माझी हळवी गुंतवणूक | श्रीकांत बोजेवार | My Gentle Investment | Shrikant Bojewar

Published by Kalnirnay on   April 6, 2021 in   2021मराठी लेखणी

माझी हळवी गुंतवणूक(इन्व्हेस्ट)

गुंतवणुकीबाबत माझा नेहमीच गोंधळ होतो. मध्यम काय आणि उच्च काय, माणूस गुंतवणुकीबाबत फार हळवा असतो. मी कविता वगैरे लहानपणापासूनच करायचो. आता कविता वगैरे करणारा माणूस गुंतण्याच्या बाबतीत थोडा जास्तच संवेदनशील असतो. माझ्या कवितांचे पहिले वाचक आमचे मराठीचे सर असायचे. माझ्या कवितांमधून अचानक निसर्ग नाहीसा झाला तेव्हा ते काळजीत पडले आणि पुढच्या काही कविता वाचून अधिकच काळजीत पडले. एक दिवस माझी कविता वाचून ते म्हणाले, ‘‘कविता छान आहे परंतु अलीकडे तुझ्या कवितांचे केंद्र आपल्या वर्गातील मधल्या ओळीतील चौथ्या बेंचवरील उजवीकडल्या असामीकडे सरकलेले आहे.’’ मी मान खाली घालून उभा राहिलो तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘डोन्ट इन्व्हेस्ट यूअर एनर्जी अँड टाइम इन हर.’’

तेव्हा मी पहिल्यांदा ‘इन्व्हेस्ट’ हा शब्द ऐकला. पुढे या शब्दाला ‘मेंट’ची जोड लागून त्या ‘इन्व्हेस्टमेंट’ने माझा सतत पिच्छा पुरवला, अजूनही सोडत नाही.

मला पहिली नोकरी लागली. पहिला पगार मिळणार होता, त्याच सुमारास एका एजंटने मला गाठले. आयुष्यात जेवढ्या लवकर इन्व्हेस्ट मेंट सुरू करशील तेवढे फायद्याचे ठरेल, असा उपदेश त्याने केला आणि थेट ‘तुला टेक होम किती मिळतात?’ असे विचारले. खरे तर मी जेव्हा एका मुलीकडे पाहून पहिल्यांदा प्रेमकविता रचल्या होत्या तेव्हा मला ‘टेक होम’ हा शब्द जास्त उपयोगाला आला असता. त्या काळात मी इंग्रजीत कविता करण्याचा प्रयत्न करत होतो. ‘आय विल फॉलो यू फ्रॉम सोनेगाव बुद्रूक टू रोम’ या एका ओळीनंतर रोमशी यमक जुळवता आले नाही म्हणून मी ती कविता तशीच सोडून दिली होती. या एजंटमुळे मला एवढ्या वर्षांनी पुढची ओळ सुचली आणि मनातल्या मनात मी त्या ओळी पूर्ण केल्या. ‘आय विल फॉलो यू फ्रॉम सोनेगाव बुद्रूक टू रोम, बीकॉज आय वाँट टू टेक यू होम.’ परंतु आता त्याचा काही उपयोग नव्हता. माझ्या ‘टेक होम’चा आकडा त्या एजंटाला सांगू की नको, अशा संभ्रमात मी पडलो. आपल्याकडे सभ्य माणसे समोरच्या पुरुषाला कधी पगाराचा आकडा विचारत नाहीत. परंतु अशी सभ्यता जपायची म्हटले तर माणसे एजंट कशी होणार बिचारी, असा विचार करून मी आकडा सांगितला. तो म्हणाला, ‘‘बघ, फक्त तीन हजार रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट कर. ३२ वर्षांनी तुला एक कोटी रुपये मिळतील.’’ मला कवितांमधले कळत असल्याने गणितातले काही कळत नव्हते, हे ओघाने आलेच. बहुधा त्या अज्ञानातूनच त्या एजंटला मी विचारले, ‘‘समजा तुझ्या कंपनीने मला आत्ता एक कोटी रुपये दिले आणि मी पुढची ३२ वर्षे त्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये परत दिले तर नाही का चालणार? हिशोब तर तोच होईल ना?’’ या प्रश्नानंतर त्या एजंटने मला करोडपती करण्याचा उचललेला विडा खाली ठेवून दिला.

