सखा कृष्ण हरि हा
‘कृष्ण’ ह्या दोन अक्षरांमध्ये सर्वांची मने खेचून घेण्याची प्रचंड ताकद आहे. कोणी त्याच्या रूपाकडे आकृष्ट होतात, तर कोणी त्याच्या बाललीलांनी मोहित होतात. कोणी त्याच्या रासक्रीडेत रंगून जातात, तर कोणी त्याच्या योगीश्वर रूपासमोर नतमस्तक होतात. कोणी त्याच्या नीरक्षीरविवेकाने अचंबित होतात, तर कोणी त्याच्या गीतारूपी विवेक चिंतामणीचे तेज पाहून विस्मित होतात. अर्जुनाच्याच नव्हे, तर साऱ्या मानवजातीच्या हाती आलेला हा गीतारूपी दिव्य चिंतामणी आजही अनेकांचे जीवन उजळवून टाकतो.
कृष्णाने सदोदित अत्यंत काटेकोरपणे यम-नियमांचे पालन केले. इतकेच नाही तर पूर्वी कोणी केले नसेल इतके प्रत्येक काम उत्कृष्ट करून दाखविले.
नित्यनियमाने वागणाऱ्या न्यायी माणसालाही काही अपवादात्मक प्रसंगी नियम वाकवावे लागतात, बदलावे लागतात किंवा मोडावेही लागतात. ज्याप्रमाणे भाजी, कापूस, सोने ह्या सर्व वस्तू एकाच तराजूने तोलून चालत नाहीत, त्याचप्रमाणे सर्व लोकांना एकच नियम लावून चालत नाही.
वैयक्तिक पातळीवर अत्यंत निर्मोही, निःस्वार्थ, निस्पृह आणि निरपेक्ष भावनेने काम करणारा कृष्ण राष्ट्राचा, धर्माचा विचार करताना मात्र निर्मम आणि विशोक (शोकरहित) आहे. ‘श्रीविष्णुसहस्रनामा’त वर्णन केल्याप्रमाणे भगवान कृष्ण ‘अमानी मानदो मान्यः’ असा आहे. त्याला कोणाकडूनही कुठल्याही मानाची अपेक्षा नाही. इतरांना मात्र तो मान देतो. सुदाम्याच्या प्रेमाखातर अनवाणी धावत जाणारा कृष्ण, सुदाम्याचे पाय स्वहस्ते धुणारा कृष्ण आजही सर्व भारतीयांच्या हृदयात विराजमान आहे.
महाभारतयुद्धात थोडासा वेळ मिळताच अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांना ताजेतवाने करण्यासाठी चाबूक मुकुटात खोचून त्यांना अंघोळ घालणाऱ्या, खरारा करणाऱ्या आणि अर्जुनाला रथात चढण्यासाठी स्वतः ओणवे वाकून आपल्या पाठीवर पाय ठेवून मदत करणाऱ्या कृष्णाची मूर्ती सर्वांच्या डोळ्यासमोर आहे.
भीष्मांनी युद्धात कृष्णाला हाती शस्त्र धरायला लावीन, अशी प्रतिज्ञा केल्यावर त्यांच्या प्रतिज्ञेसाठी आपली प्रतिज्ञा मोडणारा कृष्णही तितकाच विवेकी व लोभस आहे. त्यातून त्याने दोन गोष्टी साधल्या. भीष्मांना शस्त्र खाली ठेवायचा संदेशही दिला, तर भीष्मांशी लढायला कचरत असलेल्या अर्जुनामध्ये जिगीषा जागविण्याचे कामही केले. आपल्या मृत्यूनंतर आपले क्रियाकर्म कृष्णाने करावे, ही शत्रूपक्षातील कर्णाने व्यक्त केलेली इच्छाही कृष्णाने मोठ्या आत्मीयतेने पूर्ण केली.
क्रोधावरील संयम किती लवचिक असावा, तो किती ताणावा आणि तो कुठे सोडावा ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिशुपालाचा वध. पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या सांगता सभेत कृष्णाला मिळालेला अग्रपूजेचा मान पाहून संतापलेल्या शिशुपालाने हीन शब्दांत कृष्णाची निर्भर्त्सना करायला सुरुवात केली. त्याचे शंभर अपराध मोजत कृष्ण शांत होता. शेवटी भीष्माचार्यांचाही अपमान करणाऱ्या शिशुपालाला शांतपणे त्याचा एक-एक अपराध सांगून मगच कृष्णाने त्याच्यावर सुदर्शन चक्राचा प्रयोग केला.
कृष्ण ‘धर्मगुप्’ म्हणजे धर्माचे रक्षण करणारा आहे, ‘धर्मकृत्’ म्हणजे स्वतःच्या आचरणाने धर्म निर्माण करणारा आहे आणि ‘धर्मी’ म्हणजे धर्मानुसार वागणाराही आहे. दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा, ही कृष्णाच्या मुलाची- सांबाची पत्नी असल्याने कौरव व पांडव दोघेही त्याचे नातेवाईकच होते. पण धर्माची बाजू घेणारा कृष्ण सुनीतीच्या मार्गावर चालणाऱ्या पांडवांपाठी मेरू पर्वताप्रमाणे उभा राहिला.
नरकासुराच्या वधानंतर त्याच्या बंदिखान्यात खितपत पडलेल्या सोळा हजार स्त्रियांना कृष्णाने सन्मानाने समाजाच्या मुख्य धारेत आणले. त्यांना पत्नीचा मान दिला.
