पौष्टिक साटोरी
पारीसाठी साहित्य :
१ कप कणीक, १/४ कप ओट्स पावडर, १/४ कप मिश्र डाळींचे पीठ (मूगडाळ, उडीद डाळ, चणाडाळ, मसूर डाळ ह्या सर्व डाळी समप्रमाणात घेऊन किंचित भाजून बारीक पीठ दळावे), १/४ कप नाचणी पीठ, २ चमचे गायीचे तूप.
कृती : चिमूटभर मीठ घालून मऊसर पीठ भिजवा. हे पीठ साधारण अर्धा तास झाकून ठेवा. सारणाचे साहित्य : १/४ कप ओला नारळ, १/४ कप सेंद्रीय गूळ, १ चमचा जवस पूड, १/४ कप वेलची-जायफळ पूड, १ चमचा बीट, गाजर, भोपळा कीस, प्रत्येकी १ चमचा बदाम, अक्रोड, खजूर, सुके अंजीर, जर्दाळू, बेदाणे, मनुका, सुकवलेले प्लम्स आणि काजू, १ चमचा अळीव, ११/२ चमचा साजूक तूप.
कृती : अळीव व खोबरे एकत्र करून एक ते दोन तास ठेवा. बदाम, अक्रोड, अंजीर, खजूर, काजू, प्लम्स, जर्दाळू, बेदाणे, मनुका ह्या सर्वांची पाणी किंवा दूध न घालता एकत्र पेस्ट बनवा. कढईत तूप घालून त्यामध्ये खोबरे व अळीव मिश्रण, गूळ घाला. चांगले परतून घ्या. त्यामध्ये बीट, गाजर, भोपळा ह्यांचा कीस घाला. आता यात जवस पूड, वेलची-जायफळ पूड घाला. सर्व एकत्र ढवळून घ्या. सारण थंड करा. मऊ गोळा तयार होईल. वरील पिठाचे गोळे करा. त्याची पारी बनवा. त्यामध्ये सारण भरून साटोरी लाटा. तव्यावर भाजून तूप सोडून खमंग भाजा. हा पदार्थ तीन ते चार दिवस टिकतो.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
स्वाती संजय जोशी