आपल्या समाजात उपदेश देणाऱ्यांची एक जमात आहे. दिवसभरात पाच लोकांना उपदेशाचे डोस पाजायचेच, असा जणू त्यांचा नियम असतो. अशाच एका उपदेशपाजकाने मला एक दिवस खिंडीत गाठले आणि विचारले, ‘‘तुला ‘आर.डी.’ माहिती आहे का?’’ त्याच्या या प्रश्नाने मी शहारलो आणि म्हटले, ‘‘एक सौ सोला चांद की राते, और तुम्हारे कांधे का तील…’’ हे ऐकताच त्याने मला दम भरला, ‘‘असली फालतू गाणी नको ऐकवूस मला. रिकरिंग डिपॉझिटची माहिती करून घे. असे छप्पन्न तीळदार खांदे तुझ्या घरी पाणी भरतील.’’ मग त्याने मला आर.डी.मध्ये दर महिना ठरावीक रक्कम टाकण्याचे काय आणि कसे फायदे असतात, ते समजावून सांगितले. राष्ट्रीय बँकांपेक्षा सहकारी बँकांमध्ये ०.५ टक्के अधिक व्याज मिळते आणि त्यातही काही बँका ०.६ टक्केही देतात, अशी खास माहिती दिली. ‘‘तुझ्या मागे संसाराच्या कटकटी नाहीत तोवर इन्व्हेस्टमेंट करून घे
लेका’’ असे तो म्हणाला तेव्हा, आता त्या ‘आर. डी.’कडून या ‘आर. डी.’कडे जाण्याचे दिवस आले आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे, असे मीच मला मनातल्या मनात सांगितले.

