बिटा च्या पानांचे लाडू
साहित्य : २ कप बारीक चिरलेले बिटा चे कोवळे देठ आणि पाने, १ छोटा बीट उकडून, १/२ कप कणीक, १/२ कप डाळं, १ कप बारीक चिरलेला गूळ, १ मोठा चमचा भाजलेल्या तिळाची जाडसर पूड, ५ लहान चमचे साजूक तूप, ३ मोठे चमचे राजगिऱ्याच्या लाह्या, २ चिमूट मीठ.
कृती : बिटा ची पाने आणि कोवळे देठ धुऊन सुकवून घ्या.सुकल्यावर बारीक चिरून घ्या. एका कढईत दोन छोटे चमचे साजूक तूप घालून चिरलेली पाने आणि देठ घालून मंद आचेवर परतून घ्या व एका ताटात काढून घ्या.त्याच कढईत तीन लहान चमचे साजूक तूप घालून कणीक मंद आचेवर खमंग भाजून घ्या व परातीत काढून घ्या.उकडलेले बीट सोलून त्याचे बारीक तुकडे करा.बिटाचे तुकडे, भाजलेली पाने आणि देठ मिक्सरमध्ये वाटून परातीत काढून घ्या.डाळं मिक्सरमध्ये घालून बारीक करा.त्यातच गूळ घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घ्या.वाटलेले मिश्रण परातीत काढून घ्या.आता यात भाजलेल्या तिळाची पूड व मीठ घालून मिश्रण एकजीव करा.जरूर पडल्यास एक लहान चमचा साजूक तूप घाला व मध्यम आकाराचे लाडू वळा.राजगिऱ्याच्या लाह्या एका ताटलीत घेऊन त्यात हे लाडू घोळवा.
(हे लाडू सामान्य तापमानाला दोन-तीन दिवस चांगले राहतात.त्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचे असल्यास फ्रीजमध्ये ठेवा.)
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सुधा कुंकळीयेंकर