का लागे जीवाला घोर
काळजी वाटणे, हा कोणत्याही प्रकारच्या धोक्याला शरीराने दिलेला प्रतिसाद असतो. अशी चिंता वाटल्याने संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी शरीर सज्ज होते. जेव्हा काळजी वाटण्याचे प्रमाण वाढते तेव्हा त्याला ‘चिंतातुरता’ किंवा ‘घोर’ म्हणजेच इंग्रजीमध्ये ‘अँक्झायटी’ असे म्हणतात. वैद्यकीय शब्दात चिंतातुरता किंवा घोर यांची व्याख्या करायची झाली तर सातत्याने, अनियंत्रित आणि दडपून टाकणारा अनुभव असे म्हणावे लागेल. जीवाला घोर लागतो तेव्हा किंवा चिंता वाटते तेव्हा दैनंदिन परिस्थितीबद्दल अतिप्रमाणात आणि अवास्तव भीती वाटू लागते. परिणामी, दैनंदिन कामे करणे कठीण होऊन जाते. अशा परिस्थितीत एकूणच जगण्यावर मर्यादा येऊ शकतात. तुम्हाला धास्ती वाटत असेल आणि फोन उचलणे किंवा मित्रांना भेटावेसे वाटत नसेल किंवा काळजीचे स्वरूप शारीरिक असेल तर तुमच्यात कदाचित चिंता / घोर या समस्येची लक्षणे दिसत आहेत.
चिंता वाटण्याची ही समस्या वैद्यकीय स्वरूपाची असेल, तर ती अशीच निघून जात नाही आणि ही भावना अनपेक्षित वेळी कोणत्याही ताणाशिवायही निर्माण होऊ शकते. काही काळाने दैनंदिन कामे हीसुद्धा चिंतातुर होण्यासाठी कारणीभूत ठरू लागतात. ईमेलला प्रतिसाद देणे, शिक्षक किंवा वरिष्ठांची भेट घेणे हेसुद्धा मानसिकदृष्ट्या थकविणारे किंवा न जमणारे वाटू शकते. चिंता या पातळीवर पोहोचते तेव्हा योग्य मदतीशिवाय, या परिस्थितीशी जुळ-विण्यासाठी अनारोग्यदायी मार्गांचा स्वीकार केला जातो. म्हणजेच, बहुतेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करू लागतो. आपण अशी परिस्थिती किंवा कामे टाळण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा आपण चिंतेमध्ये भरच घालत असतो.
अति काळजी वाटणे, त्रास होणे, अस्वस्थ होणे, थकवा येणे, मन एकाग्र न होणे, चिडचिड होणे, झोप न येणे, पॅनिक अॅटॅक आणि प्रचंड भीती वाटणे हे जीवाला घोर लागल्याचे संकेत आहेत. दरदरून घाम येणे, हृदयाचे ठोके वाढणे, छातीत जड होणे, जोरजोरात श्वासोच्छ्वास करणे, स्नायूंमध्ये ताण जाणवणे ही या समस्येची शारीरिक लक्षणे आहेत. शारीरिक व वागणुकीमध्ये दिसणारी लक्षणे आपत्तीजनक असू शकतात आणि ज्या परिस्थितीत जीवाला असा घोर लागतो, तेव्हा अशी परिस्थिती टाळण्याकडे म्हणजेच शाळा, सामाजिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य किंवा काम टाळण्याकडे कल वाढू लागतो.
या समस्येमधील शारीरिक लक्षणे आणि संकेत वेगवेगळे नमूद केले आहेत. ‘अँक्झायटी’ची समस्या भेडसावणाऱ्या व्यक्ती सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारी ही शारीरिक लक्षणे दुर्लक्षित करतात. मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, हे स्वीकारणे कठीण असते आणि नाकारणे सोपे असते. अशा प्रकारची लक्षणे दिवसभरात जेव्हा अनेकदा दिसून येतात, तेव्हा त्यांना सामान्यपणे जगता येत नाही किंवा आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे त्यांना वागता येत नाही. अशा वेळी आपल्याला ‘अँक्झायटी’ची समस्या असल्याचे वास्तव ते
स्वीकारतात.
अधिकृतपणे मानसिक आजारांचे सर्वंकष वर्गीकरण करणाऱ्या ‘डायग्नॉस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिस-ऑर्डर्स’ नुसार (डीएसएम-व्ही) चिंतेशी संबंधित तीन प्रकार आहेतः अँक्झायटी डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर्स आणि स्ट्रेसर रिलेटेड डिसऑर्डर्स.
