूते ह्यांच्याबरोबर यम, काल, संधी, ब्रह्म आदी सर्वांना स्मरणपूर्वक नमस्कार करावा. नंतर पूर्वेला किंवा उत्तरेला मुख करून आसनस्थ व्हावे. हातामध्ये फुले, गंध, फळे, पाणी घेऊन “माझ्या सर्व पापांचे क्षालन व्हावे आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्णत्वास जाव्यात म्हणून मी हे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करीत आहे,” असा संकल्प आपल्या मातृभाषेतून अथवा संस्कृत भाषेतून करता येत असल्यास ‘ममाखिल पापप्रशमनपूर्वक सर्वाभीष्टसिद्धये श्रीकृष्णजन्माष्टमी व्रतमहं करिष्ये’ – असा संकल्प करावा. रात्रौ पुन्हा स्नान करून शुचिर्भूत व्हावे. कृष्णजन्माची यथाशक्ती सिद्धता (तयारी) करावी. ठीक बारा वाजता घरातील सर्व मंडळींनी अथवा मंदिरामध्ये सर्व भक्तमंडळींनी एकत्र येऊन कृष्णजन्म साजरा करावा. देवकी, वसुदेवासह सर्वांच्या नावांचा उच्चार करावा. देवकीमातेला आदरपूर्वक अर्घ्य द्यावे. नंतर श्रीकृष्णालादेखील फराळाचा नैवेद्य दाखवावा. दुसऱ्या दिवशी नवमीला पंचोपचारांनी त्याची उत्तरपूजा करावी. नंतर महानैवेद्य दाखवावा. देवमूर्ती जर शाडूची असेल तर तिचे विधिपूर्वक जवळच्या जलाशयात विसर्जन करावे. धातूची मूर्ती असल्यास ती पुन्हा नेहमीच्या स्थानी देव्हाऱ्यात ठेवावी. नित्यपूजेतील नसल्यास ती मूर्ती ब्राह्मणाला दानात द्यावी. ह्यावेळी काही प्रांतात विशेषतः कोकणात दहीकाला केला जातो. त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा. व्रतकर्त्याने जेवून पारणे करावे. संतती, संपत्ती, वैकुंठलोकाची प्राप्ती अशा फलाची इच्छा असणारी मंडळी हे व्रत करतात.

सद्य:स्थिती : केवळ संतती, संपत्तीसाठी नव्हे, तर सर्वांना अतिशय प्रिय असलेल्या भगवान श्रीकृष्णाबद्दलचे प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी हे व्रत केले जावे. अशीदेखील श्रीकृष्णजयंती ही ‘उत्सव’ म्हणूनच साजरी करण्याची आपली परंपरा आहे. मुळात श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोन्ही ईश्वरी अवतार म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीची अत्युच्च शिखरे आहेत. केवळ हिंदुधर्मीयांनीच नव्हे तर सर्व भारतीयांनी आदराने आणि अभिमानाने ज्यांचे नित्य स्मरण केले पाहिजे अशा ह्या दोन महान विभूती आहेत. प्रभू रामचंद्रांनी स्वत:च्या आचरणातून ‘मर्यादापुरुषोत्तम’ ही बिरुदावली सार्थ करून दाखवली; तर भगवान श्रीकृष्णांनी जीवनातील प्रत्येक संकटावर युक्तीने, बुद्धिचातुर्याने आणि प्रसंगी इतरांच्या सहकार्याने कशी मात करावी ते शिकविले. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे त्या त्या परिस्थितीनुसार कसे बघावे त्याचा आपल्या वागण्याबोलण्यातून सहजपणे जगासमोर आदर्श वस्तुपाठ घालून दिला. वर्ण, जाती, गुण-दोष, आर्थिक, सामाजिक, बौद्धिक असा कुठलाही भेदभाव भगवान श्रीकृष्णांनी कधीही केलेला दिसत नाही. द्वारकेचा राणा असूनही त्याला सुदाम्याचे पोहे खाताना अजिबात संकोच वाटला नाही. स्वत: ‘मदनाचा पुतळा’ असूनही कुब्जेच्या भावना त्याने जाणल्या, त्या भावनांचा आदर केला. पेंद्यासह साऱ्या बाळगोपाळांबरोबर तो मनसोक्त खेळला. नंद हा गोकुळाचा राजा असूनही कृष्णाने मात्र गोकुळातील एकूण एका घरात चोरी करूनच दुध-दही-लोण्यावर यथेच्छ ताव मारला. गडीमाणसे असूनही सर्व बाळगोपाळांचा मेळा घेऊन गायी चरण्याचे काम त्याने आनंदाने केले. तन-मन-धनाने ‘कमकुवत’ म्हणून हेटाळल्या गेलेल्या समाजातील सर्वांना एकत्र करून गोवर्धन पर्वत उचलून सहकार्याचे महत्त्व काही हजार वर्षांपूर्वीच जगाला पटवून दिले.

