शालेय वयातील मुलांचा आहार
साधारणपणे ७ ते ९ आणि १० ते १२ वर्षे वयाच्या मुलांचा समावेश या गटांमध्ये होतो. या काळात मुलांच्या वाढीचा आणि विकासाचा दर मंदावलेला असल्याने त्यांच्या शरीराला पोषकतत्त्वांची गरज त्या मानाने कमी असते. ९ वर्षांपर्यंत मुलांची आणि मुलींची पोषणाची गरज सारखीच असते. त्यानंतर मुलींच्या शरीराचा विकास झपाट्याने होत जातो व त्यांची गरज वाढते.
या वयातील मुलांना साधारणपणे रोज २००० कॅलरीज व ५० ते ५५ ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. उष्मांकाची गरज एकंदरीत कमी असते. प्रथिनांच्या बाबतीतसुद्धा हेच म्हणता येईल, परंतु १०-१२ वर्षे या वयात उष्मांक आणि प्रथिनांची ही गरज थोडी जास्त होते, कारण शरीर युवा अवस्थेसाठी तयार होत असते. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढत असल्यामुळे लोहाची गरज वाढलेली असते. हाडांच्या व स्नायूंच्या कार्यामुळे सर्व खनिजे व विशेषतः सर्वच जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात या वयातील मुलांना दिली पाहिजेत.
या वयोगटातील मुलांचा दैनंदिन कार्यक्रम भरगच्च असलेला आपण पाहतो. शाळा, वेगवेगळे क्लासेस यामुळे दिवसभर ही मुले व्यग्र असतात. त्यातच त्यांना खाण्यामध्ये फार रुची नसते, वेळही कमी असतो. एका जागी बसून खाण्यात त्यांना फारसे स्वारस्य नसते. यामुळे त्यांना खूप पदार्थ न देता, ज्यामधून बरीच पोषकमूल्ये मिळतील असे पदार्थ द्यावेत. जसे की, भाज्या व डाळ घालून केलेले पराठे, अंड्याचे सँडविच, थालीपीठ, इडली, डोसा, उत्तपा वगैरे.
शाळेतील डब्यासाठी काही सूचना :
- वर नमूद केलेली दिवसभरातील आहाराची एक-तृतीयांश गरज डब्यातून पूर्ण झाली पाहिजे. तसेच सर्व अन्नघटकांचा समावेशही त्यात झाला पाहिजे.
-
उच्च दर्जाची प्रथिने उदा, दही, पनीर, अंडी यांचा आहारात समावेश करावा.
-
एखादे फळ / सुकामेवा असणे इष्ट आहे.
-
थंड झाल्यावरही चांगली चव राहील, असे पदार्थ डब्यात द्यावेत.
-
पदार्थामध्ये रंग, चव, स्वाद व पोत याबाबतीत विविधता असावी.
-
भाज्या, सॅलेड यांचा समावेश भरपूर प्रमाणात करावा‧ मुलांना भाज्या, सॅलेड आवडत नसल्यास पुरी, पराठे, सँडविच इत्यादी पदार्थांमधून त्यांचा समावेश करावा.
-
मधल्या वेळेत देण्यात येणाऱ्या खाण्यात फळे, सुकामेवा, चणे, शेंगदाणे यावर भर द्यावा.
मुलांच्या आहाराला जेवढे महत्त्व दिले जाते तेवढेच खालील गोष्टीसुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत :
- टी‧व्ही, कम्प्युटरसमोर बसून तळकट पदार्थ खाण्याचे टाळावे.
-
रोजच्या घाईगडबडीच्या आयुष्यात मुले नाश्ता किंवा जेवण टाळू बघतात, पण असे करू देऊ नये.
-
आहार ला व्यायामाची योग्य ती जोड मिळाली पाहिजे, म्हणजेच मुलांनी रोज एक ते दोन तास मैदानावरील कुठलाही खेळ खेळला पाहिजे किंवा सर्वांगीण व्यायाम केला पाहिजे.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. लीना राजे