मल्टीग्रेन अंकुरित मेथी सँडविच
साहित्य : ३ वाट्या कणीक, प्रत्येकी २ चमचे ज्वारी, बाजरी, नाचणी, बेसन पीठ, मीठ, पाणी, तेल, पालक पेस्ट, २ चमचे बीट-टोमॅटो पेस्ट, हिरवी चटणी.
स्टफिंगसाठी : १ वाटी मोड आलेल्या मेथ्या, १/२ वाटी उकडलेला बटाटा, १ वाटी चिरलेला कांदा, १/२ वाटी किसलेले पनीर, १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लाल तिखट, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, तेल, हळद, मीठ, १ चमचा साखर, १ चमचा लिंबूरस.
कृती : सर्वप्रथम सर्व पिठे एकत्र करून पिठाचे तीन भाग करा.एका भागात पाणी, मीठ घालून मळून घ्या.दुसऱ्या भागात पालक पेस्ट घालून मळून घ्या.तिसऱ्या भागात टोमॅटो-बीट पेस्ट घालून मळून घ्या.
सारणासाठी : कुकरमध्ये पाव वाटी पाण्यात मेथ्या शिजवून घ्या.कढईत तेल गरम करून मेथ्या, चिरलेला कांदा परतून घ्या.मग हळद, चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लाल तिखट, उकडलेला बटाटा, मीठ, लिंबूरस, साखर व चवीपुरती चिरलेली कोथिंबीर घालून स्टफिंग तयार करा.स्टफिंग थंड करून घ्या.
सँडविच सर्व्ह करण्याची कृतीः मळलेल्या तीन पिठांच्या वेगवेगळ्या पोळ्या जाडसर लाटून घ्या.ब्रेड स्लाइससारखे चौकोनी आकाराचे स्लाइस करा.हे स्लाइस थोडे भाजून घ्या.तिन्ही स्लाइसला बटर व हिरवी चटणी, टोमॅटो केचअप लावून घ्या.स्लाइसवर मेथी स्टफिंग पसरवून घ्या.चिरलेला कांदा-कोथिंबीर-पनीर, चाट मसाला घाला.कडा दाबून तव्यावर तेल किंवा बटर लावून सँडविच खरपूस भाजून घ्या.त्रिकोणी आकारात कापून गरमागरम मेथी सँडविच सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शैला काटे, मुंबई