श्रीकृष्णाने आदर्श मैत्रीचा वस्तुपाठ अर्जुनाची सावली बनून त्याच्या प्रत्येक संकटात, सुख-दु:खात त्याच्याबरोबर राहून घालून दिला. भावा-बहिणीचे त्यातही मानलेल्या भावा-बहिणींचे गहिरे नाते संकटसमयी धावत जाऊन द्रौपदीला मदत करून अधिकच दृढ केले. रुक्मिणीच्या सहवासातील त्याची रसिकता, नारदमुनींबरोबर अनेक वेळा केलेला खट्याळपणा, अर्जुनाला कर्मयोगाची शिकवण देणारा त्याच्यातील विचारवंत, गौळणींबरोबरच्या स्वच्छंद रासलीला, पांडवांसाठी कौरवांशी केलेली राजशिष्टाई, विदुराच्या कण्यांचीही कदर करणारी त्याची कनवाळू वृत्ती, आपल्या मुरलीवादनाने अवघे वातावरण भारावून टाकणारा त्याच्यातील कलाकार, संतांनादेखील वेड लावणारा त्याचा लाघवी स्वभाव, धीरगंभीर वृत्तीने मृत्यूलाही सहजपणे सामोरा जाणारा देवकीचा कान्हा उभ्या भारतवर्षासाठी भगवान श्रीकृष्ण बनले तो त्यांचा सारा जीवनप्रवास ‘अखिलं मधुरम्’ आहे. रुक्मिणी-सत्यभामा ह्या दोघी धर्मपत्नी म्हणून सर्वज्ञात होत्याच. पण नरकासुराच्या बंदिवासात खितपत पडलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांचादेखील तो उद्धारकर्ता झाला. राधेला तो कधीच विसरला नाही. तुळशीच्या रूपातील वृंदाही त्याच्या ‘मर्म’बंधातील ठेवच! कौस्तुभाएवढीच तुळशीमाळाही मिरविणारा, राजमुकुटाबरोबर मोरपिसांनाही माथी स्थान देणारा, मुरलीला क्षणभरही दूर न करणारा! किती त्याची रूपे! त्याच्या गुणांचे, पराक्रमांचे पोवाडे तरी किती गायचे? महाभारताचा हा महानायक, भागवतपुराण तर कितीही वेळा पारायणे केली तरीही पुन:पुन्हा त्याच्या आठवणी जागविण्यातील आनंद घेण्याचा मोह होतो. गीतेचे तत्त्वज्ञान समजून घेता घेता उभे आयुष्य कमी पडते असा ह्याचा महिमा! अशा कृष्णाच्या जन्माचा उत्सव अखिल भारतवर्षात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. आपणही तो आपापल्या परीने करावयास हवा. आपल्या आनंदात जास्तीत जास्त मंडळींना सहभागी करून घ्यावे. मात्र हा आनंदोत्सव रात्रौ बारा वाजता साजरा केला जातो. ती वेळ इतरांच्या झोपेची असते ह्याचे भानही ठेवावे. कृष्णजन्मोत्सव हा आनंदोत्सव असला तरीही त्याला गालबोट लागेल असा अतिरेकी उत्साह, मोठ्या आवाजात गाणी लावणे, वेडेवाकडे अंगविक्षेप करीत नाचणे ह्या उत्सवात अजिबात अभिप्रेत नाही. तसे ते आपल्या कुठल्याच उत्सवात अभिप्रेत नाही. (कृष्णाचे वास्तव ज्या ज्या स्थानी होते, त्या गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी ह्या साऱ्या ठिकाणी तेथील कृष्णमंदिरात ह्या निमित्ताने दीपोत्सव होतो. देवाच्या पालख्या निघतात. भजन, कीर्तनात सारी भक्तमंडळी अगदी न्हाऊन निघतात. कृष्ण मथुरेला श्रावण कृष्ण अष्टमीला जन्मला म्हणून आपण रात्रौ बारा वाजता कृष्णजन्म साजरा करतो. ‘कृष्ण जन्मला’ हे अवघ्या गोकुळातील नंद राजाच्या प्रजेला दुसऱ्या दिवशी कळले म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी जन्मोस्तव साजरा केला. आजही गोकुळात कृष्णजन्म दुसऱ्या दिवशी साजरा होतो. त्यालाच आपण ‘गोकुळाष्टमी’ म्हणतो. ह्याच दिवशी ‘नंदोत्सव’ही साजरा होतो.)

