पोटॅटो कॉर्न बॉल्स | प्रणाली घाडिगावकर, मुंबई | Potato Corn Balls | Pranali Ghadigaonkar, Mumbai

Published by प्रणाली घाडिगावकर on   May 26, 2021 in   2021RecipesTiffin Box

पोटॅटो कॉर्न बॉल्स

साहित्य : १ वाटी मक्याचे दाणे, २ बटाटे, २ कांदे, ५-६ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ आल्याचा तुकडा, १ चमचा लाल तिखट, १ चमचा धणे पावडर, १ चमचा जिरे पावडर, १ चमचा साखर, १ चमचा तांदळाचे पीठ, १ चमचा लिंबूरस, २ चमचे रवा, मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : सर्वप्रथम मक्याचे दाणे व बटाटे स्वच्छ धुऊन उकडून मॅश करून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेले आले, लाल तिखट, धणे-जिरे पूड, साखर, तांदळाचे पीठ, लिंबूरस, गरम मसाला व चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रणाचे मध्यम आकारात बॉल्स तयार करा व रव्यात घोळवून मंदाग्नीवर तळून घ्या.

चटणीसाठी साहित्य : १ कप भाजलेली उडीद डाळ, १ वाटी ओले खोबरे, १ चमचा उडीद डाळ (फोडणीसाठी), मोहरी, कढीपत्ता, हिंग, मीठ, १ चमचा तेल.

कृती : भाजलेली उडदाची डाळ पाण्यात भिजवा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुऊन त्यात ओले खोबरे व मीठ घालून वाटून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, उडदाची डाळ, कढीपत्ता, हिंग परतून घ्या. तयार केलेली फोडणी वाटलेल्या चटणीवर घाला. तयार झालेले पोटॅटो कॉर्न बॉल्स या चटणीसोबत सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


प्रणाली घाडिगावकर, मुंबई