मूल ‘प्लॅन’ करताना(नियोजन)…
नवजात बाळाबरोबर अनेक जबाबदाऱ्याही हलक्या पावलांनी नव्याने पालक बनलेल्या जोडप्याच्या अंगावर येऊन पडतात. वाढलेला खर्च, प्रसूतीदरम्यान आणि नंतर स्त्रीमध्ये झालेले शारीरिक व मानसिक बदल, बाळामुळे बदललेले आयुष्य अशा अनेक गोष्टी मूल घरात आल्यावर जोडप्याच्या लक्षात येऊ लागतात. काही जोडपी हे बदल स्वीकारून आपले ‘पालकत्व’ जगू लागतात, तर काहींना या गोष्टींशी जुळवून घेणे कठीण होते. परिणामी, नवरा-बायकोमध्ये खटके उडू लागतात. म्हणूनच संततीचा विचार करत असणाऱ्या जोडप्यांनी गर्भधारणेपूर्वीच आर्थिक, शारीरिक आणि मानसिक स्तरावर नियोजन करायला हवे…
पालकत्वाची आर्थिक सज्जता – तृप्ती राणे (सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)
बऱ्याचदा, बाळाच्या जन्मानंतर त्याचे शिक्षण आणि लग्न या खर्चांचे नियोजन करण्याबाबत विचार केला जातो. पण या खर्चाचे नियोजन मूल जन्माला येण्याआधीच सुरू झाले पाहिजे. हे जरा ‘अतिलवकर’ होत आहे, असे वाटेल पण मुलाला सुरक्षित व तणावमुक्त वातावरणात वाढविण्यासाठी काटेकोर नियोजनाची आवश्यकता आहे. अशा वेळी, प्रत्यक्ष पालक होण्याआधी आर्थिक नियोजन करताना पुढे दिलेल्या मुद्यांचा विचार करायला हवा :
१) गर्भधारणापूर्व नियोजन : तुम्ही दाम्पत्य असा वा एकल पालक असा, मूल जन्माला घालण्याआधी तुम्ही आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात तुम्ही स्वतःला पुढील प्रश्न विचारायला हवे :
अ) बाळाची काळजी घेण्यासाठी सपोर्ट सिस्टिम (मदतनीस) म्हणजेच पालक, आया, गृहसेविका आपल्याकडे आहेत का?
ब) आपल्या घराच्या रचनेत बदल करण्याची आवश्यकता आहे का?
क) आजी-आजोबांपैकी कुणी एक संभाव्य पालकांच्या घरी राहण्यास येऊ शकतात का?
ड) करिअरमध्ये अंशतः किंवा पूर्ण वेळ विश्रांती घेता येऊ शकेल का?
ई) मूल घरी आल्यावर एकदाच करावा लागणारा आणि नियमित करावा लागणारा अतिरिक्त खर्च किती असू शकेल?
फ.) एका पालकाने करिअर कायमचे थांबविले, तर उत्पन्नाचे नुकसान किती असेल?
या सगळ्या परिस्थितीचा सखोल विचार केला गेला पाहिजे, त्याबद्दल जोडीदाराशी चर्चा झाली पाहिजे आणि त्यानुसार नियोजनही होणे अपेक्षित आहे. विशेषतः एकल पालकांच्या बाबतीत हे सर्व घटक विचारात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
गर्भधारणेसाठी अनेक जोडपी वेगवेगळे उपचार करून घेत असल्याचेही दिसून येते. अशा परिस्थितीत हा खर्च कांकणभर अधिक असू शकतो. त्यामुळे या खर्चाचेसुद्धा नियोजन करायला हवे. कारण अनेक मूलभूत आरोग्य विमा योजनांमध्ये या खर्चाबद्दल संरक्षण देण्यात येत नाही.