२. जयंती व्रत :  श्रावण कृष्ण अष्टमीला रोहिणी नक्षत्र असले तर हे जयंती व्रत करतात. भगवान श्रीकृष्णांचा जन्म ह्याच अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर झाला होता, त्याचे स्मरण म्हणून हे व्रत कृष्ण भक्तमंडळी करतात. यशोदामाता आणि बाळकृष्ण ह्या व्रतदेवता असतात. चौरंगावर पाच तऱ्हेच्या पानांनी सजविलेल्या कलशाची स्थापना करावी. त्यावर ताम्हण ठेवावे. ह्या ताम्हणात कृष्णाला दूध पाजणाऱ्या यशोदामातेची मूर्ती स्थापित करावी. त्या दोघांच्या आजूबाजूला चंद्र, रोहिणी ह्यांच्या मूर्ती ठेवाव्यात, नंतर ह्या साऱ्यांची आनंदाने पूजा करावी. ह्या व्रताला एक कथादेखील आहे. ती अशी – एका गावात राहणाऱ्या एका वाण्याला काही कारणाने त्याच्या आप्तस्वकीयांनी घरातून बाहेर काढले. नाईलाजाने तो वाराणशीला आला. तेथे त्याने कमलपुष्पे विकण्याचा व्यवसाय सुरु केला. एके दिवशी खूप वाट पाहूनही त्याचे एकही कमळ विकले गेले नाही. त्यामुळे गिऱ्हाईक शोधत शोधत तो एका वाड्याजवळ येऊन पोहोचला. त्या ठिकाणी राजा इंद्रद्युम्न हा जयंती व्रताची पूजा करीत होता. त्यावेळी त्याने न मागता वाण्याने आपल्या जवळची सर्व कमळे पूजेसाठी त्याला दिली. मात्र त्याचे पैसे घेतले नाहीत. ह्या पुण्याकृत्यामुळे तो वाणी पुढील जन्मी राजा हरिश्चंद्र म्हणून विख्यात झाला. (पौष शुक्ल अष्टमी ही तिथी बुधवारी आल्यास तिला ‘जयंती अष्टमी’ म्हटले जाते. ह्या योगावर हे ‘जयंती व्रत’ केले तरीही चालते. ह्या निमित्ताने जप, होम, दान, ब्राह्मणांना भोजन आणि पितरांसाठी तर्पण केले जाते.)

सद्य:स्थिती : विशेष गोष्ट म्हणजे ह्या जयंती व्रतानंतर तिसऱ्या दिवशी येणाऱ्या अजा एकादशीलाही राजा हरिश्चंद्राचीच कथा जोडलेली आहे. भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अशा प्रत्येक गोष्टीचे आपल्याला कौतुक वाटते, आत्मीयता वाटते. म्हणूनच ते ज्या नक्षत्रावर जन्मले त्या रोहिणी नक्षत्राच्या निमित्ताने आपण हे ‘जयंती व्रत’ देखील तितक्याच आनंदाने करतो. संस्कृतीच्या ह्या अनमोल ठेव्याचे जतन आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने अशी व्रत-वैकल्ये आणि सण, उत्सव साजरे करणे हे आपले कर्तव्यच आहे, ह्याबद्दल वाद असू शकत नाही.

