असा करा डेंगूचा सामना | डॉ. कविता जोशी, एम.डी.मेडिसिन. | How to deal with Dengue | Dr. Kavita Joshi

Published by डॉ. कविता जोशी on   July 26, 2021 in   2021Health MantraReaders Choice

असा करा डेंगू चा सामना

डेंगू हा एक विषाणू (व्हायरस) असून तो डासांच्या माध्यमातून पसरतो. एडिस इजिप्ती किंवा टायगर जातीतील मादी डासांच्या चावण्याने हा व्हायरस तयार होतो. डेंगू विषाणूने संक्रमित झाल्यावर एडिस जातीचा हा डास जेव्हा मनुष्याला चावतो तेव्हा माणसाला ह्या विषाणूची लागण होते. डेंगूने ग्रस्त असलेल्या रुग्णाला जेव्हा दुसरा टायगर डास चावतो तेव्हा हा डेंगू विषाणू मनुष्याकडून डासामध्ये हस्तांतरित होतो. अशा प्रकारे डेंगू विषाणूचे जीवनचक्र पूर्ण होते. मनुष्यापासून मनुष्याला हा रोग होत नाही म्हणजेच तो संसर्गजन्य नाही.

याच डासाची मादी चावल्याने चिकनगुनिया आणि झिका या विषाणूची सुद्धा लागण होऊ शकते. ही मादी अत्यंत निडर असून ती अंधाऱ्या, थंड ठिकाणी वावरते. घरातील कपाटे, कोपऱ्यांत हे डास दिवसाही वास्तवास असतात. आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात टायगर डास पटाईत आहे. ह्या डासांची अंडी पाण्याच्या भांड्याच्या आतील पृष्ठभागाला चिकटून राहतात आणि पाण्याशिवाय जगू शकतात. पाणी मिळताच दहा-बारा दिवसांत अळीतून पूर्ण डास तयार होतो. मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालते. मनुष्यवस्तीत अशा प्रकारचे स्वच्छ पाणी बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी, सार्वजनिक पाणी साठविण्याच्या टाक्या, घरातील माठ किंवा तस्सम भांड्यांमध्ये असते. पावसाळ्यात तर सर्वच ठिकाणी पाणी साठलेले असते. त्यामुळेच डेंगूची साथ ही प्रामुख्याने पावसाळ्यात पसरते.

डेंगू हा सर्वसाधारणपणे तापाच्या स्वरूपात होतो. ह्यात रुग्णाला आजाराच्या कार्यकाळात तीन अवस्थांमधून जावे लागते.

पहिली अवस्था : ताप (दोन-सात दिवस), मळमळ, उलट्या, डोकेदुखी, डोळ्याच्या आत दुखणे.

दुसरी अवस्था (क्रिटिकल फेज) : तापाच्या तीन-चार दिवसांनंतर ही स्थिती येऊ शकते. यात रक्तदाब अचानक कमी होतो, अंतर्गत रक्तस्राव होतो.

तिसरी अवस्था : बरे होण्याची स्थिती (रिकव्हरी स्टेज) – तापानंतर सहा-सात दिवसांनी ही अवस्था येते व दोन ते तीन दिवस राहते.

डेंगू तापाचे प्रकार :

१. डेंगू साधा ताप : बऱ्याच रुग्णांमध्ये तापाची सौम्य लक्षणे दिसतात. ही सौम्य लक्षणे जाणवल्यावर आपण साधा ताप, व्हायरल फिव्हर किंवा फ्लू यासारखा आजार समजतो. साधारणतः एका आठवड्यात हा ताप बराही होतो. यात सहसा रुग्णाला रुग्णालयात भरती करावे लागत नाही.

२. डेंगू हिमोरेजिक फिवर : या प्रकारात ताप येणे, मळमळ, उलट्या, डोकेदुखी, डोळ्यांच्या आत दुखणे, सांधेदुखी, हाडेदुखी, अंगदुखी आदी लक्षणे दिसून येतात. अंगावर लाल पुरळ उठणे हे डेंगूच्या आजारातील एक प्रमुख लक्षण आहे. रक्तामधील प्लेटलेट्स कमी होतात, त्यामुळे रक्तस्राव होतो. तसेच मूत्रपिंड आणि यकृत यांच्या कामातही बाधा येते.