मी या नव्या आर.डी.विषयी गंभीर होऊ लागलो होतो, परंतु तोवर कुठून कसे ते माहिती नाही, पण मी ग्राहक असल्याचे बऱ्याच इन्व्हेस्टमेंट सल्लागारांना कळले. त्यातल्या एकाने मला गाठले आणि इन्व्हेस्टमेंट हाच आजच्या युगाचा मंत्र आहे, असे सांगितले. युग वगैरे म्हटले, की मी जाम इम्प्रेस होतो. तंत्रज्ञानाचे युग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे युग, संगणकाचे युग असे शब्द दिसले, की मी ते लेख किंवा बातम्या फार गांभीर्याने वाचतो. त्यामुळे हा सल्लागार नक्कीच उपयोगाचा आहे, अशी खात्री होऊन मी त्याला आर.डी.बाबत सांगितले. त्यावर तो म्हणाला, ‘‘तुम्ही शाम्पूच्या काळात शिकेकाईने केस धुण्याचा विचार करता आहात.’’ हे ऐकून माझ्या तोंडाला फेस आला. मनात म्हटले, ‘बरे झाले हा आपल्याला भेटला.’ मी त्याला म्हटले, ‘‘मग कोणता शाम्पू वापरायचा ते तरी सांगा.’’ त्याने माझ्यावर कृपाछत्र धरल्यासारखा भाव चेहऱ्यावर आणला आणि विचारले, ‘‘तुम्ही एस.आय.पी.चे नाव ऐकले आहे का कधी?’’ मी म्हटले, ‘‘खरे तर एकेकाळी मला वाटत होते आपण पी.एस.आय. व्हावे, परंतु मग आपल्या व्यक्तिमत्त्वाला ते शोभणार नाही हे लक्षात येऊन मी तो विचार सोडून दिला होता…’’ ही माहिती ऐकल्यावर तो म्हणाला, ‘‘फारच नवशिके दिसता तुम्ही. बाजारात पहिल्यांदाच आलात वाटते.’’ मला लाजल्याहून लाजल्यासारखे झाले. पण तो म्हणाला, ‘‘हरकत नाही, मी सांगतो सगळे तुम्हाला. पी.एस.आय. नव्हे, एस.आय.पी. म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपण ठरवायचे, की आपल्याला महिन्याला अमुक एक रक्कम गुंतवायची आहे. मग त्या रकमेत कोणत्या कंपनीचे किती शेअर्स विकत घ्यायचे, कोणत्या म्युच्यअल फंडात किती गुंतवायचे हे आमच्यासारखी माणसे ठरवतात…’’
‘‘बापरे, शेअर्स? त्यात तर म्हणे काही खात्री नसते. भाव खाली गेले, की दोन सेकंदात करोडोंचे नुकसान होते लोकांचे.’’
‘‘अहो ते सगळे कागदावर असते.’’
‘‘पण मग होणारा फायदाही कागदावरच राहात असेल ना..?’’
‘‘नाही. अहो, माझ्या ओळखीतल्या एकाने तर एकदा २५ हजारांचे शेअर्स घेतले नि तो ते विसरून गेला. आता २५ वर्षांनी तो करोडपती झाला आहे. मराठी माणसांचा प्रॉब्लेम हा आहे, की त्याला काल रात्री शेअर्स खरेदी केले की आज सकाळी त्याचा भाव दुप्पट झालेला हवा असतो. पण तुम्ही शेअर्स वगैरे जाऊ द्या, म्युच्यअल फंडात टाका पैसे. मी एस.आय.पी. करून देतो.’’ मला आठवले, गेल्याच आठवड्यात मी एका मुलीला बघायला गेलो होतो तेव्हा ती मला म्हणाली होती, ‘‘लग्नानंतर घरात जे काही होईल ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगने झाले पाहिजे.’’ ती बहुधा या फंडाबद्दलच बोलत असावी. मला इन्व्हेस्टमेंटबद्दल काहीच माहिती नाही, हे पाहून मग त्या एजंटचा आत्मविश्वास दुणावला. त्याने पी.पी.एफ., लाइफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, एटी सीसी कलम, डेट फंड वगैरे अनंत प्रकारची माहिती देऊन मला इन्व्हेस्टमेंटच्या युगाचे विश्वरूपदर्शन घडवले. त्यासंबंधित एजंटांचे नंबर देऊन स्वतःच्या मोबाइलवरून लगेचच त्यांच्याशी संपर्कही करून दिला. त्या विश्वरूपदर्शनानंतर मी जेव्हा हिशेब केला तेव्हा टेक होम म्हणून त्या दिवसासाठी भाजीपाला घेऊन जाण्याएवढेही पैसे अखेर खिशात राहणार नाहीत, हे माझ्या लक्षात आले. त्या एजंटमध्ये मला माझ्या वर्गातील मधल्या ओळीतील चौथ्या बेंचवरील उजवीकडली असामी दिसू लागली आणि माझे मन मला सांगू लागले, ‘डोन्ट इन्व्हेस्ट यूअर एनर्जी अँड टाइम इन हर.’ ‘‘मी विचार करून सांगतो,’’

असे म्हटले तेव्हा त्या एजंटला माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट नकार दिसला असावा आणि त्यामुळे आपली एनर्जी आणि टाइम वाया गेल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर उमटले. त्यानंतर मी इन्व्हेस्टमेंटवर छापून येणारी सदरे, बातम्या, मार्गदर्शन करणारी पुस्तके वाचण्याचा सपाटाच लावला. परंतु तरीही ‘डेट फंड’ म्हणजे काय, असे कुणी विचारले तर आजच्या डेटलाही मला नीट काही सांगता येणार नाही!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


श्रीकांत बोजेवार