 

३. दशफल व्रत : ह्या व्रतात श्रावण वद्य अष्टमीपासून पुढचे नऊ दिवस मिळून एकूण दहा दिवस रोज तुळशीच्या दहा पानांनी गोपाळकृष्णाची पूजा करावी. दहा सुतांचा दोरा व्रतकर्त्याने आपल्या हातात बांधावा. दहा ब्राह्मणांना दहा-दहा पुऱ्यांचे  वायन द्यावे. संतती आणि ऐश्वर्य ह्यांची प्राप्ती हे ह्या व्रताचे फल सांगितलेले आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे, असेही सांगितले आहे.

सद्य:स्थिती : स्त्री-पुरुष समानतेचे युग असल्यामुळे स्त्रियांप्रमाणे पुरुष वर्गानेही हे व्रत करण्यास काहीच हरकत नाही. ब्राह्मणांऐवजी भुकेलेल्या कोणालाही पुऱ्या-भाजी-खीर असे वायन दिल्यास ते अधिक योग्य ठरेल. चार-पाच समविचारी मंडळींनी एकत्र येऊन आपल्या कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांनाच खीर-पुरीसारखे सात्त्विक पदार्थ खाऊ घातले तर सहकारातील गोडवा नक्की वाढेल. ते शक्य नसल्यास राहत्या इमारतीमधील लहान मुलांना, स्त्रियांना, शेजाऱ्यांना आवर्जून निमंत्रण देऊन त्यांना प्रसाद म्हणून खीर-पुऱ्या द्यावेत किंवा मुलांच्या मित्र-मैत्रिणींना बोलावून त्यांना खाऊ देऊन हे व्रत पूर्ण करावे.

 

४. नंदोत्सव : हा उत्सव उत्तर प्रदेशात विशेषकरून गोकुळात आणि मथुरेत साजरा केला जातो. ह्या दिवशी हळद घातलेले दही एकमेकांच्या अंगावर उडविले जाते. म्हणून ह्याला ‘दधिकांदौ’ असे दुसरे नावही आहे. आपल्याकडील दहीकाल्याचाच हा उत्तर प्रदेशीय प्रकार आहे. हळद आणि कुंकू घालून रंगीत केलेले पाणी पिचकारीने एकमेकांवर उडविले जाते. तो उत्सव आपल्या धुळवडीसारखा, होळीसारखा साजरा केला जातो. ह्या दिवशी नाचगाण्याचे कार्यक्रमही होतात.

सद्य:स्थिती : काही उत्सवात बदल केले जात नाहीत. त्यापैकी हा एक उत्सव आहे. लोकांच्या भावना तीव्र असतात. शिवाय भगवान श्रीकृष्ण ह्यांचा जन्मसोहळ्यातील हा एक भाग आहे. तरीही त्याला हिडीस रूप येऊ नये, लोकांचा तोल जाऊ नये म्हणून जाणत्यांनी ह्याप्रसंगी अत्यंत जागरूक राहून वेळोवेळी हळूहळू पण निश्चित अशा काही सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यावेळी बऱ्याच प्रमाणात दही एकमेकांवर फेकले जाते. तो अपव्यय टाळण्यासाठी समाजप्रबोधन करीत राहावे. ‘बादलीभर पाण्यात शास्त्रापुरते एक पळी दही घातले तरीही पुरे’ – हे समाजमनावर बिंबविण्याचा प्रयत्न करावा. वाटल्यास दही-साखर, ताक, लस्सी असे पेयपदार्थ एकमेकांना प्रेमाने द्यावेत. म्हणजे ते दही-दुभते सार्थकी लागेल हा विचार सातत्याने समजावून द्यावा.

 

५. रोहिणी अष्टमी : श्रावण कृष्ण अष्टमीला रोहिणी नक्षत्र असल्यास ह्या अष्टमीला ‘जयंती’ असे नाव आहे. कारण भगवान श्रीकृष्ण ह्यांचा जन्म रोहिणीयुक्त अष्टमीला झाला होता. म्हणून ह्या तिथीचा गौरव करण्यासाठी हे व्रत योजिले गेले. ह्या दिवशी उपवास करावा. भगवान श्रीकृष्ण ची पूजा करावी. एवढे दोनच व्रतनियम आहेत. पापनाशार्थ आणि मरणोत्तर विष्णुलोकाच्या प्राप्तीसाठी हे व्रत करण्याची वैष्णवांमध्ये प्रथा आहे.

