युवावस्थेतील आहार
बाल्यावस्थेतून प्रौढ अवस्थेत जाण्याच्या मार्गातील एक महत्त्वपूर्ण अवस्था म्हणजे तारुण्य.या काळात शरीरात बरेच जीव-रासायनिक, भावनिक आणि शारीरिक बदल होत असतात. हार्मोन्समध्ये घडून येणाऱ्या मुख्य बदलांमुळे बालकांचे तारुण्यात पदार्पण होते.मुलींमध्ये मासिक पाळी चालू होते व शरीराची एकंदर वाटचाल प्रजननाच्या दिशेने चालू होते.या वयात विकासाचे प्रमाण खूपच जास्त असल्याने उष्मांक, प्रथिने, खनिजे व जीवनसत्त्वे या सर्वच पोषकमूल्यांची गरज खूप वाढते.
दिवसभरात २५००-२६०० उष्मांक व मुला-मुलींच्या वजनाच्या दर किलोमागे १ ग्रॅम प्रथिने (दिवसभरात साधारण ४० ते ५० ग्रॅम) शरीराला पुरविण्याची गरज असते.हाडांच्या वाढीसाठी ५००-६०० मि.ग्रॅ.कॅल्शियम व हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी वाढीव प्रमाणात लोहाची गरज या काळात असते.
या वयातील मुलांवर आपल्या मित्र-मैत्रिणींचा खूप प्रभाव असतो.अभ्यास व इतर गोष्टींमुळे मुले आहाराकडे खूप दुर्लक्ष करतात.स्वतःच्या वजनाच्या बाबतीत अति जागरूक राहून कमी खातात.सध्या सगळीकडे पसरलेले डाएट, झिरो फिगर अशा फॅड्सचाही त्यांच्यावर कळत नकळत प्रभाव पडत असतो.या सर्वांचा परिणाम होऊन या वयात कुपोषण होऊ शकते, म्हणून युवकांच्या आहाराची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.
आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून खालील गोष्टींवर विशेष लक्ष द्याः
- दिवसभरात पूर्ण चार वेळचे खाणे घेणे इष्ट आहे.त्यात सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवण यांचा समावेश होतो.
-
आहार समतोल व पोषणमूल्यांनी परिपूर्ण असावा.
-
शरीराच्या पोषणासाठी व वाढीसाठी आवश्यक उष्मांक व प्रथिने आहारात समाविष्ट करावी.
-
लोहतत्त्वाची वाढीव गरज लक्षात घेऊन त्या दृष्टीने अंडी, मांस, मासे, पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात.
-
फळे, भाज्या, सॅलेड्सचा योग्य समावेश करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे मिश्र पदार्थ मुलांना बनवून द्यावेत.
उदा.,
१) कडधान्ये, डाळी व भाज्या यांचे एकत्रीकरण करून थालीपीठ, फ्रँकी किंवा पराठे करता येतात.
२) पालेभाज्यांचा वापर करून बनविलेले ठेपले किंवा पराठे.
३) कडधान्यांची भेळ किंवा त्याचा वापर करून केलेला पिझ्झा वगैरे.
हे लक्षात ठेवा :
- डबाबंद ज्यूस, कार्बोनेटेड पेय, प्रक्रिया केलेले पॅकबंद (हवाबंद) खाद्यपदार्थ शक्यतो टाळावेत.
-
घरी बनविलेले सात्त्विक अन्न आरोग्यास हितकारक असते.हॉटेलमध्ये अथवा बाहेर खात असताना योग्य पदार्थांची निवड करण्यास मुलांना शिकविले पाहिजे, की ज्यामधून त्यांच्या शरीराचे पोषण चांगल्या प्रकारे होईल.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. लीना राजे