पंचरत्न थालीपीठ
थालीपिठामध्ये प्रथिने आणि सूक्ष्म पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच या पदार्थाला पूर्णान्न म्हणतात. थालीपीठ हा अत्यंत लोकप्रिय असा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ आहे. रोजच्या आहारात तसेच उपवासाच्या पदार्थांमध्ये त्याला स्थान प्राप्त झाले आहे. उपवासाच्या थालीपिठाच्या पिठामधील जिन्नस थोडे वेगळे असतात. थालीपीठ हे मुख्य जेवण म्हणूनही चालते आणि अल्पोपहारासाठीही.
साहित्य :
१ कप ज्वारीचे पीठ, १ कप गव्हाचे पीठ, १ कप नाचणीचे पीठ, १ कप बेसन, १ मोठे चमचे तांदळाचे पीठ, १ मोठा मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धा कप दाण्याचे कूट, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, अर्धा कप कांद्याची पात बारीक चिरलेली, अर्धा कप बारीक चिरलेले गाजर, भोपळी मिरची आणि फरसबी, २-४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची बारीक चिरलेली पाने, चिरलेली कोथिंबीर, कोथिंबिरीच्या काही काड्या, २ छोटे चमचे तीळ, १-२ मोठे चमचे धणे पावडर, १ मोठा चमचा जिरे पावडर, १ मोठा चमचा लाल तिखट, अर्धा मोठा चमचा हळद, मीठ चवीनुसार, तेल.
कृती :
कांदा, कांद्याची पात, चिरलेल्या भाज्या, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मीठ एका रुंद मिक्सिंग बाऊलमध्ये एकत्र करून घ्या. या मिक्सिंग बाऊलमध्ये सगळी पिठे, दाण्याचे कूट, तीळ, धणे पावडर, जिरे पावडर, मिरची पावडर आणि हळद घाला. या मिश्रणात आता थोडे थोडे कोमट पाणी घालून पीठ मळून त्याचा गोळा तयार करा. हा गोळा सहज पसरेल इतकाच घट्ट असावा. तो खूप घट्ट करू नये (पोळीसाठी जी कणीक मळतो त्यापेक्षा हा गोळा सैल असावा.). या टप्प्यावर साधारण अर्धा छोटा चमचा तेल घालावे, जेणेकरून मळलेल्या पिठाला भेगा पडणार नाहीत. अॅल्युमिनिअम फॉइल / पार्चमेंट पेपर / केळीचे पान घेऊन त्याला तेल लावा. संत्र्याच्या आकाराचा पिठाचा गोळा घ्या आणि तो हलक्या हाताने त्यावर पसरवा. या थालीपिठाची जाडी पॅनकेकसारखी असावी. थालीपीठ थापताना मधून मधून हात पाण्याने ओले करा जेणेकरून थापण्याची प्रक्रिया सहज होईल. पंचरत्न थालीपिठामध्ये १-३ भोके पाडा, जेणेकरून थालीपीठ सगळीकडून व्यवस्थित शिजेल. तवा तापत ठेवा. जेव्हा तो तापेल तेव्हा थालीपीठ काळजीपूर्वक तव्यावर उतरवा. थालीपिठावरील भोकांमध्ये थोडे थोडे तेल सोडावे. तव्यावर झाकण ठेवा आणि थालीपीठ करड्या रंगाचे होईपर्यंत शिजू द्यावे. त्यानंतर पंचरत्न थालीपीठ उलटावे आणि मिनिटभर शिजू द्यावे किंवा ते कुरकुरीत होईपर्यंत तव्यावर ठेवावे. मध्यम आचेवर शिजवावे. तयार थालीपीठ लोणचे, मसाला दही किंवा लोण्यासोबत खाण्यास द्यावे.
टीप :
१. मळलेल्या कणकेमध्ये अनेक प्रकारची पिठे असल्यामुळे ते चिकट असेल. त्यामुळे थालीपीठ थापताना हाताला पाणी लावावे आणि तेल लावावे जेणेकरून थालीपीठ सहजतेने थापता येईल.
२. कणकेमध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोबी, मेथी, कांद्याची पात, पालक, किसलेले बीट, दुधी भोपळा किंवा काकडीसुद्धा घालू शकता.
३. ज्वारीच्या पिठाऐवजी बाजरीचे पीठ अथवा रवा घालावा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
ज्योती व्होरा