सद्य:स्थिती : कुठल्याही फलाची आशा धरून नव्हे तर भगवान श्रीकृष्णांवरील प्रेमापोटी ही अष्टमी अशीही जन्मोत्सव म्हणून भारतभर सर्वत्र सारख्याच उत्साहाने साजरी होते. ‘अधिकस्य अधिकं फलम्’ ह्या न्यायाने ह्या रोहिणी नक्षत्रयुक्त अष्टमीलाही हे ‘रोहिणी अष्टमी’चे व्रत करावयास कोणीही आनंदाने तयार होईल ह्यात शंका नाही. आपण भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक कृतीचे स्मरण एकेका दिवसाच्या सोहळ्यानेच करतो. मग ती गोपाष्टमी असो, गोपाळकाला असो की, गोवर्धन पूजा असो. विशेष म्हणजे आठवणींनी भारलेल्या ह्या सगळ्या व्रतांचा सण किंवा उत्सव बनून ते सामुदायिक रीतीनेच साजरे केले जातात हे विशेष! भगवान श्रीकृष्ण लहानपणी गोकुळात सगळ्या गोप-गोपिकांमध्ये रमले, बागडले, वाढले. पुढेही पांडवांबरोबर सातत्याने सावलीसारखे राहिले. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित सारी व्रते आपण एकेकट्यांनी साजरी करीत नाही. संपूर्ण समाजाला कुठलाही भेदभाव न करता आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याने आनंद वाढतो हा संदेश भगवंतांनी आपल्या ह्या कृतीतून घरोघरी निरंतर दिला. सुदामा, पेंद्या, कुब्जादेखील त्यांना तितकीच महत्त्वाची आणि प्रिय वाटत होती – हे त्यांच्या जीवनचरित्रावरून आपल्याला माहीत आहेच. आपणही समाजातील उपेक्षित, वंचित, दीनदुबळ्यांना मानाने, प्रेमाने वागविण्याचा वसा ह्या रोहिणी अष्टमीला का घेऊ नये?

 

६. श्रीज्ञानेश्वर महाराज जयंती : श्रीमदभगवद्गीतेमधून जगाला मोक्षाचा मार्ग दाखविणाऱ्या भगवान श्रीकृष्ण चा जन्म ज्या तिथीला ज्यावेळी झाला तोच योग साधून त्याच गीतेचे तत्वज्ञान मराठीमधून सर्वांसाठी उपलब्ध करून देणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला हा केवढा मोठा योगायोग! आपण साऱ्या मराठी मंडळींनी ही तिथी ह्या दोघांच्या जन्मोत्सवासाठी खास राखून ठेवली आहे. हा योग साधून गावोगावी, देवळा-देवळांमधून श्रीकृष्ण-जन्मोत्सवाबरोबरच ज्ञानदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त हरिपाठ, कीर्तन, भजन, प्रवचने आयोजिली जातात. माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तभाविकांची एकच गर्दी उसळते. ज्ञानेश्वरी पारायणाचे कार्यक्रम केले जातात.

सद्य:स्थिती : केवळ ज्ञानेश्वरीची एखादी प्रत आपल्या घरात असून उपयोगाचे नाही. ‘एक तरी ओवी अनुभवावी।’ ह्या उक्तीनुसार ती नित्य पठणात असणे आवश्यक आहे. समविचारी मंडळींनी हा माऊलीच्या जयंतीचा मुहूर्त साधून एकत्रितपणे रोज अथवा आठवड्यातील निदान एक दिवस एक तास एका निश्चित ठिकाणी जमून ज्ञानेश्वरीच्या पाच पाच ओव्या म्हणून मग त्याचा अर्थ मोठ्याने वाचावा. एखाद्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकाला त्यातील मर्म समजावून सांगण्यासाठी येण्याची विनंती करावी. कोणताही ज्ञानेश्वरीचा अभ्यासक ह्या विनंतीला ‘नाही’ म्हणणार नाही. एखाद्या वृद्धाश्रमाला ज्ञानेश्वरीची प्रत भेट म्हणून द्यावी.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)