२) प्रसूती खर्चाचा विचार : तुमच्या आरोग्य विमा योजनेमध्ये प्रसूती खर्च समाविष्ट आहे का, प्रतीक्षा कालावधी (हा दोन-चार वर्षांचा असू शकतो), सामान्य तसेच सिझेरिअन प्रसूतीसाठी असलेली मर्यादा, विमा संरक्षण नसलेले घटक, दावा करण्याची पद्धत, कॅशलेस की खर्चाचा परतावा, प्रसूतीची संख्या इत्यादी बाबी तपासून घ्याव्या. एखाद्या पालकाकडे ‘कॉर्पोरेट कव्हर’ (कंपनीतर्फे मिळणारे विमा संरक्षण) असेल, तर उपलब्ध मर्यादा तपासून घ्यावी आणि उरलेल्या रकमेसाठी वैयक्तिक विमा संरक्षणाचा उपयोग करावा. त्याचप्रमाणे प्रसूतीदरम्यान होऊ शकणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थिती- साठीसुद्धा आर्थिकदृष्ट्या तयार असणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य विमा योजनेतील तरतुदी बारकाईने वाचणे आणि समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
३) प्रसूतीपश्चात नियोजन : मूल जगात आल्यावर पालकांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. मुलाला मिळणाऱ्या सुखसुविधा, बाळाचे हित, संगोपन याला प्राधान्य मिळते. बाळ सहा महिन्यांचे होण्याआधीच पाळणाघर, बालवाडी, नियमित शाळा या सगळ्यांचे नियोजन सुरू होते आणि तेव्हा पालकांना जाणीव होते की, मूल वाढविणे ही अत्यंत खर्चिक जबाबदारी आहे. त्यामुळे कौटुंबिक आर्थिक नियोजनाचा विचार केला गेला पाहिजे. शिक्षण, लग्न यांसारख्या दीर्घकालीन खर्चांचे नियोजन विविध प्रकारच्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट’ पर्यायांच्या माध्यमातून करता येऊ शकते. पालक म्हणून मुलाच्या गरजा व इच्छा यांची पूर्तता करतानाच दुसरीकडे वैयक्तिक खर्चासाठी आवश्यक निधीचाही विचार केला पाहिजे. अलीकडील काळात मुले आपल्या आईवडिलांसोबत राहत नाहीत, असे दिसून येते. त्यामुळे स्वतःच्या निवृत्तीपश्चात खर्चाचे नियोजन पालकांनी आधीपासून करणे गरजेचे आहे. एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी निवृत्तीनंतर कर्ज मिळू शकत नाही. पण शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज मिळू शकते. त्यामुळे आपल्या निवृत्तीपश्चात खर्चासाठी राखून ठेवलेल्या निधीला कात्री लागणार नाही, अशा प्रकारच्या पर्यायांचा पालकांनी विचार करणे आवश्यक आहे.
गर्भधारणेसाठी नियोजन – डॉ. प्रज्ञा परुळकर (प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ)
काही जोडपी करिअर, आर्थिक स्थैर्य आदी कारणांमुळे गर्भधारणा लांबवतात. वय वाढत गेल्यावर शारीरिक वा इतर घटकांमुळे गर्भधारणा होण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे कुटुंब नियोजन करताना प्रजननक्षम वयाचा विचार करणेही आवश्यक आहे.
१) तुमचे / तुमच्या जोडीदाराचे वय किती आहे? पुरुषापेक्षा स्त्रीवर वयाचा परिणाम अधिक होतो, कारण जैविक घड्याळ पुढे सरकत असते. वयाच्या ३५ व्या वर्षापर्यंत स्त्रीमधील बीजांड कमी होण्याच्या प्रमाणाचा वेग मंद (कमी) असतो. वयाच्या ३५ व्या वर्षानंतर मात्र ही बीजांडे वेगाने कमी होऊ लागतात. वयाच्या ३७ व्या वर्षी सुमारे २०,००० बीजांडेच शिल्लक असतात. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी असते. यासाठी जैविक घड्याळ समजून घ्या आणि गर्भधारणेसाठी योग्य वयाबाबत निर्णय घ्या.
