नाचणी बन
साहित्य : १ वाटी नाचणी पीठ, १ वाटी तांदूळ पीठ, चवीनुसार मीठ, ४ उकडून किसलेले बटाटे, प्रत्येकी ३ चमचे गाजर, कोबी, कांदा, सिमला मिरची, पालक चिरलेला, थोडीशी कोथिंबीर, १ छोटा चमचा काश्मिरी लाल तिखट, १/२ चमचा आमचूर पावडर, १ चमचा किसलेले आले, साजूक तूप, १ छोटी वाटी पनीर, १/२ छोटी वाटी चीज (सजावटीकरिता), २ चमचे तेल, २ चमचे लोणी, २ वाट्या पाणी.
कृती : नाचणीचे व तांदळाचे पीठ एकत्र करून घ्या. पाणी उकळण्यास ठेवा. साधारण उकळी यायच्या वेळेस दोन्ही पिठे त्यात घालून ढवळा. पीठ एकत्र घोटले गेले की गॅस बंद करून झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ येऊ द्या. परातीत हे पीठ घेऊन मळून घ्या. बन्स बनविण्याकरिता छोटे छोटे गोळे करून ठेवा व ते नाचणीच्या पिठावर लाटून तव्यावर भाजून घ्या. असे बन्स मस्त छान फुगतात. थोडे कडक होतील असेच चांगले भाजा.
स्टफिंगकरिता गॅसवर कढई ठेवून तेल व लोणी टाकून त्यात किसलेले आले व कांदा परतून घ्या. गाजर, कोबी, पालक, कोथिंबीर, सिमला मिरची घालून हे सर्व किंचित परतून घ्या. त्यात उकडून किसलेला बटाटा घाला, चाट मसाला, आमचूर पावडर व काश्मिरी लाल तिखट घाला आणि गॅस बंद करा. त्यात किसलेले पनीर आणि चीज घाला. सर्व साहित्य एकत्र करून स्टफिंग तयार करा. एक नाचणी बन घेऊन त्यावर साजूक तूप लावून कणकेची पेस्ट करून बनच्या कडेला लावा. मधोमध स्टफिंग भरा. त्यावर दुसरा बन ठेवा व तव्यावर बटर घालून दोन्ही बाजूने खुसखुशीत भाजून घ्या. खाली उतरल्यावर त्यावर चीज किसून घाला व मधोमध कापा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
स्नेहल कुलकर्णी, बदलापूर