अँक्झायटी डिसऑर्डर्समध्येही अनेक उपप्रकार आढळतात. केवळ प्रशिक्षित मानसिक आरोग्य तज्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञच अँक्झायटीच्या आजाराचे अस्तित्व आणि निदान याचे मूल्यमापन करू शकतात. एखाद्याची मनःस्थिती कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर माहिती वाचता येत असली आणि त्यासंदर्भात अधिक जाणीव होत असली तरी प्रशिक्षित तज्ज्ञाचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
मुलांना ‘अँक्झायटी’ जाणवू शकते का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. मुलांमध्ये दिसून येणारी चिंता अनेक प्रकारची असते. ‘सेपरेशन अँक्झायटी’ ही एक प्रकारची काळजी / चिंता मुलांच्या विकासाच्या आड येते. पालक किंवा पालकाच्या भूमिकेत असलेल्या व्यक्तीपासून विलग झाल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. आपण त्याकडे दुर्लक्ष केले आणि मूल त्यातून बाहेर पडेल, असा विचार केला तर मुलांना पडलेल्या या काळजीमुळे मुलांच्या भावनिक व सामाजिक विकासावर दूरगामी प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. या आजारामुळे त्यांचा आत्मविश्वास कमकुवत होतो. परिणामी, त्यांच्या वयाच्या कोणत्याही कृतीमध्ये ते सहभागी होत नाहीत.
‘सिलेक्टिव्ह म्युटिझम’ म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये मूल न बोलणे. हा प्रकार बहुधा शाळेत दिसून येतो. ही समस्या असलेले मूल तोंडाने न बोलता संवाद साधण्यासाठी हावभाव करत असल्याचे दिसून आले आहे. मात्र तेच मूल घरी व्यवस्थित बोलते. या आजाराबद्दल फारशी जाणीव पालकांमध्ये दिसून येत नाही आणि अशा मुलांकडे दुर्लक्ष होऊ शकते. यावर उपचार करण्यास विलंब लावला, तर मुलांच्या शाळेतील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यावर व अध्ययनावर किंवा इतर सामाजिक परिस्थितीमध्ये परिणाम होऊ शकतो.
प्रौढांमध्ये ‘जनरलाइझ्ड अँक्झायटी डिसऑर्डर’ हा सामान्यपणे आढळणारा अँक्झायटीचा प्रकार पाहायला मिळतो. यात दैनंदिन कामाबद्दल सातत्याने चिंता वाढत राहते आणि अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात ती जाणवत राहते. पॅनिक अॅटॅक्स म्हणजे भीतीची तीव्र भावना. काही मिनिटांमध्ये ही भावना उच्च पातळी गाठू शकते, त्यामुळे ती व्यक्ती थकून जाते. या अॅटॅकसोबतच वर नमूद केलेली इतर शारीरिक लक्षणेही दिसून येतात. फोबिया म्हणजे विशिष्ट परिस्थिती किंवा वस्तूविषयी अतिप्रचंड भीती वाटणे. या भीतीची परिणती पॅनिक अॅटॅकमध्ये होते आणि ही स्थिती टाळण्याकडे त्या व्यक्तीचा कल असतो. ‘सोशल अँक्झायटी’ हा अँक्झायटीचा अजून एक सामान्यपणे आढळणारा प्रकार आहे. या प्रकारात व्यक्तीला घोळक्यात राहण्याची, संवाद साधण्याची आणि / किंवा इतरांसमोर सादरीकरण करण्याची भीती वाटते.
अँक्झायटी समस्या असणाऱ्यांमध्ये अँक्झायटी अॅटॅक हा सामान्यपणे घडणारा प्रसंग असतो. याची तीव्रता कमी-जास्त असली तरी बहुधा या प्रकारात टप्प्याटप्प्याने चिंता वाढत जाते. यात काही शारीरिक लक्षणेही दिसून येतात. काही वेळा अँक्झायटी अॅटॅकमध्ये काहींना वाटते, की ते काहीच करू शकत नाहीत तर काही वेळा मनातल्या मनात असे अॅटॅक येतात आणि ती व्यक्ती मात्र दैनंदिन कामे करत राहते. अशा परिस्थितीत त्यांना शारीरिक अस्वस्थता जाणवू शकते. हा अनुभव अत्यंत कटू असू शकतो. त्यामुळे त्या व्यक्तीला मानसिक थकवा येतो आणि रोजच्या आयुष्याचा आनंद ती घेऊ शकत नाही.
