पोस्ट मधील सुरक्षित गुंतवणूक
कमावलेला पैसा योग्य वेळी, योग्य ठिकाणी गुंतवणे आणि गुंतवणुकीचे नियोजन करणे, हे आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असते. सध्याच्या दिवसांत आर्थिक नियोजन करायचे, तर उपलब्ध असणाऱ्या गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमधून आपल्या गरजा आणि आपण कमवत असलेला पैसा यानुसार आपला पोर्टफोलिओ तयार करायला हवा.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यात बँकांमधील डिपॉझिट, म्युच्युअल फंड, पोस्ट ऑफिस गुंतवणूक, शेअर बाजारातील गुंतवणूक, सोन्यातील गुंतवणूक, रियल इस्टेटमध्ये पैसे गुंतवणे आदी पर्यायांचा समावेश होतो. गेल्या वीस वर्षांत पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा शेअर बाजाराचा समावेश असलेल्या किंवा शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणुकीच्या योजनांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसतो आहे. बँकांमधील फिक्स डिपॉझिट्सवरील व्याजाचे दर कमी होणे, हे यामागील एक प्रमुख कारण असू शकते. याचबरोबर शेअर बाजारासंबंधी लोकांमध्ये वाढलेले ज्ञान, उपलब्ध होणारा माहितीचा साठा याचा परिणाम म्हणूनही लोक वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करताना आता दिसतात.
भारतीय टपाल सेवा
गुंतवणूक विश्वात एक गुंतवणूक अटळ ठरते, ती म्हणजे पोस्टाच्या योजना! ब्रिटिश काळात सुरू झालेल्या आद्य सेवांपैकी एक म्हणजे भारतीय टपाल (पोस्ट) सेवा होय. ‘गाव तेथे पोस्ट ऑफिस’ ही रचना असलेली कदाचित पोस्ट ऑफिस ही एकमेव शासकीय यंत्रणा आहे. जिथे बँका आणि अन्य वित्तसंस्था पोहोचायचा विचारही करू शकत नाहीत, तेथे भारतीय पोस्टाचे अस्तित्व पाहायला मिळते. डोंगराळ प्रदेश, दुर्गम प्रदेश असो किंवा महानगरातील गजबजलेली वस्ती; सगळ्या ठिकाणी पोस्ट ऑफिस हमखास असतेच असते.
पोस्टातील गुंतवणुकीचे प्रकार
पोस्टातील गुंतवणुकीचे प्रमुख तीन प्रकारांत वर्गीकरण करता येते :
१. पोस्टाने देऊ केलेल्या गुंतवणूक योजना
२. पीपीएफ खाते
३. टपाल खात्यामार्फत सुरू केलेल्या सरकारी योजना
पोस्टातील गुंतवणूक महत्त्वाची का?
पोस्टात केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीला भारत सरकारची हमी असते. याचाच अर्थ पोस्टातील गुंतवणुकीवर मिळत असणारे व्याज देणे, ही सरकारची जबाबदारी ठरते. म्हणजेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीवरील धोका शून्य असतो. इतर योजनांवरील बाजारातील व्याजदरापेक्षा येथील व्याजाचा दर कमी वाटला, तरीसुद्धा ‘सुरक्षा’ हा मुद्दा विचारात घेतल्यास पोस्टाच्या योजना आपल्या पोर्टफोलिओमध्ये हव्याच! वर दिलेल्या चौकटीवरून आपल्या एक गोष्ट नक्कीच लक्षात येते, की पोस्टातील कोणतीही गुंतवणूक सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा विचार करूनच उपलब्ध करून दिलेली आहे. तुमची आर्थिक स्थिती कशीही असली, तरीही तुमच्यासाठी कोणता ना कोणता तरी गुंतवणुकीचा पर्याय पोस्टाकडे अवश्य आहे.
पोस्टातील गुंतवणुकींचा कालावधी
पोस्टातील गुंतवणूक योजना ह्या अल्पकालीन व दीर्घकालीन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. पोस्टात गुंतवणुकीचा श्रीगणेशा ‘सेव्हिंग अकाउंट’ उघडून करता येतो. केवायसी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला पोस्टातील कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरू करता येते. जर नियमित स्वरूपात पैसे लागणार असतील, तर मासिक बचत योजनेत पैसे गुंतवावेत म्हणजे दर महिन्याला घरखर्चासाठी एक ठरावीक रक्कम हातात येईल. जर तुम्हाला पोस्टाच्या योजनेतून लगेच पैसे नको असतील, तर ‘किसान विकास पत्र’ किंवा ‘नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट’ तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. पोस्टातील गुंतवणुकींविषयी लोकांमध्ये असाही गैरसमज असतो, की ही गुंतवणूक फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. पण हे चुकीचे आहे! कोणत्याही वयात तुम्ही येथे गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता.
तुम्हाला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ अकाउंटमध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर तेही (पीपीएफ अकाउंट) पोस्टात सुरू करता येते. तुमच्या मुलीसाठी खास ‘सुकन्या समृद्धी योजना’ ही सरकारी योजनासुद्धा टपाल खात्यात उपलब्ध आहे. आपल्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने त्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुमची मुलगी वयाने खूप लहान असेल किंवा नुकताच तुमच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला असेल, तर ‘सुकन्या समृद्धी योजने’द्वारे तिच्या वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत किंवा २१ व्या वर्षापर्यंत तुम्ही एक रक्कम या योजनेद्वारे उभी करू शकता. या पैशाचा उपयोग तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी तुम्हाला करता येईल. जर तुमची पन्नाशी उलटली असेल आणि तुम्हाला निवृत्तीपर्यंत अमुक एक रक्कम जमा करायची आहे, तर दरवर्षी ‘नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट’ किंवा ‘किसान विकास पत्रा’त पैसे गुंतवायला सुरुवात करा. यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग तुम्हाला साठीनंतर होईल.
करबचत आणि पोस्टातील गुंतवणूक
पोस्टातील दोन योजनांवर करबचतीची सवलत उपलब्ध आहे. ‘नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट’मध्ये गुंतवणूक केल्यास ती गुंतवणूक आयकर कायद्याच्या नियमानुसार टॅक्स बचतीसाठी दाखवता येऊ शकते. मात्र यामध्ये मिळणारे व्याज करपात्र आहे. पोस्टातील पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर करबचत सवलत मिळते. या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरही कर लागत नाही. आपल्या गुंतवणुकीमध्ये शेअर मार्केट, म्युच्युअल फंड याचबरोबर काही स्थिर व्याज देणाऱ्या गुंतवणुकीसुद्धा असायला हव्यात. या दृष्टिकोनातून पोस्टातील योजनांचा विचार नक्की करा. गुंतवणुकीचा एक नियम असे सांगतो, की तुमचे वय आणि गुंतवणुकीचा पॅटर्न यात सहसंबंध आहे. उदाहरणार्थ, तुमचे वय ६० असेल, तर तुमच्या एकूण गुंतवणुकीतील साठ टक्के पैसे ‘फिक्स्ड् इन्कम’ देणाऱ्या योजनांमध्ये गुंतविले पाहिजेत व अशा योजनांची निवड करताना पोस्ट ऑफिस हा विचार उत्तम आहे.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कौस्तुभ जोशी
(लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)