चांदोबा, चंपक ते श्यामची आई
लाॅकडाऊनमुळे परीक्षा रद्द होऊन बरीच मोठी सुट्टी बच्चे कंपनीला मिळाली आहे. या सुट्टीत बहुतांश मुलांची पसंती मिळते ती टीव्ही आणि मोबाइललाच. इलेक्ट्राॅनिक गॅजेट्सच्या आहारी गेलेल्या या मुलांचं बालपण पाहिल्यावर मला आठवलं, ते माझं बालपण. टीव्हीसुद्धा क्वचित पाहायला मिळणाऱ्या ८०-९०च्या दशकातील आमच्या पिढीसाठी हक्काचा पर्याय असायचा तो पुस्तक वाचनाचा. अक्षरांची ओळख झाली आणि वेगवेगळी पुस्तकं हातात रुळू लागली. चित्रांच्या पुस्तकांची जागा हळूहळू चित्रगोष्टींनी घ्यायला सुरुवात झाली. पहिली-दुसरीत असताना हातात आली, ती आयुष्याला दिशा देणाऱ्या ‘माॅरल स्टोरीज’ची पुस्तकं. ‘इसापनिती’, ‘पंचतंत्र’ यासारख्या गोष्टींनी खोटे बोलायचे नाही, नेहमी खरे वागावे, दुसऱ्यांना मदत करावी यांसारख्या संस्कारांचे बीज मनात पेरले. यानंतर ओळख झालेल्या ‘चंपक’, ‘चांदोबा’ यांसारख्या पुस्तकांमुळे नवीन जगाची सफर सुरू झाली. मग ‘ठकठक’, ‘किशोर’, ‘कुमार’ ही मासिकं/पुस्तकं आईबाबा आणून द्यायला लागले. सामान्य ज्ञानात भर पाडण्याबरोबरच अनेक छोट्यामोठ्या गोष्टींतून भावभावनांचं जग फुलायला लागलं. वाढदिवसाला भेट म्हणून मिळालेल्या सानेगुरुजींच्या ‘श्यामच्या आई’ने डोळ्यांतून घळाघळा पाणी आलं खरं पण संस्कारांच्या रुपातील मौल्यवान भेट आयुष्यभरासाठी दिली. परिस्थिती समजून घ्यायला, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करायचा धडा या पुस्तकाने मनावर कायमचा गिरवला. संस्कारक्षम वयाबरोबरच महाभारत, रामायण यासारख्या पुस्तकांतून धार्मिक, पौराणिक जगताची सफर घडू लागली. मग वाढत्या वयात मन रमायला लागले ते शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज, पेशवे, झाशीची राणी आणि अनेक ऐतिहासिक मर्दमराठ्यांच्या पराक्रमात. हळूहळू हेरकथा, रहस्यकथा, भयकथा, पोलिसीकथा यांची ओढ वाटू लागली आणि नंतर अर्थातच प्रेमकथाही.
या पुस्तकांनी केवळ तात्पुरते मनोरंजन केले नाही, तर आयुष्य घडवलं. संस्कारांचं बीज पेरतानाच व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडले. माधुरी पुरंदरे, गिरीजा कीर, सई परांजपे यांसारख्या बालसाहित्यिकांनी जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित केला. वयाबरोबर येणाऱ्या प्रगल्भतेबरोबर मग वेगवेगळ्या साहित्यिकांच्या कथा-कादंबऱ्या-कविता वाचणं सुरू झालं आणि स्वतंत्र विचार करण्याच्या वृत्तीला दिशा मिळाली. आजही मोकळा वेळ मिळतो, प्रवासात, सुट्टीच्या दिवशी मिळेल तसं वाचन सुरू असतं. वाचनाची आपली आवड मुलामध्येही यावी म्हणून नित्यनवे प्रयोग सुरू असतात. त्याच्यासाठी गोष्टींची इंग्रजी-मराठी पुस्तके घेताना आधी आपणच वाचून काढली जातात. पण आजच्या मोबाइलवेड्या मुलांना मुळातच पुस्तकांची फारशी आवड दिसत नाही. अशा वेळी यू ट्यूबवरून गोष्टी पाहण्याचा आणि वाचण्याचा, तसेच आॅडियो बुक्सचा पर्याय स्वीकारला जातो. पण पुस्तक हातात घेऊन ते वाचण्याचा आनंद यातून मिळत नाही. असो, आज असणाऱ्या बालपुस्तक दिनाच्या निमित्ताने आठवणींना हा उजाळा आणि सर्वांना खूप शुभेच्छा!
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मिताली तवसळकर