भारतात मानसिक समस्यांना फार महत्त्व दिले जात नाही. आपल्याला सतत ताप येत असेल किंवा अंगात कणकण असेल तर आपण डॉक्टरकडे जातो. पण भावनांना आवर घालणे कठीण होत असते किंवा स्वभावात चढ-उतार होत असतात तेव्हा आपण दुर्लक्ष करतो. अशा बाबतीत मदत मागायला हवी. ते स्वाभाविक आहे आणि योग्यही! मानसिक आरोग्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकाशी संपर्क साधावा. मानसिक समस्यांवर उपचार करण्यासाठी सर्वाधिक वापरण्यात येणारी पद्धत म्हणजे टॉक थेरपी किंवा चर्चा करणे. व्यक्ती व मानसोपचारतज्ज्ञ यांच्या सहयोगातून ही प्रक्रिया घडत असते. काही वेळा मानसोपचारांसाठी औषधांची आवश्यकता असते. कारण काही वेळा शारीरिक बदलांचाही मूडवर परिणाम होत असतो.
मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्स सेरोटोनिन, डोपामाइन, नोरेपिनेफ्रिन आणि गॅमामिनोब्युटिरिक अॅसिड (जीएबीए) यांचा मूड व अँक्झायटीच्या आजाराशी संबंध असतो. यांच्या पातळ्यांमध्ये घट झाली तर आपल्या स्वभावात चढ-उतार होण्याची शक्यता असते. रासायनिक असंतुलन हे कारण असते तेव्हा अँक्झायटी आणि नैराश्यासाठी औषध घेणे हे गरजेचे आणि महत्त्वाचे असते. या समस्यांवर वेळीच उपचार केले नाही तर रासायनिक असंतुलन निर्माण होऊन त्यांचे प्रमाण किंवा तीव्रता वाढलेली असू शकते. पण आजही आपल्याला मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी औषधे घेणे, हा कलंक का वाटतो, असा प्रश्न उभा राहतो.
तुमच्या सतत काळजी करण्यामुळे तुमच्या जबाबदारीवर, आवडी-निवडींवर तसेच तुमच्या आनंदी राहण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असेल तर मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञांशी संपर्क साधावा. भीती किंवा काळजीवर नियंत्रण राहत नसेल, झोपेवर परिणाम झाला असेल आणि तुम्हाला आधी ज्या कृतीमुळे आनंद होत असे त्या कृतीमुळे आता आनंद होत नसेल, किंवा अतिकाळजीमुळे पोट बिघडणे, सतत डोकेदुखी किंवा नियमित आजारी पडणे असे शारीरिक परिणाम जाणवत असतील, तर तुम्हाला मदतीची गरज असल्याची ही लक्षणे आहेत. तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तसा हेतू असेल किंवा स्वतःला इजा करावीशी वाटत असेल, तर
ताबडतोब मदत घ्यावी.
* मुलांमधील अँक्झायटीच्या लक्षणांचे व्यवस्थापन करण्यासाठी श्वासोच्छ्वासाचे व्यायाम मुलांना शिकविणे फायद्याचे ठरू शकत.
* अँक्झायटीमध्ये तुम्हाला वाटते, की तुम्हाला प्रत्येक गोष्ट लगेच केली पाहिजे आणि ती परिपूर्णच असली पाहिजे. तसे नाही केले तर आपण अपयशी ठरलो. पण लक्षात घ्या, त्यात तथ्य नाही ती केवळ तात्पुरती भावना आहे.
फाइव्ह फिंगर स्टारफिश (काळजी-ताण दूर करण्यासाठी काही सोपे उपाय) :
१. हात वर उचला. पंजा पसरलेला आणि बाहेरच्या बाजूला असावा, बोटे मोकळी असावी म्हणजे साधारण स्टारफिशसारखा आकार असावा.
२. आता श्वास घेताना तुम्ही अंगठ्यावरून दुसऱ्या हाताने स्टार-फिशच्या आकारातील बोटांवर हात फिरवा.
३. हळूहळू श्वास घ्या व सोडा. असे करताना तुमच्या बोटांवरून हात फिरवा.
४. बोटांवरून अशा प्रकारे दोन वेळा हात फिरवा.
बलून ब्रीदिंग (तणाव दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेले श्वसन) :
१. तुमचा डावा हात पोटावर ठेवा आणि तुम्ही श्वासोच्छ्वास करताना पोट वर-खाली कसे होत आहे याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
२. नाकाने हळुवारपणे श्वास घ्या आणि तोंडावाटे हळुवारपणे श्वास सोडा.
३. जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा पोट फुग्यासारखे कसे फुगते आणि श्वास सोडता तेव्हा ते कसे बसते यावर लक्ष द्या.
४. ही कृती ३० सेकंद करा.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
गीतांजली पालेकर
(लेखिका प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ आहेत.)