चाचणी : अल्ट्रा साउंड एएमएच (अँटी मुलेरियन हार्मोन) आणि एएफसी (अँट्रल फॉलिकल काउंट). यामुळे तुम्हाला राखीव डिंबग्रंथी (ओव्हरी) विषयी माहिती मिळू शकते.
पर्याय :
– हा साठा कमी होण्याआधी बाळाचे नियोजन करणे.
– एग फ्रीझिंग (जोडीदार नसेल तर). – भ्रूण गोठवून ठेवणे (जोडीदार असेल तर).
२) शारीरिक फिटनेस :
(i) वैद्यकीय पाश्र्वभूमी : दोन्ही जोडीदारांमध्ये एखाद्या गंभीर आजाराची (जसे की मधुमेह / हायपर टेन्शन / हृदयविकार / मध्यवर्ती मज्जासंस्थेचा आजार / कर्करोगाच्या पेशी अस्तित्वात असणे / लैंगिक संक्रमित आजार / आनुवंशिक आजार / स्थूलता / डिस्लिपिडेमिया) पाश्र्वभूमी आहे का?
(ii)जोडीदारांपैकी एखाद्याची किंवा दोघांची कोणती शस्त्रक्रिया झाली आहे का? एखाद्या जोडीदाराची जननमार्गाशी संबंधित शस्त्रक्रिया झाली आहे का?
(iii)व्यसन : मद्यपान / धूम्रपान / अमली पदार्थांचे व्यसन असल्यास गर्भधारणेचे नियोजन करण्याआधी हे सर्व थांबविणे आवश्यक आहे.
(iv)स्त्रीरोगतज्ज्ञाकडून वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
(v)नाडी, रक्तदाब, श्वसनमार्ग, हृदयातील रक्तवाहिन्यांचे आरोग्य, गायनॅक (श्रोणीभागाची) तपासणी, पॅप स्मिअर यूएसजी (सोनोग्राफी), रक्त तपासण्या, पुरुष जोडीदारासाठी वीर्याचे विश्लेषण.
३) गर्भावस्थेत होणारे बदल :
– शारीरिक, भावनिक, मानसिक.
– संप्रेरकांमधील बदलांमुळे हा बदल होतो.
– वजन वाढते, पाणी वाढते, पोटाचा आकार वाढतो.
– पहिल्या तिमाहीमध्ये मळमळ आणि सकाळी अस्वस्थ वाटते.
– स्तनांचा आकार वाढतो आणि स्तनपानासाठी तयार होतात.
– अस्थिबंधने सैल होतात. परिणामी पाठदुखी उद्भवू शकते आणि शारीरिक ढब बदलते.
– पाय आणि चेहऱ्याला सूज येते.
– स्ट्रेच मार्क्स येतात, त्वचा काळवंडते, केस गळतात.
– धाप लागते, चक्कर येते.
– रक्तदाबामध्ये बदल होतो.
– श्वसनयंत्रणा आणि रक्ताभिसरण यंत्रणेमध्ये बदल झाल्यामुळे धाप लागते.
– भावनिक बदल : स्वभावातील चढ-उतार, रडू येणे, बाळाच्या जन्माबद्दलची भीती, जोडीदाराकडून खूप आधार आवश्यक असतो.
४) गर्भधारणापूर्व चाचण्या :
– रक्त तपासणी :
– सीबीसी, थायरॉइड चाचणी, रक्तशर्करा चाचणी, रक्तगट.
– एस.ए.एम.एच.
