नवाबी मसाला चाय
चहा, चाय, टी अशा अनेक नावांनी संबोधले जाणारे हे पेय जगात सर्वाधिक प्रमाणात प्यायले जाते. हा चहा केवळ जिभेलाच नव्हे, तर आरोग्यालाही हितकारक असेल या दृष्टिकोनातून त्याचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी चहामध्ये अनेक प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आणि बायोअॅक्टिव्ह्ज योग्य प्रमाणात वापरण्यात आले असून गोड चवीसाठी गूळ घातला आहे.
साहित्य :
२ छोटे चमचे चहा पावडर, २ वेलची, काळीमिरीचे ४ दाणे, २ लवंगा, पाव इंच दालचिनी,
१ इंच आले, पाऊण कप दूध, १ कप पाणी, २ मोठे चमचे बारीक किसलेला गूळ,
जरासे केसर.
कृती :
सर्वप्रथम एका छोट्या पातेल्यात अर्धा कप पाणी उकळत ठेवा. त्यात वेलची, लवंग, आले, काळीमिरी आणि दालचिनी घालून २-३ मिनिटे उकळा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मंद करा. १-२ मिनिटे उकळल्यावर चहाचा छान सुगंध येईल. आता उरलेले पाणी आणि चहाची पावडर घाला आणि ३-४ मिनिटे उकळवा. आता त्यात गूळ घालून विरघळेपर्यंत उकळवा. दुसऱ्या पातेल्यात दूध केसराच्या काड्या घालून उकळवा, सतत ढवळत राहा जेणेकरून दूध घट्ट होणार नाही. त्यानंतर चहा आणि दूध एकत्र करा. त्याला उकळी आणा. त्यानंतर गॅस बंद करा आणि चहा गाळून घ्या. नवाबी मसाला चाय बिस्किटे किंवा कोणत्याही नाश्त्यासोबत सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
ज्योती व्होरा