३. डेंगू शॉक सिंड्रोम : हा डेंगूचा सर्वात गंभीर प्रकार आहे. ह्यात रुग्णाचा रक्तदाब अचानक कमी होतो, शरीर थंड पडते, अर्धवट शुद्ध हरपते, रुग्णाला मानसिक संभ्रम होऊ शकतो. प्लेटलेट्स कमी झाल्याने रुग्णाला अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. हिमोग्लोबीन कमी होणे तसेच मूत्रपिंड, यकृत आणि शरीरात  पाणी झाल्यामुळे या सर्व महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यात बाधा येऊन शेवटी मृत्यूदेखील होऊ शकतो. सर्वच डेंगूचे रुग्ण या प्रकारे गंभीर आजारी पडतील असे नाही.

गरोदर स्त्रिया, अर्भक, ज्येष्ठ नागरिक, थॅलेसेमिया व मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त, तसेच एड्सचे रुग्ण, तसेच याशिवाय मधुमेह, अस्थमा, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनाही डेंगूची लागण होण्याची शक्यता अधिक असते. अशा रुग्णांनी कोणत्याही स्वरूपाचा ताप अंगावर काढू नये.

डेंगूचे निदान करण्यासाठी तपासण्या :

१. डेंगू इम्यूनोग्लोबुलीन जी (IgG) किंवा इम्यूनोग्लोबुलीन एम (IgM) अँटीबॉडी

२. डेंगू एलायझा टेस्ट

३. डेंगू आरटी पीसीआर

या चाचण्या करून डेंगूचे निदान केले जाते. परंतु बहुतांशी रुग्णाची लक्षणे आणि शारीरिक अभ्यास करून निदान केले जाते. अशाच प्रकारची लक्षणे मलेरिया, टायफॉईड, एन्फ्लुएंझा, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया आणि इतर व्हायरल तापामध्ये दिसून येतात.

उपचार

१. डेंगूसाठी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही.

२. डेंगूवर औषध किंवा थेट उपचार अद्याप उपलब्ध नाहीत. कमी मुदतीच्या तापाचे रुग्ण जेव्हा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होतात आणि निदान झालेले नसते त्यावेळी बऱ्याचदा रुग्णाला मलेरियाचे औषध दिले जाते. रुग्णाची रक्ततपासणी करून अहवाल येईपर्यंत मोलाचा वेळ वाया जाऊ शकतो

३. जर प्लेटलेट्स कमी झाल्या तर प्लेटलेट्स चढविण्यात येतात. हिमोग्लोबीन कमी झाले, तर रक्त देण्यात येते. रक्तदाब कमी झाल्यास  सलाईन देण्यात येते. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास झाला तर रुग्णाला श्वसनयंत्रावर ठेवावे लागते.

४. गेल्या काही वर्षांत पपयाच्या पानाचा अर्क गोळीच्या रूपात बाजारात उपलब्ध झाला आहे. नवीन संशोधनाप्रमाणे ह्या गोळ्या प्लेटलेट्स वाढविण्यात मदत करतात, परंतु ह्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांना विचारा. पपयाच्या झाडाची पाने तोडून रुग्णांना देणे हानिकारक होऊ शकते.

अशी घ्या रुग्णाची काळजी

डेंगू साधा ताप : साधारणतः बऱ्याच जणांमध्ये डेंगूच्या तापाची सौम्य लक्षणे दिसून येतात. अशा रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार केले जाऊ शकतात. यावेळी पुढील काळजी घ्यायला हवी :

१. तापासाठी अस्प्रिन किंवा ब्रुफेन घेऊ नये. ताप जास्त असला तर थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवाव्या. संपूर्ण अंग थंड पाण्याने पुसून काढावे.

२. रुग्णाला जास्तीत जास्त आराम करू द्यावा. भरपूर पाणी पिऊन निर्जलीकरण टाळावे.