– सोनोग्राफी
– पुरुषासाठी वीर्य तपासणी :
– क्तगट
– रक्तातील शर्करेचे प्रमाण
५) कौटुंबिक पाश्र्वभूमी :
– कुटुंबातील आनुवंशिक आजार
– डाऊन सिंड्रोम / मतिमंदत्व
– रक्ताच्या नात्यात झालेला विवाह
– मधुमेह, हायपर टेन्शन आणि हृदयविकार
६) करिअरमध्ये ब्रेक : पुढील गुंतागुंती नसतील, तर ती स्त्री गर्भावस्थेचे नऊ महिने काम करू शकते –
– हायपरमेसिस (जास्त प्रमाणात उलट्या होणे)
– पीआयएच (गर्भावस्थेमुळे आलेले हायपर टेन्शन)
– गर्भपाताची किंवा मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता
– गर्भधारणेच्या कालावधीत रक्तस्राव होणे.
– जुळे किंवा तिळे
– स्त्रीला जोडीदाराकडून शारीरिक, मानसिक आणि भावनिक आधाराची आवश्यकता असते.
– प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान देण्यासाठी किमान तीन महिन्यांची प्रसूती रजा मिळणे हितावह असते.
– स्त्रीने प्रसूती रजा व ‘वर्क फ्रॉम होम’ या पर्यायांबद्दल कार्यालयात चर्चा करावी.
चेकलिस्ट :
– वय – स्वतःचे आणि जोडीदाराचे
– वैद्यकीय पाश्र्वभूमी – स्वतःची आणि जोडीदाराची
– व्यसन – स्वतःचे आणि जोडीदाराचे
– रोजगार – स्वतःचा आणि जोडीदाराचा
– आर्थिक स्थिती – स्वतःची आणि जोडीदाराची
– दोघांमधील आनुवंशिक आजाराची पार्श्वभूमी
– कुटुंबाचा आधार – एकत्र / विभक्त
– शस्त्रक्रियेविषयीची पार्श्वभूमी
– मासिक पाळीची पार्श्वभूमी
– याआधीची गर्भधारणा आणि गर्भपात
– रक्त संक्रमण
– या आधी रुग्णालयात भरती व्हावे लागले होते का? असल्यास त्याचे कारण.
मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य – रीया गांधी (सायकोथेरपिस्ट आणि कौन्सिलर)
नव्या बाळाचे आगमन, त्याची जबाबदारी, त्याच्यामुळे बदललेले दैनंदिन जीवन, आईच्या शरीरात झालेले बदल, अपुरी झोप या आणि अशा इतर अनेक कारणांमुळे प्रसूतीनंतर महिलांमध्ये नैराश्याची लक्षणे दिसतात. याचा परिणाम वैवाहिक नात्यावरही होऊ शकतो. त्यामुळेच मूल होऊ देण्याचा विचार करण्यापूर्वी पती-पत्नी दोघांनीही मानसिक स्तरावरील काही मुद्यांचा विचार अवश्य करायला हवा.
१) तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर आहात का? बाळाचे पालनपोषण, पुढे त्याचे शिक्षण आदी खर्च असतो. मूल आणि पालकांच्या आरोग्याबाबतीत अनपेक्षित परिस्थिती / समस्यासुद्धा उद्भवू शकते.
२) तुमचे नाते घट्ट आहे का? बाळाचे आगमन झाल्यावर नवरा-बायकोमधील नाते सुधारते, असे तुमचे शेजारी, नातेवाईक कितीही म्हणत असले तरी तुमच्या नात्यात / वैवाहिक आयुष्यात आधीपासून कटुता असेल तर बाळाच्या आगमनाने ती दूर होऊ शकत नाही. किंबहुना नात्यामधील दुरावा अजून ठळकपणे समोर येऊ लागतो. जोडीदाराबद्दल असलेला तुमचा संताप, असमाधान, अपरिहार्यता वाढू शकते. जोडीदार आई / वडिलांच्या भूमिकेला न्याय देत असेल तरी त्याच्या जोडीदाराच्या भूमिकेत बदल होत नाही. त्यामुळे एका घट्ट, प्रेमळ नात्याच्या पायाऐवजी खडकाळ नात्याच्या पायावर बाळाला जन्म देणे कितपत उचित असेल, याचा तुम्ही विचार केला पाहिजे.
