थाई नूडल्स सलाड
साहित्य:
३ ते ४ हिरवे पातीचे कांदे, १ मोठी काकडी, १ मोठी सिमला मिरची, १ मोठे गाजर, ३ ते ४ लाल ओल्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, १ काडी गवती चहा, १ मोठा चमचा पुदिन्याची पाने, १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर, २ मोठे चमचे मध, थोड्या बारीक राईस नूडल्स, १ मोठा चमचा लिंबाचा रस.
कृतीः
सर्व भाज्या धुवून घ्या. पातीचा कांदा तिरपा लांब कापून घ्या. काकडी सोलून त्याचे उभे लांब काप करून घ्या. गॅसवर पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवा. गरम झाले की त्यात राईस नूडल्स घाला व गॅस बंद करा. थोड्या वेळाने नूडल्स काढून थंड पाण्यात घाला व बाजूला ठेवा. सिमला मिरचीचे लांब पातळ काप करून घ्या. गाजर लांब किसून घ्या. वरील सर्व भाज्या एका बाउलमध्ये एकत्र करा. एका वाटीत लाल मिरच्या बारीक चिरून घ्या. नंतर त्यात गवती चहाचे बारीक पातळ तुकडे घाला. त्यात आले किसून घाला. आता त्यात चवीनुसार मीठ, लिंबाचा रस व मध घाला. आता हे मिश्रण नीट ढवळून घ्या आणि वरील भाज्यांच्या मिश्रणात ओता व नीट एकत्र करून घ्या. पाच मिनिटे बाजूला ठेवा. आता नूडल्समधील पाणी पिळून नूडल्स या मिश्रणांत घाला. वरून पुदिन्याची पाने व कोथिंबीर चिरून घाला. मिश्रण नीट हलवा व सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्रीती कारगांवकर