कौरवांकडे शिष्टाईसाठी जाणाऱ्या कृष्णाने द्रौपदीला ‘हे युद्ध होणारच आणि ह्या युद्धात तुझा प्रतिशोध पूर्ण होणारच,’ हे आश्वासन आधीच दिले होते. तरीही आडमुठ्या दुर्योधनाच्या तोंडून ‘मी सुईच्या टोकावर राहील एवढी भूमीही पांडवांना देणार नाही,’ हे बोल येणे गरजेचे होते. शिष्टाईच्या निमित्ताने सर्व महारथींशी संवाद साधत दुर्योधनाची मदार ज्यांच्या-ज्यांच्यावर होती, अशा कर्णासहित सर्वांचे मनोधैर्य खच्ची करून कृष्ण परतला. युद्धाआधीच अर्धी लढाई तो जिंकून आला. हा ‘वृषकर्मा’ म्हणजे धर्माने वागणारा होताच, पण ‘वृषाकृती’ म्हणजे धर्माचे जणू सगुण रूप होता. त्यामुळेच भीष्म, द्रोण, कर्ण, जयद्रथ, दुर्योधन वा दुःशासन असो वा कंस, जरासंध, नरकासुर असो. अश्वत्थामा असो वा कृप; अधर्माची कास धरणाऱ्या प्रत्येकाला सरळ मार्गाचा अवलंब न करता वरवर वाटणाऱ्या ‘अधर्म’ मार्गाने वधून वा शासन करून कृष्णाने धर्मसंस्थापनाच केली आहे.
दुष्ट, दुर्जनांवर प्राणघातक प्रहार
करण्याकरिता सर्व शस्त्रे, अस्त्रे आणि आयुधांनी सज्ज असा कृष्ण ‘सर्वप्रहरणायुध’ (दुष्टांवर प्रहार करण्यास सतत सज्ज) असला तरी तो ‘अक्षोभ्य’ आहे. कोणीही त्याला क्षुब्ध करू शकत नाही. त्याने दुष्टांना केलेले शासन हे कुठल्याही सूडबुद्धी, संताप, अहंकारातून झालेले नाही, तर अत्यंत समतोल मनाने घेतलेला तो निर्णय आहे. म्हणूनच तो सर्व शस्त्रधारींमध्ये श्रेष्ठ म्हणजे ‘सर्वशस्त्रभृतांवरः’ आहे.
भक्तांसाठी कुठलेही कष्ट सोसण्यास तयार असलेल्या कृष्णाचे वैराग्य पाहिल्याशिवाय त्याच्या विवेकाची पूर्ण कल्पना येत नाही. कंसानंतर मथुरेच्या किंवा द्वारकेच्या राज्याचेही ‘राजे’पद त्याने स्वीकारले नाही. वेळ पडल्यास विदुराघरच्या कण्याही परमानंदाने स्वीकारल्या, तर द्रौपदीकडे भांड्याला चिकटलेल्या एका शितावर तो तृप्त झाला. कमलपत्रावर पडलेले पाणी त्याला जराही न चिकटल्यामुळे हिऱ्या-मोत्याप्रमाणे चमकते, त्याचप्रमाणे कशाचाही मोह नसलेला हा निर्मोही कृष्ण कुठल्याच बंधनात बांधला गेला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत त्याचे धैर्य, माधुर्य, विवेक जागृत होता. ‘‘कृष्णा, तुम्हीही सारे यादव एकमेकांत लढून मराल आणि एका अनाथासारखा तुला क्षुल्लक कारणाने मृत्यू येईल,’’ ही गांधारीची महाभयंकर शापवाणी ऐकून सारे पांडवही जेथे भयाने थरथर कापू लागले, तेथे कृष्णाने सुस्मित वदनाने तिचा शाप स्वीकारला. परीक्षितीला जीवनदान देणाऱ्या, पांडवांचे वेळोवेळी रक्षण करणाऱ्या कृष्णाने स्वतःला मिळालेला शाप व्यर्थ ठरावा ह्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. त्याचप्रमाणे उन्मत्त झालेल्या स्वतःच्या पुत्रांना मिळालेला कुलक्षयाचा शापही त्याने धीरोदात्तपणे केवळ स्वीकारलाच नाही, तर ऋषींच्या शब्दाचे सामथ्र्य लोप पावू नये, त्यांची शापवाणी खोटी होऊ नये म्हणूनच की काय तो सर्व यादवांना प्रभासक्षेत्री घेऊन गेला. तेथे उन्मत्त झालेल्या यादवांमध्ये झालेल्या यादवीत सर्व यादवकुलाचा नाश झाला, अशी समजूत आहे. अशाही प्रसंगी ‘सत्यधर्मपरायण’ असा कृष्ण विचलित झाला नाही. गांधारीच्या शापवाणीसाठी योग्य वेळ आली आहे, हे जाणून समाधिस्थ बसलेल्या कृष्णाच्या पायावर व्याधाने बाण सोडला. तेव्हाही त्या व्याधावर क्रोधित न होता अत्यंत स्मितमुखाने त्यालाही क्षमा करून हा परमविवेक-चूडामणी कृष्ण निजधामास गेला.
श्रीमद् आद्य शंकराचार्यांची प्रतिभा (श्रीकृष्णम्ष्टकम्) मराठीत मांडून म्हणावेसे वाटते,
शठांना संहारी,
सुजन नित रक्षी सजग जो
मनी संदेहाला वितळवि,
विवेका उठवितो
विसावा विश्वाचा
सकल-जगजेठी निरुपमा
दिसो माझ्या नेत्री
अविरत सखा कृष्ण हरि हा
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अरुंधती दीक्षित
(संदर्भ ः ‘महाभारत’ – गीताप्रेस, गोरखपूर; ‘ज्ञानेश्वरी’, ‘विष्णूसहस्रनाम’- कै. वरदानंदभारती, ‘सुबोध स्तोत्र संग्रह’- कै.पांडुरंगशास्त्री गोस्वामी.)