३) तुमचा जोडीदार भावनिक- दृष्ट्या/शारीरिकदृष्ट्या आक्रमक / शिवीगाळ करणारा असेल, तर घरात नव्याने आलेले मूलही ते थांबवू शकणार नाही. बाळाच्या आगमनापूर्वी
तुमच्या घरात सुरक्षित, निकोप वातावरण असेल याची खातरजमा करून घ्या.
४) प्राधान्यक्रम : बऱ्याच कालावधीपर्यंत तुम्ही स्वतःला सोडून दुसऱ्या व्यक्तीला प्राधान्य देण्यास तयार आहात का? बाळाची भावनिक व शारीरिक सुदृढ वाढ होणे, ही मोठी जबाबदारी असते. पालकांना त्यांच्या गरजा / इच्छा / महत्त्वाकांक्षा यांना दुय्यम स्थान द्यावे लागते आणि त्यांचे सगळे वेळापत्रक पूर्णपणे बाळावर अवलंबून असते. हे बाळ पुढील बराच काळ तुमच्यावरच अवलंबून असणार आहे. बाळाला या जगात आणण्याचा निर्णय तुमचा होता. त्यामुळे हा बदलसुद्धा तुम्ही स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे.
५) बाळाच्या आगमनानंतर तुमच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या मनाप्रमाणे जगण्यासाठी, पुढील काही वर्षे वाट पाहावी लागू शकते.
६) पालक होणे हा केवळ स्वतःसाठी आनंद मिळविण्याचा भाग नाही, तर पालकत्वामध्ये खूप द्यावेसुद्धा लागते. तुमच्याकडे देण्यासारखे खूप असेल तरच बाळाचा विचार करा.
७) तुम्हा दोघांमध्ये किती चांगला संवाद आहे? तुमचा एकमेकांवर विश्वास आहे का? मूल कसे वाढवायचे आहे? मुलांबाबत आक्रमक न होण्याविषयी तुमचे दोघांचे विचार सारखे आहेत का? उदा. मुलगा असो वा मुलगी, त्याला / तिला सारख्याच प्रकारे शिकविण्याची तुमची तयारी आहे का? आदी बाबतीत तुमची चर्चा झालेली असली पाहिजे.
८) एका मुलाला वाढविणे ही गावाची जबाबदारी असते, असे म्हणतात. त्याचप्रमाणे तुमचा जोडीदार, कुटुंब, मित्र आणि मानसिक आरोग्यतज्ज्ञ इत्यादी सपोर्ट सिस्टिमही तितकीच गरजेची असते. तुम्ही ज्यांच्याकडे आपल्या भावना खुलेपणाने व्यक्त करू शकता, अशी सपोर्ट सिस्टिम तयार करा. कारण तुम्हाला अशा प्रकारे व्यक्त होण्याची गरज भासू शकते.
९) गर्भावस्थेतील बदल : गर्भधारणा झाल्यापासून ते स्तनपानापर्यंत आणि प्रसूतीपश्चात येणाऱ्या नैराश्यापर्यंत तुम्हाला स्वतःबद्दल, तुमच्या बाळाबद्दल आणि नात्यांबद्दल विविध प्रकारच्या भावभावना जाणवू शकतात. हे सामान्य असले तरी भावनिक चढउतारांना तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते. यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे.
१०) तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने कामांची विभागणी करायला हवी. पालकत्व, घरची कामे, अर्थार्जनाचे काम आणि तुमच्या परस्परांकडून काय अपेक्षा आहेत, याबद्दल तुम्ही एकमेकांशी प्रामाणिक असले पाहिजे.
११) तुम्हाला कसे वाटेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकत नाही आणि तुम्ही अनेक परिणामांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण भविष्याचे नियोजन केले तर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे सज्ज राहू शकता.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.