३. तापाच्या पहिल्या आठवड्यात स्वतःला पुन्हा डासांचे लक्ष्य होण्यापासून वाचवावे, जेणेकरून डेंगूचा प्रसार होणे टळेल.

४. ताप असताना मच्छरदाणीमध्ये झोपावे.

पुढील धोक्याची लक्षणे आढळल्यास रुग्णाला तातडीने डॉक्टरांकडे/ हॉस्पिटलमध्ये न्यावेः

१. सतत उलट्या होणे.

२. फुप्फुसात, पोटात पाणी भरणे

३. दम लागणे, रक्तदाब कमी होणे.

४. कावीळ होणे, लघवी कमी होणे.

५. शुद्ध हरपणे.

६. हात-पाय थंड पडणे.

७. रक्ताच्या उलट्या, शरीरात कुठूनही रक्तस्राव होणे.

डेंगूबद्दलचे गैरसमज :

१. डेंगूचे रुग्ण हे गंभीर आजारी असतात, हा एक मोठा गैरसमज आहे. बऱ्याच रुग्णांना साधा डेंगू होतो, त्यांच्यामध्ये डेंगूची सौम्य लक्षणे दिसतात. डेंगू झालेल्या प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात भरती करावे लागतेच, हासुद्धा असाच आणखी एक गैरसमज आहे.

२. प्लेटलेट्स जरा कमी झाल्या तरी प्लेटलेट्स चढविल्याच पाहिजे, असे रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना वाटते. जर रुग्णाला शरीरात कुठूनही रक्तस्राव होत नसेल आणि प्लेटलेट्सची संख्या ५०,००० एमएलच्यावर असेल तर प्लेटलेट्स देण्यात येत नाहीत. ह्या रुग्णांना प्लेटलेट्सची गरज नसते. महत्त्वाचे म्हणजे प्लेटलेट्स ह्या रक्तदान केलेल्या रक्तामधून वेगळ्या करून बनवितात. प्लेटलेट्स प्रयोगशाळेत तयार करू शकत नाही, त्यांची उपलब्धता मोजकीच असते.

डेंगूचा प्रतिबंध :

सार्वजनिक ठिकाणी घ्यायची काळजी

१. टायर, कप, कागदी पेले, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, घरावर टाकलेले प्लास्टिक, कुंड्यांखालील ताटल्या, तुटलेली खेळणी यामध्ये पावसाचे पाणी साठून डासांची उत्पत्ती होण्याची ठिकाणे तयार होतात. महानगरपालिका, ग्रामपंचायत वेळोवेळी याविषयी माहिती देण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम करत असते, त्यांना सहकार्य करावे. आपल्या सभोवताली असे पाणी साठत असेल तर ते पाणी नष्ट करायला हवे.

२. डेंगू पसरविणाऱ्या एडिस डासाची मादी घरोघरी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वा ड्रममध्ये अळ्या घालते. त्यामुळे पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडी करावी.

३. घरांच्या खिडक्या, स्लायडिंगला मच्छरजाळी लावा. ही जाळी संध्याकाळी मच्छर आत येण्याच्या वेळी बंद करावी.

४. सार्वजनिक बागांत कॅटलीप, गोंडा, रोजमेरी, सायट्रोनला गवत, सुगंधित जर्नीमस अशी डासांना दूर ठेवणारी झाडे लावता येतील.

वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपायः

१. मुलांना सायंकाळी खेळायला जाताना लांब बाह्यांचे आणि पाय झाकले जातील असे कपडे घालावे.

२. घरात मॉस्किटो रेपेलन्टस, मच्छरदाणीचा वापर करावा.

३. बाजारात बरीच आयुर्वेदिक घटक असलेले ड्रॉप्स आणि क्रीम्स उपलब्ध आहेत, तेही वापरता येतील. प्रवासात हे अतिशय सोयीचे पडते.

डेंगू हा जीवघेणा आजार असला, तरी त्याला प्रतिबंध करणे हे आपल्याच हातात आहे. तसेच वेळीच घेतलेल्या वैद्यकीय मदतीमुळे ह्या आजारापासून आपला बचाव करणे शक्य आहे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. कविता जोशी